दिवसभराचे तास संपवून घरी येत असताना बातम्या तपासत होतो. तेव्हा सगळ्यात मोठी, गंभीर, धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे धोकादायक बातमी डोळ्यापुढं आली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद बांगलादेशमधून निसटल्या. हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात आल्या.

गाझियाबादमधल्या ‘हिंदॉन’ नावाच्या तळावर त्या उतरल्या. सत्ता ताब्यात घेतल्याचं बांगलादेशच्या सैन्यानं जाहीर केलं. परिस्थिती आता सुरळीत असून नागरिकांनी लष्करावर विश्वास ठेवावा असं आवाहन बांगलादेशी लष्करानं केलं.

तरुणांचा एक मोठा गट पंतप्रधानांच्या घरात घुसला. त्याची भयानक दृश्यं आपल्याला विविध चॅनल्सवर पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात घडत असलेल्या घडामोडींना निर्णायक आकार येताना दिसत होता. भारतासाठी तो अत्यंत धोकादायक आहे. म्हणून, पाठोपाठ तो संपूर्ण जगासाठी देखील धोकादायक आहे.

बांगलादेश मुक्तिसंग्राम

भारत देशाची फाळणी झाली आणि ‘पाकिस्तान’ नावाचा इस्लामिक देश अस्तित्वात आला. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे त्याचे दोन भाग. १९४७ पासूनच त्यातल्या पूर्व पाकिस्तानवर अन्याय-अत्याचार होत होता. पूर्व पाकिस्तानला बंगाली भाषेचा वाटत असलेला जबरदस्त अभिमान हे त्यामागचं एक कारण होतं. पुढं पूर्व पाकिस्तानात विद्यमान पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांचे वडील शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं राहिलं. ‘अवामी लीग’ या पक्षाची स्थापना झाली. निवडणूक लढवताना १९७० मध्ये अशी वेळ आली की शेख मुजिबूर रहमान संपूर्ण पाकिस्तानचे पंतप्रधान होतील.

पश्चिम पाकिस्तानला ते मान्य नव्हतं. त्यावेळी पाकिस्तानी पीपल्स पार्टी या पक्षाचे झुल्फिकार अली भुट्टो हे नेते होते. पाकिस्तानी लष्कराचा सरसेनापती जनरल याह्या खान यांच्या कानी लागून भुट्टो यांनी कटकारस्थानं केली. बंगाली भाषिक दुबळे, नेतृत्व करण्यास लायक नसल्याचं ठरवत निवडणूक निकाल रद्द करवला. मात्र त्यातूनच २५ मार्च १९७१ ला स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला.

याच तारखेपासून जनरल याह्या खान याच्या लेखी सूचनेवरून पाकिस्तानी लष्करानं पूर्व पाकिस्तानात स्वतःच्याच जनतेवर भयानक अत्याचार सुरू केले. ‘ब्लड टेलिग्राम’ या नावानं अमेरिकन पत्रकार गॅरी बास यांचं या विषयावरचं अभ्यासपूर्ण संशोधन आहे. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातल्या अमेरिकन कौन्सुलेटमध्ये कौन्सुल जनरल होता – आर्चर ब्लड. २५ मार्च १९७१ या दिवशी आणि त्यानंतर अनेक महिने पूर्व पाकिस्तानात जे घडत होतं ते तो डोळ्यानं पाहत होता. या काळात घडणार्‍या गोष्टींचे टेलिग्राम तो अमेरिकन सरकारला करत होता. पाकिस्तानी लष्कर पूर्व पाकिस्तानातल्या निरपराध आणि निःशस्त्र जनतेवर अमानुष अत्याचार करत असलेलं तो पाहत होता. ‘पूर्व पाकिस्तानातल्या हिंदू पुरुषांना मारून टाका, हिंदू स्त्रियांवर बलात्कार करा’, असे लेखी आदेश पाकिस्तानी लष्कराला होते याचे वस्तुनिष्ठ पुरावे नंतरच्या काळात मिळाले आहेत. १९७१ मध्ये बांगलादेशमधून एक कोटी निर्वासित भारतात आले. त्यांपैकी ९७ लाख नागरिक धर्मानं हिंदू होते.

भारताची साथ

त्यावेळी भारत बंगाली जनतेच्या बाजूनं उभा राहिला. तत्कालीन भारतीय पंतप्रधान इंदिराजींनी देशाला जागतिक पातळीचं नेतृत्व दिलं. तत्कालीन शीतयुद्धाच्या जागतिक राजकारणात सोव्हियत रशियासारखी महासत्ता आपल्या बाजूनं ठेवली. आपल्या सैन्याला त्यांनी युद्धाच्या योजना तयार करण्यास सांगितलं. ३ डिसेंबर १९७१ ला युद्ध पेटलं. निव्वळ १३ दिवसांत भारतीय लष्कर ढाक्यात पोहोचलं. पाकिस्तानला भारतानं चारीमुंड्या चीत केलं.

१६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानी लष्कराच्या वतीनं जनरल नियाझीनं मान खाली घालून शरणागतीची स्वाक्षरी केली. बांगलादेश अधिकृत रीत्या एक राष्ट्र म्हणून २५ मार्च १९७१ लाच अस्तित्वात आलं होतं. मात्र पाकिस्तानचा अंतिम पराभव हा

१६ डिसेंबर १९७१ चा आहे. भारतासाठी तो एक दैदिप्यमान क्षण आहे. मात्र त्या क्षणातच एक दुःख दुर्दैव लपलेलं आहे. कारण काश्मीर प्रश्न सोडवण्याचीही ती एक संधी होती. पण ती संधी इंदिराजींनी घेतली नाही म्हणा किंवा त्या घेऊ शकल्या नाहीत म्हणा; तो एका स्वतंत्र विश्लेषणाचा विषय आहे. याबाबतीत मला जे म्हणायचं आहे ते ‘७५ सोनेरी पाने’ या पुस्तकात मी म्हटलं आहे.

दुसरं दुःख, पाकिस्तानी सैन्यानं पूर्व पाकिस्तानात केलेले अत्याचार, केलेल्या कत्तली, केलेल्या निरपराध्यांच्या हत्या, स्त्रियांचे सामूहिक बलात्कार याबद्दल पाकिस्तानी लष्कराला जबाबदार धरण्यासाठी भारतानं काहीच केलं नाही. किमान आपण संयुक्त राष्ट्र संघाकडं पाकिस्तान विरोधात ‘जेनोसाईड’- वंशविच्छेदची केस करायला हवी होती. ९३००० पाकिस्तानी सैन्य आपण जुलै १९७२ पर्यंत पोसलं आणि शिमला करार झाल्यानंतर भारतीय पद्धतीनं म्हणजे सन्मानानं सोडलं. सापाच्या पिल्लांना सात महिने आपण दूध पाजलं. सापाची ही पिल्लं परतली ती भारताबद्दलची धगधगती सूडभावना घेऊनच!

‘बीएनपी’ची स्थापना

१९७१ मध्ये पाकिस्तानी लष्कर पूर्व पाकिस्तानात अन्याय-अत्याचार करत असताना अशा लष्कराला बळ देणारे घटक बांगलादेशमधलेच होते. ‘बांगलादेशचे राष्ट्रपुरुष’ म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेख मुजिबूर रहमान यांची पंतप्रधानपदी निवड झाली. बांगलादेशसाठी त्यांनी लिखित राज्यघटना तयार केली. त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली राज्यघटना बहुपक्षीय संसदीय लोकशाही व्यवस्थेची होती. शिवाय ती ‘सेक्युलर’ – धर्मनिरपेक्ष होती. त्यांचेच लष्करप्रमुख जनरल झिया उर रहमान यांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून शेख मुजिबूर रहमान यांची हत्या केली. शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या शेख हसीना वाजेद त्या दिवशीच्या हल्ल्यातून वाचल्या. बांगलादेशच्या ‘राष्ट्रपुरुषा’ची हत्या करणार्‍या झिया उर रहमाननं ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ नावानं राजकीय पक्ष स्थापन केला. तो सत्तेत आला आणि त्यांनं बांगलादेशची राज्यघटना बदलली. त्यानंतर बांगलादेश इस्लामिक रिपब्लिक झालं. याचा अर्थ फक्त इस्लामला बांगलादेशात अधिकृत मान्यता आहे. मुस्लिमेतर नागरिकांना बांगलादेशाच्या राजकीय व्यवस्थेत स्वतंत्र अधिकार नाहीत.

म्हणून ऑगस्ट १९७५ पासून बांगलादेश इस्लामिक रिपब्लिक आहे. शेख हसीना वाजेद यांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश पुन्हा सेक्युलर बनवण्याचा शेख हसीना यांचा प्रयत्न देशातील सर्वोच्च न्यायालयानं हाणून पाडला. एका बाजूला १९७१ मध्ये पाकिस्तानला सहकार्य करणार्‍या शक्ती बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या रूपात एकत्र आल्या. झिया उर रहमान यांची पत्नी खालिदा झिया दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. बीएनपीचं राजकारण सर्वस्वी भारतविरोधी आहे. ते सर्वस्वी अतिरेकी इस्लामिक घटकांच्या बाजूनं आहे. या भारतविरोधाचा भाग म्हणून बीएनपी चीनच्या कलेनं घेतं. गेल्या काही काळापासून खालिदा झिया भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात होत्या. फेब्रुवारीत बांगलादेशात झालेल्या निवडणुकांवर बीएनपीनं बहिष्कार टाकला.

