UPSC CSE Results 2021 - Chanakya Mandal Pariwar

यूपीएससी परीक्षेत चाणक्य मंडल परिवारचे १७० पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी
संस्थेची अखिल भारतीय वाटचाल सुरू

पुणे, ३० मे : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षीप्रमाणेच चाणक्य मंडल परिवारच्या १७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. ऐश्वर्य वर्मा, सम्यक जैन आणि प्रीतम कुमार यांनी देशात अनुक्रमे चौथा, सातवा आणि नववा क्रमांक मिळवला आहे.

मागील चार वर्षांपासून चाणक्य मंडल परिवारनं दिल्लीतही मार्गदर्शन सुरू केलं आहे. त्याला संपूर्ण भारतभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्यानं चाणक्य मंडलची अखिल भारतीय वाटचाल सुरू आहे. पहिल्या दहात तीन, २० मध्ये ५, ५० मध्ये १४ आणि १०० मध्ये तब्बल २६ विद्यार्थी चाणक्य मंडल परिवारचे आहेत. शुभम भैसरे, वृष्टी जैन, समीक्षा जैन, रामेश्वर सब्बनवाड, अभिजित पाटील, विशाल खत्री, प्रतीक मंत्री, सोहम मांढरे, वैभव काजळे इ. अशा अनेक मराठी चेहऱ्यांचा चाणक्य मंडल परिवारच्या यशात सहभाग आहे.

एप्रिल ते मे दरम्यान घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या आधारे परीक्षेची गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. त्यात एकूण ६८५ उमेदवार निवडले गेले आहेत. ६८५ पैकी १७० पेक्षा जास्त विद्यार्थी चाणक्य मंडल परिवारचे असून आता ते विविध पदांवर देशाची सेवा करण्यासाठी रुजू होतील.

देशात ७० वा आलेल्या नारायण मालेमपती याने चाणक्य मंडल परिवारचे आभार मानले आहेत. चाणक्य मंडल परिवार मांडत असलेले विचार मला मनापासून आवडतात अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. शुभम भैसरे, रामेश्वर सब्बनवाड, राज कृष्णा,अंशू प्रिया, प्रीतम कुमार, दीपेश कुमारी, लविश गर्ग, समीक्षा जैन अशा भारतभरातील अनेक विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडलमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

गेल्या २५ पेक्षा अधिक वर्षांपासून चाणक्य मंडल परिवार विविध स्पर्धापरीक्षाविषयक मार्गदर्शन करत आहे. संघ तसेच राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षांचे मार्गदर्शन चाणक्य मंडलकडून केले जाते. मागील काही वर्षांपासून हे मार्गदर्शन ऑनलाईन स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्रशासन स्वच्छ आणि लोकाभिमुख ठेवण्याची शिकवण चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याच मार्गावर चालत हे भावी अधिकारी ‘कार्यकर्ता’वृत्तीने काम करत ‘कार्यकर्ता अधिकारी’ होण्याचा ध्यास घेतील, असा विश्वास चाणक्य मंडल परिवारचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.

ent here