केरळ मदतकार्य सहभागी- Chanakya Mandal Pariwar
केरळ मदतकार्य

केरळला मदतकार्यात सहभागी होण्यासाठी ठरल्याप्रमाणं २ आणि ३ सप्टेंबरला प्रत्येकी १२० विद्यार्थी असलेल्या दोन टीम्स निघाल्या. सलग ३५ ते ४० तासांचा ‘जनरल डब्यातला’ प्रवास करून लगेचच कामाला सुरुवात करण्याचं त्यांच्यापुढं एक ‘चॅलेंज’ होतं. मुलांनी ते हसतमुखानं स्वीकारलं.

केरळला मदतकार्यात


पहिल्या दिवशी निघालेली टीम एर्नाकुलमला पोचली. प्रत्येक टीमला त्यांचं काम समजावून सांगण्यासाठी कोऑर्डीनेटर म्हणून केरळ प्रशासनातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय तिथल्या चर्चमध्येच केली होती. सकाळी उठायचं, आपापलं आवरून कोऑर्डिनेटर सांगतील त्या ठिकाणी गटागटानं मदतकार्य करण्यासाठी निघायचं. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा चर्च!

अलेप्पी जिल्ह्यात गेलेल्या टीमचे दोन भाग करण्यात आले. एका टीमला अलेप्पीपासून जवळ असलेल्या थिरुवल्लाला रवाना झाली.

अलेप्पी जिल्ह्यातला कुट्टनाड तालुका. एरव्ही निसर्गाची हिरवी शाल पांघरून ऐटीत वसलेला हा तालुका. पण आता मात्र इथलं पुराचं पाणी अजूनही ओसरलेलं नव्हतं. अनेक घरांची पडझड झाली आहे. पुराचं पाणी घरांत घुसल्यामुळं घरातली एकही वस्तू जागेवर नव्हती. गरीब कुटुंबं, ज्यांच्याकडे स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यशक्ती नाही अशांना मदत करण्याची जबाबदारी ‘चाणक्य’च्या विद्यार्थ्यांवर होती. गुडघाभर पाण्यातून वाट शोधत एका घरातून दुसऱ्या घरात जावं लागायचं. भिंतीवर पडलेले चिखलाचे डाग, घरात जमा झालेली माती, गढूळ पाणी, घरात लटकणाऱ्या वायरी या सगळ्यांचा बंदोबस्त मुलांनी लावला.

सरकारतर्फे वाटल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची पॅकेजेस घरोघरी पोचवण्याची जबाबदारीही मुलांकडे देण्यात आली होती. विविध प्रकारच्या २५ वस्तू एका पॅकेजमध्ये होत्या. सरकारी मदतकार्याचं वाटप करतानाच स्वतःजवळ असलेलं खाण्याचं साहित्य वाटून टाकताना मुलांनी विचार केला नाही. एका घरात बिस्किटं वाटत असताना तिथं राहणाऱ्या आजींना आपले अश्रू अनावर झाले नाहीत. मुलांना न करणाऱ्या भाषेत त्या आजींनी मुलांचे आभार मानले. हे सगळं एका चित्रफितीत कैद झालं होतं. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मुलांवर कौतुकाचा वर्षावही झाला.

सायंकाळी परत आल्यानंतर एकत्र बसून मुलांमध्ये आपापसात चर्चासत्र आयोजित केली जायची. दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा त्या चर्चासत्रात घेतला जायचा. कुणी काय काम केलं, उद्या ते काम आणखी कसं नीट करता येईल, त्या-त्या दिवशी केलेल्या कामातून त्यांना काय शिकायला मिळालं यावरही चर्चा व्हायची. केरळमध्ये असतानाही मुलांनी ‘चाणक्य मंडल परिवार’चा आत्मा असलेली उपासना आणि प्रार्थना एकदाही चुकवली नाही!

थिरुवल्ला जिल्ह्यातील पट्टणमthittaa या ठिकाणी असलेल्या राजीव गांधी स्टेडियममध्ये देशभरातून येणारी विविध प्रकारची मदत एकत्र केली जायची. या नंतर तिचं विभाजन होऊन ते पूरग्रस्त कुटुंबांमध्ये वाटलं जायचं. हे काम पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यानं भरलेलं हे स्टेडियम स्वच्छ करण्याची जबाबदारी मुलांना देण्यात आली. अवघ्या काही तासांत मुलांनी ते स्टेडियम अगदी चकाचक केले.

थिरुवल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांच्या कामाची पोच म्हणून त्यांना प्रमाणपत्र दिली. मदतकार्यातून आलेला अमूल्य अनुभव घेऊन ‘टीम चाणक्य’ कन्याकुमारी रवाना झाली.

कन्याकुमारी. दक्षिणेतलं भारताचं शेवटचं टोक. स्वामी विवेकानंदांमुळं ज्याला ओळख मिळाली ते ठिकाण. इथल्या शिळेवर बसूनच स्वामीजींनी तपश्चर्या केली. ११ सप्टेंबरला स्वामीजींच्या शिकागो येथील भाषणाला १२५ वर्षं पूर्ण होत होती. चाणक्य मंडलच्या कार्याच्या गुरुस्थानी असलेले स्वामी विवेकानंद. म्हणून अर्थातच मुलांनी ११ सप्टेंबरला कन्याकुमारीमध्ये असावं हे ठरलं. २४० मुलांची टीम कन्याकुमारीला रवाना झाली.