मूलतत्त्ववादी घटकांविरोधात कारवाई

१९७१ मध्ये पाकिस्तानी अत्याचाराला बांगलादेशातील ज्या घटकांनी मदत केली अशांविरोधात शेख हसीना यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली. अनेक मुल्ला-मौलवींनी कत्तली करण्यात पाकिस्तानी लष्कराला मदत केली होती. अशा मुल्ला-मौलवींविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले चालवत शेख हसीना यांनी या घटकांना फासावर लटकवलं. मात्र आत्ताच्या बांगलादेशात या घटनांबद्दलदेखील अस्वस्थता आहे. आत्ताच्या बांगलादेशात टोकाचा धर्मांध, इस्लामिक मूलतत्त्ववादी घटक आहे. यातले काहीजण दहशतवादाकडं वळले आहेत. मुंबईत झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे बांगलादेशपर्यंत पोहोचतात. अशावेळी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी असताना त्यांनी भारताला वेळोवेळी मदत केली. या दहशतवाद्यांनी बांगलादेशात आसरा घेतल्यानंतरही बांगलादेश सरकारनं त्यांना भारताच्या हवाली केलं. मात्र याउलट बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी सत्तेत असताना बांगलादेशातल्या भारतविरोधी घटकांना तो खतपाणी घालतो. बीएनपी सत्तेत असताना आणि खालिदा झिया या बांगलादेशच्या पंतप्रधान असताना बांगलादेश रायफल्स (बीडीआर) लेफ्टनंट जनरलच्या नेतृत्वाखाली बांगलादेशी सैन्य भारताच्या एका गावात शिरलं. त्या गावात आपला बीएसएफचा तळ होता. त्यांनी ते गाव ताब्यात घेत घेतलं. वीस भारतीय जवानांना बांगलादेश सैनिक पकडून घेऊन गेले. त्यातल्या १९ जणांना मारून टाकण्यात आलं आणि एकाला परत सोडलं गेलं. एका आडव्या काठीला आपल्या १९ जवानांचे मृतदेह बांधले होते. भारतासाठी त्यांचं हे ‘गिफ्ट’होतं. बीएनपीचं हे राजकारण आणि वर्तणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात असलेल्या अशांततेमागे देशातले इस्लामिक मूलतत्त्ववादी घटकदेखील आहेत.

बांगलादेशातल्या जमात ए इस्लामी या संघटनेवर शेख हसीना यांनी बंदी घातली होती. जमात ए इस्लामी इस्लामचा जो अन्वयार्थ सांगतं तो अत्यंत धर्मांध, टोकाचा हिंसक, आक्रमक, रक्तपाताला चालना देणारा आहे. जमात ए इस्लामी तत्त्वज्ञानाचा जन्म भारतातला आहे. उत्तर प्रदेशातील देवबंद या ठिकाणी. ही सुन्नी इस्लामची आवृत्ती आहे. जमात ए इस्लामी इतकं हिंसक, आक्रमक आणि बेकायदेशीर आहे की सौदी अरेबियातसुद्धा जमाती इस्लामर बंदी आहे. परंतु बांगलादेशमधल्या जमात ए इस्लामीच्या ऊतमाताला शेख हसीना यांनी आळा घातला.

राखीव जागा आणि आंदोलन

सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचं कारण किंवा निमित्त राखीव जागांचा प्रश्न असल्याचं सांगितलं जातं. बांगलादेश मुक्तिसंग्रामात जे लढले त्यांना आणि त्यांच्या वंशजांना विविध सरकारी नोकर्‍यात तीस टक्क्यांपेक्षा जास्त राखीव जागा होत्या. हे प्रमाण जास्त असून त्यामुळं आमची संधी जाते अशी तक्रार काही घटकांची आहे. हे आंदोलन सुरू असताना शेख हसीना यांनी आंदोलकांचं वर्णन ‘रझाकार’ असं केलं. मूळ इस्लामिक तत्त्वज्ञानात ‘रझाकार’ या शब्दाला सकारात्मक अर्थ आहे. ‘रझाकार’ म्हणजे धर्माची सेवा करणारे. मात्र हैद्राबादच्या निजामानं आणि १९७१ मध्ये बांगलादेशातल्या मूलतत्त्ववादी मुल्ला-मौलवींनी या शब्दाला एक वाईट अर्थ दिला. तो अर्थ होता धर्मांध असणं, काफीरांवर अत्याचार करणं इ. त्यामुळं शेख हसीना यांच्या या वक्तव्यानंतर देशातलं आंदोलन आणखी पेटलं. रस्त्यावर येत ‘आम्ही रझाकार आहोत’ अशा घोषणा देणं आंदोलकांनी सुरू केलं. आपण हा प्रश्न शांततेनं मिटवू, असं शेख हसीना यांनी अलीकडं जाहीरदेखील केलं होतं. राखीव जागांचं प्रमाण त्यांनी सात टक्क्यांच्या खाली आणलं; मात्र तरीही आंदोलन शमलं नाही. याचा सरळ अर्थ आहे की आंदोलनाचा मूळ हेतूच शेख हसीना यांना पायउतार करणं आणि बांगलादेशातल्या धर्मांध शक्तींचा विजय घडवून आणणं हा होता.

परकीय हात?

यात एका बाजूला अमेरिका आणि दुसर्‍या बाजूला चीन असू शकतं. आहेच असं विधान अजून करता येणार नाही. मात्र पंतप्रधान असताना आणि आता हेलिकॉप्टरमध्ये बसून भारतात (दुर्दैवानं शब्द वापरतो आहे) ‘पळून’ येण्यापूर्वी शेख हसीना वाजेद स्वतः म्हटल्या आहेत की त्यांना अमेरिकेच्या काही ऑफर्स होत्या. अमेरिकेचं म्हणणं त्यांनी ऐकलं असतं तर त्यांना निवडणूक सोपी गेली असती. मात्र अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनण्यास त्यांनी नकार दिल्यानं अमेरिकेनं बांगलादेश निवडणूक शेख हसीना आणि अवामी लीग जिंकू नयेत यासाठी प्रयत्न केले. हे सगळं फेब्रुवारीतली निवडणुक जिंकल्यानंतर त्या म्हटल्या होत्या. अलीकडेही त्या म्हणाल्या होत्या की बांगलादेश किंवा भारत यांच्यातला एक तुकडा तोडून एक स्वतंत्र ख्रिश्चन राष्ट्र तयार करण्याचे प्रयत्न अमेरिका किंवा काही शक्तींचे आहेत. चीनबद्दलही हेच आहे. भारताच्या ईशान्य भागात भारतविरोधी शक्तींना पैसा, दारूगोळा, प्रशिक्षण चीननं पुरवलं आहे. भारतात केंद्रात विविध राजकीय पक्ष सत्तेत असताना वेळोवेळी ईशान्य भारतातल्या ख्रिश्चन मिशनर्‍यांना हाकलूनदेखील दिलं आहे. म्हणून बांगलादेशमधल्या या घडामोडी अख्ख्या जगासाठी महत्त्वाच्या आहेत.

भारताची भूमिका

अगदी अलीकडंपर्यंत भारतानं ही भूमिका घेतली होती की बांगलादेशात जे सुरू आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बांगलादेशचे एक थोर विचारवंत आणि आदर्श कार्यकर्ता असलेले मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेच्या माध्यमातून देशातल्या गोरगरिबांना छोट्या आकाराची कर्ज देत त्यांना सन्मानानं जगता यावं यासाठी प्रयत्न केले. त्यांना या कामासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार आहे. त्यांच्या या कामामुळं बांगलादेशातील राजकारण्यांशी त्यांचं फाटलं. शेख हसीना वाजेद यांच्या सरकारनं एके वेळी दुर्दैवानं त्यांना तुरुंगातदेखील टाकलं. एके वेळी युनूस यांनी राजकारणात यायचं ठरवलं असतं तर ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनू शकले असते, असं त्यांचं स्थान निर्माण झालं होतं. ते मोहम्मद युनूस भारताला सांगत होते की हे आंदोलन बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न आहे असं सांगून तुम्ही त्याकडं कानाडोळा करू नका. दुर्दैवानं आता ती परिस्थिती समोर आली आहे. केवळ भारताच्याच नाही तर जगाच्याही.

जागतिक परिस्थिती

जगात एका बाजूला रशिया आणि युक्रेन युद्ध तर दुसर्‍या बाजूला ७ ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल-हमास हे युद्ध सुरू आहे. या युद्धाची व्याप्ती वाढतच आहे. हमासचा एक प्रमुख इस्माईल हनीये इराणमध्ये असताना मारला गेला. त्याला कसा आणि कोणी मारला यावरून वादविवाद सुरू आहेत. इस्रायलनं लेबनॉनमध्ये हल्ला करून ज्याला हिजबुल्लाचा ओसामा बिन लादेन म्हटलं जात होतं त्याला मारलं. सध्या लेबनॉन किंवा इराण कोणत्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करू शकतात. म्हणून आता अमेरिका इस्राईलच्या संरक्षणासाठी पुढं आली आहे. जगात हे घडत असताना चीन कधीही तैवानवर लष्करी कारवाई करेल. कमी विचार करणार्‍यांना कदाचित वाटेल हे कुठंतरी लांब चाललं आहे. भारत या सगळ्यापासून अलिप्त आहे. आपली ‘स्ट्रॅटेजिक ऑटोनोमी’ आहे वगैरे वगैरे… मुळात हा गैरसमजच आहे. मात्र आता बांगलादेशमधल्या घडामोडींमुळं त्या ज्वाला आता थेट आपल्या उंबरठ्यापर्यंत आल्या आहेत. याचा जगाला धोका असून त्यात पहिला धोका आपल्याला आहे. बांगलादेश टोकाच्या धर्मांध, रक्तपाती इस्लामिक शक्तींच्या हाती जाताना दिसतो आहे. शेख हसीना यांचं सरकार असतानाही भारताचा टोकाचा द्वेष करणारे घटक बांगलादेशात होते. बांगलादेशातल्या हिंदूंचं जीवन, पैसा, मालमत्ता सगळं धोक्यात आहे. मात्र आता भारतद्वेषी घटकांच्या हाती बांगलादेशची सत्ता जाताना दिसते आहे. आत्ताच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या सामन्यात जेव्हा भारताची ऑस्ट्रेलियाकडून दुर्दैवानं हार झाली तेव्हा भारताची हार एका उत्सवाप्रमाणे साजरी करणारे हजारो स्त्री-पुरुष, मुलं बांगलादेशमध्ये होते. अनेकदा भारत बांगलादेश मॅचमध्ये बांगलादेशचा विजय झाल्यास त्या देशानं हा विजय अत्यंत विषारी पद्धतीनं साजरा केला आहे.

थ्री अँड हाफ फ्रंट वॉर’

बांगलादेशातील घटनेमुळं भारताच्या दोन्ही बाजूच्या लगेचच्या शेजार्‍यांमध्ये धर्मांध इस्लामिक शक्ती सत्तेत असताना दिसत आहेत. जागतिक राजकारणात या दोन्ही शक्तींना काही प्रमाणात अमेरिकेची आणि मुख्यतः चीनची मदत आहे. त्यामुळं लष्करी जाणकार सांगतात की नजीकच्या काळात भारताला दोन बाजूंनी युद्ध लढण्याची (टू फ्रंट वॉर) वेळ येऊ शकते. काही जाणकार २.५ वॉर फ्रंटची संकल्पना मांडतात. यातले दोन म्हणजे चीन आणि पाकिस्तान एकाच वेळी भारतावर हल्ला करतील. त्या चीनचा भारतात वावरणारा अ‍ॅडव्हान्स एजंट म्हणजे नक्षलवाद आणि पाकिस्तानचा अ‍ॅडव्हान्स एजंट म्हणजे भारतातले इस्लामिक दहशतवादी. जाणकार या दोन्हींना ‘पॉईंट फाईव्ह’ म्हणतात. भारत दोन फ्रंटवर लढत असताना देशांतर्गत असलेल्या, देशद्रोही, धर्मांध, लोकशाही-राज्यघटना न मानणार्‍या शक्ती देशांतर्गत लढतील. शिवाय नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद यांची मिलीभगत आहे याचे अनेक पुरावे सरकारकडं आहेत. आता बांगलादेश धर्मांध शक्तींच्या हाती जाण्याच्या शक्यतेमुळं हे युद्ध ‘थ्री फ्रंट वॉर’ होऊ शकतं. म्हणून ते २.५ नाही तर ३.५ होतं.

हा काळ भारत आणि जगासाठी अत्यंत धोकादायक आहे. माझ्या मते, भारतानं बांगलादेशातील घडामोडींकडं अलिप्तपणे पाहण्याचे दिवस आता संपले. आता हा बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न नाही. बांगलादेशचे दूरदृष्टी असलेले नेते मोहम्मद युनोस यांच्याशी मीदेखील सहमत आहे. भारताला काहीतरी करून योग्य तर्हेची मध्यस्थी करावी लागणार आहे. त्यासाठी जगाचं राजकारण भारताच्या बाजूला आणण्याची गरज आहे. भारत आणि जगासाठी एक अत्यंत कठीण आव्हानांचा कालखंड सुरू झाला आहे, हे निश्चित.

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts