सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो,
नमस्ते! नेहमीसाठीच, शाश्वतदेखील.
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छादेखील शाश्वत आहेत.
तुमचा-माझा आजचा संवाद नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात मध्यरात्रीनंतर अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा दारूच्या गुत्त्यावर (ज्याला ‘पब’ हा स्टायलिश शब्द आहे!) दारू प्यायला. त्या ‘पब’नं दारू देताना त्याला कायद्यानुसार त्याचं वय विचारलं नाही. ‘पब’ला धंदा हवाय. त्या पोराकडं आपल्या बिल्डर बापानं दिलेली पोर्शे ही अतिशय आलिशान आणि महागडी गाडी होती. ‘पॉकेट मनी’ म्हणून फक्त
५० हजार रुपये त्याला दिले होते. गाडीचा ड्रायव्हर असूनही रात्री हा पोरगाच गाडी चालवत होता. कल्याणीनगरच्या रस्त्यावरून १६० किमी वेगानं गाडी चालवत त्यानं अनीश आणि अश्विनी यांना उडवलं. त्यात दुचाकीवरून जाणारे ते दोघं गेलेच!
या घटनेनंतर जे घडत होतं, ते एक माणूस, एक भारतीय, पुण्यात राहणारा या नात्यानं एक पुणेकर म्हणून पाहताना माझ्या मनात शब्दात मांडता येणार नाही अशी भयानक अस्वस्थता तयार होत होती. व्यक्तींचंही पतन होताना मला दिसत होतं. भौतिक भोगवादाची विवेकशून्य झिंग चढली आहे. मात्र व्यक्तीच्या पतनाबरोबरच समाज आणि देश चालवणार्या व्यवस्थांचं पतनदेखील मला दिसत होतं, कळत होतं.
मुलं घरात घडतात. ‘कुटुंब’ हे त्या सामाजिक व्यवस्थेचं नाव आहे. चांगला वाग, चांगलं पहा, चांगलं बोल, चांगल्या सवयी बाळग हे संस्कार सर्वप्रथम घरात मिळतात. हे सगळं पाहत असताना कुटुंबव्यवस्थेचंही होणारं पतन मला दिसत होतं. पुढं शाळेत गेल्यानंतर मुलंमुली वर्गात बसताना, तिथं खेळताना शिकतात, शिक्षकांच्या वागण्यातून-पाठ्यपुस्तकातून शिकतात. ते नुसतं पुस्तकी शिक्षण नसतं. कळत-नकळत ते जगण्याचं मूल्यशिक्षण असतं. त्यातूनच विचार करण्याची पद्धत आपण शिकत असतो. विवेक (याला ‘तारतम्य’ हा दुसरा छान शब्द आहे.) शिकत असतो. म्हणून या घटनेतून शिक्षण व्यवस्थेचंही पतन होताना जाणवत आहे. आपली लोकशाही विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका या तीन स्तंभांवर उभी आहे. मनाला तीव्र वेदना देणारं या व्यवस्थांचंही पतन इथं दिसतं.
हे सगळं एका कल्याणीनगरच्या घटनेतून. माझ्या डोक्यातून हे जाईना. व्यक्ती आणि व्यवस्थांचं पतन तीव्र वेदना देत आहे. हे असं नीच पातळीला कोसळणं केव्हा थांबणार? की या कोसळण्याला तळच नाही? इंग्रजीत याला ‘bottomless pit’ हा शब्द आहे. पाप, अनीती, चारित्र्याचं पतन थांबणार की ते अंतहीन आहे? अशा प्रचंड अस्वस्थतेतून मनात एकीकडं हे भाष्य तयार होत गेलं.
ही अस्वस्थता घेऊनच मुंबईतल्या केंद्रावर तास घेण्यासाठी पोहोचलो. तास सुरू होण्यास थोडा अवकाश होता; म्हणून शांत बसलो होतो. मन आणि बुद्धीची घालमेल तेव्हाही सुरूच होती. त्यावेळी जे मनात भरून आलं, समोर कागद ओढला आणि पेन काढून लिहीत सुटलो. मनातल्या अतिप्रचंड अस्वस्थतेतून लेखन प्रकट झालं. म्हटलं तर तो लेख आहे; म्हटलं तर ते मुक्तछंद प्रकारातलं एक काव्य आहे. म्हटलं तर तो दोन्हींचा मेळ आहे. Spontaneous overflow of powerful emotions recollected in tranquility – निरामय शांततेत, अतिशय सशक्त आणि ताकदवान भावनांचा उत्स्फूर्त उद्रेक पुन्हा आठवणं, याला कवींनी कविता म्हटलं आहे. या घटनेबाबत माझ्या जाणिवेला जे दिसलं ते सर्वांसमोर मांडतो आहे. याच्या शब्दा शब्दाकडं लक्ष द्या; एकेका ओळीत भरभरून अर्थ मांडला आहे, हे मी नम्रपणे म्हणतो आहे.
अंतहीन पतनाचा पाठपुरावा
व्यक्ती आणि व्यवस्थेच्या पतनानं आणखी किती नीच पातळी गाठली की म्हणता येईल – आता मात्र अंत गाठला, आता इथून पुढं काही असेल तर फक्त उत्थानाच्या वाटेवर परतण्याचाच एकमेव पर्याय.
पतनानं किती नीच पातळी गाठल्यावर?
कल्याणीनगर नाव धारण करणारा पुण्यनगरीचा भाग. तिथं मध्यरात्रीनंतर दारू पिऊन तुफान वेगानं पोर्शे पळवणार्या पोरानं एका अनीश आणि अश्विनीचं आयुष्य क्षणार्धात विझवलं. याहीनंतर उलगडत जाणार्या सर्व घटितांकडे सखोल हताशा आणि संताप घेऊन पाहताना प्रश्न पडतो:
पतनाची आणखी किती नीच पातळी गाठली जाईल?
प्रश्न समयोचित आहे, पण अप्रस्तुत आहे.
कारण पतनाला अंतच असत नाही. एका नीचतेकडून आणखी तीव्र सखोल नीचतेकडे…असा पतनाचा अंतहीन प्रवास आहे.
पतनाच्या गर्तेत अप्रतिहतपणे कोसळत चाललेली व्यक्ती किंवा व्यवस्थाच जेव्हा निश्चय करेल, की आता बास, तो स्थलकालच उत्थानाच्या वाटेचा आरंभ ठरेल.
बिल्डर बापच आपल्या अठरा वर्षांखालील पोराला पॉकेटमनी म्हणून पन्नास हजार रुपये फक्त देतो!
पोरगं काय पुस्तकाच्या दुकानात जाणार?
ते जातंय अजून रीतसर नोंदणी न झालेल्या पोर्शेमधून पबमध्ये.
हल्ली अनेक आई-वडीलच मोठ्या अभिमानानं सांगतात, आमच्या मुला/मुली बरोबर दारूचा पहिला पेला आम्हीच एकत्र रिचवला.
सिंहगडाच्या पायथ्याशी पोलिसांनी शेकडो धुंद मुला-मुलींची ड्रग्ज पार्टी पकडली, तेव्हा कित्येक पालकच तत्परतेनं हजर होऊन पोलिसलाच दम देत होते, की पोरांनी या गोष्टी या वयात करायच्या, नाही तर केव्हा?
या वयात करायच्या नाही तर केव्हा, हे सूत्र व्यायामाला लागू आहे का?
पालक आपल्या पोरांना भरपूर व्यायाम कर, नियमित योग कर, शरीर-मन-बुद्धीच्या वाढीला पोषक आहार कर, तुफान वाचन कर, गडकिल्ले पाहा, ट्रेकिंग कर, कबड्डी, खोखोपासून क्रिकेट, फुटबॉल, बास्केट बॉल खेळ किंवा अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्समध्ये प्राविण्य मिळव… वगैरे सांगतात का?
उलट आता युक्तिवाद आहेत, नाही नाही दारू नाही बियर घेतो… वाईन म्हणजे काही दारू नाही! दुसरा युक्तिवाद – तसा मी पीत नाही, कधी कधी फक्त ‘सोशल ड्रिंकिंग’ करतो!
व्यसनं करणं हे पराक्रम आणि समतेचं लक्षण बनलंय.
आता काही आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतल्या घरांमध्ये एक वेळ देव्हारा किंवा पुस्तकांचं कपाट नसेल, पण फ्रिजमध्ये दारूच्या बाटल्या, किंवा कलात्मकतेनं सजवलेला, बूड टेकवल्यास गोल फिरणार्या बाकड्यांचा आणि उलटे ग्लास टांगलेला बार मात्र इमानदारीत दिसेल.
मग काही वेळा पोरं अठरा वर्षांची होईपर्यंत थांबत नाहीत. त्यांना दारू द्यायला पब आहेतच – कायदेशीर, बेकायदेशीर. पब बिचारे दरवेळी कुठे विचारत बसणार, तू अठरा वर्षांचा आहे का, म्हणून. पबमध्ये सर्वांभूती समानत्व बाळगून दारू दिली जाते! आता अनीश आणि अश्विनीच्या मृत्यूनंतर अनेक पब्जवर धडाधड कारवाई होते. तर ती आधीच, वेळेत करता येणं शक्य नव्हतं?
मग दारू प्यायलेलं अठरा वर्षाखालचं पोरगं ताशी १६० किमीच्या वेगानं पोर्शे पळवतं. अनीश आणि अश्विनी काही कळायच्या आत खलास होऊन रस्त्यावर इतस्ततः विखुरले जातात. संतापलेले लोक पोराला रस्त्यावर तुडवत असताना पोलिस येऊन त्याला घेऊन जातात.
चौकीत त्याच्यासाठी पिझ्झा मागवतात.
लोकहितदक्ष आमदार तिथे तत्परतेनं उपस्थित होतो.
१८ वर्षांखालील बालकांसाठी असलेलं ‘मंडळ’ या बालकाला ३०० शब्दांचा निबंध आणि ‘कम्युनिटी सर्व्हिस’ – अशी सुधारणांची संधी देऊन सोडून देतं.
मग पोराच्या बापाचा बाप पोर्शेच्या ड्रायव्हरला दम देतो – गाडी मी चालवत होतो म्हणून सांग, नाहीतर तुझ्याकडे बघून घेतो.
एवढी निस्वार्थ, निरपेक्ष समाजसेवा चालू असताना मग डॉक्टर तरी मागे कसे राहणार?
पोराच्या रक्तात अल्कहोल नव्हतंच हे सिद्ध करायला रक्ताचे नमुनेच बदलले जातात.
आई! आई तर मुलांकरता सर्वकाही करते, तर रक्ताचा एक नमुना काय चीज! ही आई आपल्या मुलाकरता ढसढसा रडली असं माध्यमांनी सांगितलं. त्यावेळी त्या आईला अनीश आणि अश्विनीचे आई-वडील डोळ्यांसमोर दिसले असतील का?
आता, डॉक्टरांनी एवढी वैद्यकीय सेवा सादर केल्यावर त्यांना ‘फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून अल्पसा मोबदला मिळायला हवाच की!
आणि मग निष्पन्न होतं की भ्रष्टाचार आणि शिस्तभंगाच्या कारवाईखाली असलेल्या डॉक्टरला बदली करून पुन्हा ससूनमध्ये आणा – यामागे दस्तुरखुद्द मंत्री महोदयच होते!
अपघात करणार्या पोरासाठी पिझ्झा मागवताना पोलिस काय विचार करत असतील?
पोलिसाची वर्दी हे कर्तव्याची जाणीव करून देणारं वस्त्र आहे, अधिकाराची मस्ती चढण्यासाठीचा भ्रष्ट, संवेदनशून्य डगला नाही. पोलिस खात्याचं ब्रीदवाक्य आहे – ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय च’ – आहे का लक्षात? आणि खात्याची तशी वर्तणूक?
आणि भारताचंच ब्रीदवाक्य आहे – ‘सत्यमेव जयते’. त्याचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी दारूच्या नशेत गाडी चालवणार्या पोराच्या रक्षणाला धावून जाताना काय विचार करत असेल?
रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्था? वैद्यकीय व्यवसायाचं एक आद्य सूत्र आहे – First do no harm. इथं तर डॉक्टर सक्रीयरित्या वाट्टोळं करण्यात सहभागी आहेत.
‘विवेक’ ही संज्ञा या सर्व व्यक्ती आणि व्यवस्थांच्या शब्दकोशात आहे का?
व्यक्ती आणि व्यवस्थांच्या या संवेदनशून्य पतनाच्या प्रकियेमध्ये एका अनीश आणि अश्विनीच्या बाजूनं कोण आहे?
समाजमाध्यमांमधून लोकांचा आक्रोश उमटला म्हणून पुढच्या काही हालचाली तरी झाल्या.
आता केव्हातरी तपास पूर्ण होऊन प्रकरण न्यायालयात जाणार. ‘तारीख पे तारीख’नंतर केव्हातरी, काहीतरी निकाल लागणार. त्यानंतर अर्थातच ‘अपील पे अपील’ही होत राहणारच. न्यायव्यस्थेचं आद्य सूत्र आहे – न्यायदानात विलंब म्हणजे अन्याय. तर अंतहीन पतनाच्या प्रवासात न्याय केव्हा होणार?
राज्यघटना, राज्यपद्धती, कायदे, कायद्यानं आखलेल्या कार्यपद्धती… सारं काही ‘सामान्य’ नागरिकाच्या रक्षण आणि सन्मानासाठी आहे. प्रत्यक्षात दारू पिऊन पोर्शे पळवणार्या अठरा वर्षांखालील पोरासाठी पोलिस, प्रशासन, लोकप्रतिनिधी, न्यायालयं… सारं काही आहे. सामान्य माणसालाच कोणी वाली नाही.
आणि आता हा आक्रोश उसळलेलाच आहे.
पण शेवटी प्रत्येकाच्याच पाचवीला आपापल्या आयुष्याचा संघर्ष पुजलेला आहे.
छाती फुटेपर्यंत तो संघर्ष रोज लढताना हे एवढं सगळं कुठपर्यंत लक्षात ठेवणार?
थोड्याच दिवसांत कल्याणीनगरची घटना विस्मृतीत जाईल, नाहीतरी सामूहिक स्मृती अल्पजीवी असते…
पुन्हा सारं काही शांत.
पाण्यावर काही काळ सपासप काठ्या चालवल्या, थोडी खळबळ, चार थेंब इकडे-तिकडे, मग सारं काही पूर्ववत.
हे असं कुठपर्यंत?
व्यक्ती आणि व्यवस्थांच्या पतनानं आणखी किती नीच पातळी गाठली म्हणजे उत्थानाचा आरंभ होईल?
Post a comment Cancel reply
Related Posts
महाराष्ट्राचा कौल: भारतासाठी ( डिसेंबर 2024 )
शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे. संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या…
विशेष सवलत Early E.D.G.E Concession
नवीन वर्ष – नवीन उमेद – नवीन बॅचेस 💥 चाणक्य मंडल परिवारच्या, वर्षभराच्या सर्व कोर्सेसवर…
शुभ दीपावली………पण धोकादायक वळणावर… ( नोव्हेंबर 2024 )
सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या…
चाणक्य मंडल परिवारच्या 2025-26च्या बॅचेससाठी प्रवेश सुरू
चाणक्य मंडल परिवारच्या 2025-26च्या बॅचेससाठी प्रवेश सुरू 💥 MPSC राज्यसेवा 2026 – नवीन परीक्षा पद्धतीवर…