शनिवार, २३ नोव्हेंबरची माध्यान्ह उलटून चालली आहे.
संपूर्ण देशाचं आणि काही प्रमाणात जगाचं लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे निकाल बाहेर येत आहेत. संध्याकाळपर्यंत विविध आकडे वरखाली होत राहतील. तरीही, महाराष्ट्राच्या मतदारांनी महायुतीला निर्विवाद कौल दिला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
माझ्या मते, हा भारताच्या राष्ट्रवादी विचाराच्या मतदारांचा फार मोठा विजय आहे. प्रथमतः हा लोकशाहीचा विजय आहे. हा मतदारांचा विजय आहे. मात्र, भारत हे राष्ट्र, आणि त्यात महाराष्ट्रानं बजावण्याच्या राष्ट्रीय भूमिकेसाठी महाराष्ट्राला बळकट करायला हवं, या जाणिवेनं २० नोव्हेंबरला मोठ्या संख्येनं मतदार बाहेर पडला. महाराष्ट्राच्या मतदारांना ही संतांनी दिलेली देणगी आहे. देशाचा विचार करणं हा शिवाजी महाराजांनी घालून दिलेला वारसा आहे. लोकसभेच्या काळात अनेक कारणांमुळं ‘राष्ट्रवादी’ म्हणावा असा कोअर मतदार अनेक कारणांमुळं घरातच थांबला होता. त्याचे परिणाम भारत आणि महाराष्ट्राच्या निकालात दिसले. मात्र आता या निवडणुकीचं राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीवेळी घरात बसलेला मतदार बाहेर पडला.
२० नोव्हेंबरला रात्री उशिरा जेव्हा मतदानाचे आकडे बाहेर आले आणि असं दिसून आलं की ६५ टक्क्यांच्या पार मतदान आहे, तेव्हासुद्धा मी पहिला अभिप्राय व्यक्त केला होता, की सर्वसाधारणपणे लोकशाहीत जास्त मतदानाचा अर्थ ते ‘बदला (anti-incumbency factor)’ साठीचं मतदान असतं. मात्र २० नोव्हेंबरच्या चित्रानुसार मी मत व्यक्त केलं होतं की लोकसभेवेळी घरात बसलेला मतदार बाहेर पडला आहे. याचा फायदा महायुतीला होईल, असं माझं आकलन होतं. आकड्यांमध्ये त्याचं प्रतिबिंब पडताना दिसत आहे. आता यामुळं महाराष्ट्राला विकासासाठी आवश्यक असलेलं स्थिर सरकार मिळेल.
‘कांटे की टक्कर’, ‘निवडणूक घासून होईल’, ‘शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही’ अशा चर्चा चालू होत्या. त्यावेळी माझ्या मनात चिंता होती की अशा प्रकारे ही निवडणूक ‘कांटे की टक्कर’ झाल्यास घोडेबाजाराला चांगले दिवस येतील. खरेदी-विक्री, विविध जुळण्यांच्या नादात सरकारं, राजकारण अस्थिर राहतं. त्याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होतो. याचा अर्थ भारताच्या विकासावरही त्याचा विपरित परिणाम होतो. २६ नोव्हेंबरच्या आधी नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. ते झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, याची शक्यता देखील व्यक्त केली गेली. आता मात्र मतदारांनी स्पष्ट कौल दिल्यानं अशा प्रकारचा घोडेबाजार होणार नाही.
‘कांटे की टक्कर’ची शक्यता अमेरिकन निवडणुकीविषयी देखील व्यक्त करण्यात आली होती. काहींनी कमला हॅरिस यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र राजनैतिकदृष्ट्या डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना चारी मुंड्या चीत केलं. महाराष्ट्रातही असंच होताना दिसत आहे.
या निकालानंतर महायुतीची जबाबदारी वाढते. त्यांनी काळाचं आव्हान ओळखून ठामपणे एक स्थिर सरकार जे ‘विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र’साठी काम करेल. महाराष्ट्राचे सर्व विभाग – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईत महायुतीचा मोठा विजय होताना दिसतो आहे. नीट आकडे हाती आल्यानंतर आपण विश्लेषण करूच; मात्र असं मानायला जागा आहे की महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान केलं. त्याचा अर्थ असा की मध्यप्रदेशचे शिवराज मामा महाराष्ट्राच्याही मदतीला धावून आले! महिलांनी महायुतीच्या बाजूनं कौल दिलेला दिसतो आहे. निवडणुकीच्या काळात जो ‘मनोज जरांगे फॅक्टर’ होता आणि त्याचा काय परिणाम होईल, मी ज्याला दुःखद म्हणतो की सामाजिक दुही वाढून काहीसं मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीसं चित्र महाराष्ट्रात होईल का, तर निकालाच्या आकड्यांवरून उलटं गणित मांडायचं झाल्यास, मला व्यक्तिशः आनंद आहे की जातीय दुही निर्माण होऊन त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम होईल, असं निकालावरून दिसत नाही. दुसर्‍या जातीबद्दल वाईट बोलून माझ्या जातीतले लोक माझ्या पाठीशी उभे राहतील या प्रवृत्तीला मतदारांनी नाकारलं.
‘बटेंगे तो कटेंगे’चा कितपत परिणाम झाला याचा आकड्यांवरून विचार केल्यास त्याची शक्यता दिसून येते. मुस्लिम मतदान ‘व्होट जिहाद’चा विचार करून ध्रुवीकरण करणार असेल तर त्यातला अर्थ आणि धोका ओळखून प्रभाव पडू शकेल अशा पुरेशा संख्येनं राजकीय आणि गुणात्मक आणि वैचारिक दृष्टीनं ज्याला हिंदू मतदान म्हणता येईल, त्याचा फायदा महायुतीला होताना दिसतो.
आता मुख्यमंत्री कुणाचा? असा सूर कानावर येताना दिसतो. २३ नोव्हेंबरच्या दुपारी मी माझा अभिप्राय नोंदवून ठेवतो की मी आशा करतो की मुख्यमंत्री पदावरून महायुतीत अंतर्गत राजकारण होऊ नये. बनणारं सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बनावं आणि त्या सरकारनं स्थिरपणे विकासशील, गतिशील सरकार देऊन महाराष्ट्र नव्हे संपूर्ण राष्ट्राच्या विकासाला गती आणावी ही प्रार्थना.

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts