मनोहर जोशी सर. पहाटे तीनच्या सुमारास, वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बहुधा हा त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला, असं थोडं तेव्हाच वाटणं सुरू झालं होतं. त्यांची प्रकृती काळजीची होतीच. तरीसुद्धा अंतिमतः जेव्हा अटळ गोष्ट घडते, तेव्हा चटका लागतोच.

स्वतःच्या असामान्य कर्तृत्वानं, अत्यंत गरीब घरातून ते एक समर्थ राजकीय नेता, महाराष्ट्रसारख्या देशाला दिशा दाखवणार्‍या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतिनिधित्व करणार्‍या लोकसभेचे समर्थ सभापती…शिवाय अशी सर्व वाटचाल करत असताना काळाची पावलं ओळखून युवकांना तंत्रज्ञानातलं शिक्षण देणारी शिक्षण संस्था उभी करणं असं मनोहर जोशी सरांचं चतुरस्र आणि प्रेरणादायी जीवन होतं.

माझे-त्यांच्याशी ऋणानुबंध जुळले ते मुख्यमंत्री झाल्यावर. त्यांनी त्यावेळच्या मुख्य सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांशी विचार विनिमय करून मुख्यमंत्री कार्यालय सांभाळण्यासाठी माझी निवड केली. त्यावेळी मी रायगड जिल्ह्याचा कलेक्टर होतो. मुख्यमंत्र्यांचे उपसचिव या नात्यानं त्यांचं कार्यालय सांभाळणं ही मलासुद्धा शिकण्याची फार मोठी संधी होती. त्यांनी माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी माझ्या आयुष्यातला एक फार मोठा सन्मान समजतो.

एक नेता, एक उद्योजक म्हणून मी त्यांना दुरून ओळखत होतोच. पण मुख्यमंत्र्यांचा सचिव या नात्यानं काम चालू झाल्यावर आमचे ऋणानुबंध विलक्षण जुळले. ते नातं, ते मुख्यमंत्री आणि मी प्रशासकीय अधिकारी, असं राहिलं नाही. ऋणानुबंध अत्यंत जिव्हाळ्याचे नात्याचे आणि एका कुटुंबाचे म्हणावेत, असे तयार झाले. मी त्यांना एकाच वेळी प्रशासनाची उत्तम समज, आवाका आणि कार्यक्षमता असणारे मंत्री, अत्यंत चतुर, कुशल, मुरब्बी राजकीय नेता, एक प्रेमळ पिता, एक दूरदृष्टी असलेला यशस्वी उद्योजक आणि अत्यंत शिस्तप्रिय स्वभाव…अशा सर्व रूपांमध्ये जवळून पाहिलं.

खेळाचीसुद्धा सरांना अत्यंत आवड होती. एकेकाळचे त्यांचे बालमित्र, जे स्वतः यशस्वी उद्योजक आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांना जोशी सरांना भेटण्यास पाच मिनिटे उशीर झाला. सरांचे पुढचे कार्यक्रम ठरले होते. तर सरांनी आपल्या या बालमित्रालादेखील सांगितलं, आता उशीर झाला. आपण नंतर पुन्हा केव्हातरी भेटू! जोशी सर मुख्यमंत्री असतानाच्या वर्षांमध्ये महाराष्ट्रात एन्रॉन या नावानं ऊर्जानिर्मितीचं प्रकरण गाजलं होतं. त्या प्रकल्पाचे अमेरिकेतले वरिष्ठ भारतात आले आणि प्रथम बाळासाहेबांना भेटायला गेले. त्या नादात त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ पाळण्यास उशीर झाला. तर एन्रॉनच्या संपूर्ण बोर्ड ऑफ डायरेक्टरला भेटण्यास सरांनी नकार दिला.

वेळोवेळी अतिशय गुंतागुंतीचे राजकीय प्रसंग समोर आले, तरीही अत्यंत हसतमुखपणे आणि अर्थातच कसलेल्या मुरब्बी राजकीय नेत्याप्रमाणे त्यांनी त्या गुंतागुंतीमधून मार्ग काढले. सरांकडे अत्यंत उत्तम अशी विनोद बुद्धी होती. मुख्यमंत्री आणि लोकसभेचे सभापती या दोन्हींच्या मधल्या काळात तेकेंद्रात अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. मात्र सरांच्या वागण्याबोलण्यात कधीही सत्ता, पद, मी किती मोठा असा कोणत्याही प्रकारचा भाव दिसून आला नाही. उलट मुळात सर्वांशी अत्यंत सलगीनं वागत- जगत, माणसं जोडत सर स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले.

मूळची घरातली अत्यंत गरिबी. पूर्वी महाराष्ट्रात वार लावून जेवण्याचा प्रकार असायचा. मुलगा शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत गेला तर घरात गरिबी इतकी त्याच्या जेवणाखाण्याच्या, राहण्याच्या व्यवस्था करता यायच्या नाहीत. तर पद्धत ही होती की सोमवारी एका घरी जेवायचं; पण जेवण्यापूर्वी त्यांच्या घरचं काही काम करायचं आणि मग जेवायचं. असं प्रत्येक वारी. मुळातला त्यातला खरा संस्कार आहे की कुणाचे उपकार घ्यायचे नाहीत. करायचं ते स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बळावर. मनोहर जोशी सर असे लहानाचे मोठे झाले. सर्वार्थानं कर्तृत्वानं मोठं होतानासुद्धा त्यांनी अनेक क्षेत्रांमधलं आपलं असामान्य कर्तृत्व दाखवून दिलं आणि आज जीवनाशी जे युवक संघर्ष करत असतील, अशा सर्वांनी खरोखर प्रेरणा आणि आदर्श घ्यावा, असं जीवन त्यांनी जगून दाखवलं. व्यक्तीशः मला तर रुखरुख वाटत राहणार आहे. पण भौतिकजगातलं एक अंतिम सत्य स्वीकारावं लागतं. एक प्रेरणादायी जीवन या नात्यानं त्यांच्या आयुष्याचा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देत राहील. माझी अंतःकरणाच्या अस्तित्वाच्या तळापासून त्यांना विनम्र श्रद्धांजली.

आदरांजली.

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts