राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच लागू केला जाईल अशी माहिती आयोगाने दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडं माहितीच्या अधिकाराअंतर्गत याविषयी विचारणा केली होती. एमपीएससीच्या या उत्तरामुळं समाजमाध्यमांत असलेल्या परीक्षा पॅटर्नसंबंधित संभ्रमाला पूर्णविराम मिळाला.
२४ जून २०२२ रोजी राज्य लोकसेवा आयोगानं सर्वप्रथम हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. यूपीएससी परीक्षेच्या धर्तीवर एमपीएससीची मुख्य परीक्षादेखील वर्णनात्मक केली जाईल. मात्र नव्या पॅटर्ननुसार अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी तक्रार परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केली. शिवाय मागील ४-५ वर्षांपासून तयारी करत असताना परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची होती, आता वर्णनात्मक परीक्षेची तयारी करताना अभ्यासपद्धतीत बदल करण्यास पुरेसा वेळ मिळावा अशी त्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेत, आयोगानं ३१ जानेवारी २०२३ रोजी आपल्या निर्णयात सुधारणा केली आणि परीक्षेचा हा नवा पॅटर्न २०२५ सालच्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. आता आयोगानं हा पॅटर्न २०२५ पासून लागू होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
नव्या पॅटर्ननुसार वर्णनात्मक परीक्षेत एकूण नऊ पेपर असतील. निबंध, सामान्य अध्ययनाचे ४ पेपर्स, वैकल्पिक विषयाचे २ पेपर्स आणि मराठी-इंग्रजीचे दोन भाषा पेपर असे स्वरूप असेल. मुख्य परीक्षेचा टप्पा पार करत मुलाखतीला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत २७५ गुणांची असेल.
एमपीएससीमार्फत महाराष्ट्राचं प्रशासन चालवणाऱ्या कर्तबगार अधिकाऱ्यांची निवड केली जाते. म्हणून या नागरी सेवा परीक्षा किती गंभीर आहेत याचं भान आयोगासहित परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांनीही बाळगायला हवं.
पूर्वपरीक्षेतली ‘माहिती’ आणि मुख्य परीक्षेतील ‘ज्ञान’ यांच्यातला मुख्य फरक म्हणजे असलेल्या माहितीचा वापर करून अन्वयार्थ लावता येणं, समोर येणाऱ्या मुद्द्याच्या दोन किंवा त्याहून जास्त बाजू असतात; मन आणि बुद्धी खुली ठेवून सर्व बाजू समजून घेणं, त्यावर स्वतंत्र बुद्धीनं विचार करणं, त्याआधारे निःपक्षपातीपणाने एका निर्णयावर येणं आणि झालेली सर्व प्रक्रिया नेमक्या आणि योग्य शब्दात मांडता येणं, हे कौशल्य उद्या ज्याला अधिकारी होण्याची इच्छा आहे त्याच्याजवळ असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठीच मुख्य परीक्षा लेखी, निबंधवजा हवी. परीक्षा देणाऱ्याच्या व्यक्तिमत्वातील या कौशल्याचा तिथं कस लागायला हवा.
म्हणून, एमपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांचं काम – आता त्याप्रमाणे अभ्यासाला लागा! नागरी सेवा परीक्षा ही कुणाच्या वैयक्तिक करिअरसाठी नाही. ही लोकसेवा आहे. या परीक्षेला ज्यांना सामोरं जायचं आहे त्यांना परीक्षेची उत्तम तयारी करून, स्वतःमध्ये बदल करून, परीक्षेला सामोरं जाणं जमलच पाहिजे! तरच ते उद्या प्रशासनात वेळोवेळी येणारी आव्हानं पेलू शकणार आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वच युवकांनी या सगळ्याचं भान ठेवून स्वतःला घडवलं पाहिजे, स्वतःचं व्यक्तिमत्व समृद्ध केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळाची आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. सामान्य अध्ययनचा चौथा ethics, integrity, aptitude चा पेपर हेदेखील त्यादृष्टीनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. या बदलांमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तर असं स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन आम्ही चालवू आणि महाराष्ट्र-भारताचे, म्हणजेच लोकांची सेवा करणारे ‘कार्यकर्ता अधिकारी’ होऊ, अशा जिद्दीनं, तडफेनं सर्वांनीच अभ्यासाला लागावं यासाठी अनेक, कायमच्याच – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
Post a comment Cancel reply
Related Posts
स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता मिळवा UGC मान्यताप्राप्त पदवी
स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता मिळवा UGC मान्यताप्राप्त पदवी ज्या विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC किंवा इतर…
One-to-One UPSC Counselling
🌟 One-to-One UPSC Counselling With Senior & Expert Faculties of Chanakya Mandal Pariwar — Online…
UPSC MAINS 2025 – SPECIAL TEST SERIES
UPSC MAINS 2025 – SPECIAL TEST SERIES Exclusively for those who are appearing for UPSC…
करियर मार्गदर्शन मेळावा
दहावी, बारावी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवार आयोजित विशेष करियर मार्गदर्शनपर…