एखाद्या संपूर्ण समाजव्यवस्थेलाच, चुकीच्या मुद्द्याच्या आधारे, चुकीच्या मार्गावर नेता येतं का आणि अशी एखादी संपूर्ण समाजव्यवस्थाच चुकीच्या मार्गावर निघाली, तर त्याचे काय परिणाम होतात, हे सर्व समजून घ्यायचं असेल तर सध्याचं, अत्यंत दुःखद उदाहरण म्हणजे पंजाबमधली खालिस्तान चळवळ.
नुसते ‘पंजाब’ हे शब्द ऐकू आले तरी, खरं म्हणजे, डोळ्यापुढं उभा राहतो हिरवागार प्रदेश. अत्यंत कष्टाळू शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा प्रदेश. प्रसन्न, खेळकर, भांगडा नृत्य करणारा. पंजाब म्हणजे गुरुबानी. पंजाब म्हणजे देशभक्ती. या प्रतिमेपासून दूरदूर जात, पंजाबमधली विशेषतः अख्खी शीख समाजव्यवस्था, गेल्या ४० वर्षांत एका अत्यंत दुःखद मार्गावरून, आता एका तीव्र दुःखद मुक्कामावर येऊन पोहोचली आहे.
खरं म्हणजे, भारताच्या इतिहासात ‘शिखांचा इतिहास’ हा वेगळाच देदीप्यमान अध्याय आहे. ते शीख इतर भारतीयांपासून अजिबातच वेगळे नाहीत. महाराष्ट्राचे देखील पंजाब आणि शिखांशी धागेदोरे जोडलेले आहेत. संत नामदेव महाराष्ट्रातून भक्तीचा विचार घेऊन तेराव्या शतकात पंजाबमधल्या गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान या ठिकाणी स्थिरावले. त्यांनी पंजाबी भाषा अवगत केली. संत नामदेवांनी पंजाबी भाषेत अभंगांची रचना केली. त्यांचे हे अभंग शिखांचा धर्मग्रंथ, म्हणजेच आपल्या सर्वांचा धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथसाहिब’मध्ये आहेत. ‘शीख’ या मूळ शब्दाचा अर्थ ‘शिष्य’ असा आहे. ईश्वर एक आहे, तो निर्गुण निराकार आहे आणि ओंकारात त्या निर्गुण निराकाराचं ईश्वरत्व व्यक्त होतं, असं मानणारा हा मध्ययुगातला एक अत्यंत प्रभावी संप्रदाय. गुरुनानक देवांपासून चालू होणारी भक्ती चळवळ पाचवे गुरू अर्जुनदेव यांच्यापाशी ‘शक्ती’ चळवळीत रूपांतरित व्हायला सुरू होते. दसवे पातशहा गुरुगोविंद सिंग यांनी त्या चळवळीला आत्मविश्वासाचं, शक्ती-सामर्थ्याचं, भारतासाठी लढण्याचं रूप दिलं. त्यातून पुढं महाराजा रणजीत सिंग यांचं तत्कालीन आशियातलं सर्वात बलाढ्य असं शीख साम्राज्य उभं राहिलं.
स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा पंजाबचा, शिखांचा वाटा फार मोठा आहे. मग तो लढा सनदशीर मार्गानं असो किंवा सशस्त्र मार्गानं. भगतसिंग यांच्यापासून उधमसिंगपर्यंत आणि सुभाष बाबूंच्या आझाद हिंद फौजेतले अनेक शीख सैनिक आणि अधिकारी – असा सगळा शीख वारसा आहे. पण कुटील इंग्रजांनी त्यांच्या फुटीर डावांनुसार शिखांना भारतीय समाजव्यवस्थेपासून, हिंदूंपासूनही वेगळं काढणं, तोडणं सुरू केलं. शीख वेगळे असल्याची जाणीव जोपासली. हा उद्योग त्यांनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केला होता. भारताच्या फाळणीवेळी इंग्रज राज्यकर्त्यांनी शिखांना उचकवण्याचा प्रयत्न केला होता, की मुस्लिमांनी जशी पाकिस्तानची मागणी केली तशी तुम्ही ‘शिखीस्तान’ची मागणी करा आणि आम्ही तो देऊ! मात्र त्यावेळी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मास्टर तारासिंग यांनी या फुटीर मागणीला नकार दिला. अभिमानानं आम्ही भारतीय आहोत आणि भारतासाठी लढणं हे शिखांचं कर्तव्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली.
इंग्रजांनी दिलेल्या या फुटीरतावादी विषयाला १९८० च्या दशकात विषारी फळ लागणं सुरू झालं. त्यात अतिशय उघडं-नागडं, नीच पातळीचं पक्षीय राजकारणसुद्धा आहे. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) ही भारताची गुप्तवार्ता संकलन करणारी संस्था आहे. त्या संस्थेतले, स्वतः शीख असलेले एक अधिकारी जी. बी. एस. सिद्धू यांनी ‘खालिस्तान कॉन्स्पिरसी’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी मांडलेली खालिस्तान चळवळीची गोष्ट अतिशय धक्कादायक आहे. ’रॉ’मधले अधिकारी जी. बी. एस. सिद्धू म्हणतात, की १९८० च्या निवडणुका तत्कालीन काँग्रेस म्हणजे पंतप्रधान इंदिराजींनी जिंकल्यानंतर एक योजना तयार झाली – १९८५ ची निवडणूक जिंकण्यासाठी काय करायला हवं? तर या ‘खालिस्तानवादी चळवळीला फूस देऊन ती कणखरपणे रोखणाऱ्या इंदिराजी’ अशी त्यांची प्रतिमा तयार करण्याची योजना आखली गेल्याचं जी. बी. एस. सिद्धू यांनी आपल्या ‘खालिस्तान कॉन्स्पिरसी’ या ग्रंथात मांडलं आहे. हे सर्व धक्कादायक आहे. राजकारणसुद्धा कसं एका फुटीरतावादी वाटेवर जाऊ शकतं, याचं उदाहरण आहे. शिखांमधल्या एका घटकानं फुटीरतेची खालिस्तानची मागणी उचलून धरली. राजकीय स्वार्थासाठी या मागणीला पाठिंबा दिला गेला, तो निर्माण केला गेला आणि सगळं चित्र, जणू शिखांवर कसा अन्याय होतो आहे, त्यांना कसं कोपऱ्यात ढकललं जात आहे, त्यांचा कसा अपमान होतो आहे, असं दाखवलं गेलं. यातली एकही वस्तुस्थिती नव्हती. मात्र असं चित्र तयार करून एका संपूर्ण समाजव्यवस्थेलाच एका चुकीच्या दिशेनं, चुकीच्या वाटेवर नेण्याचा उद्योग आता गेली ४० ते ५० वर्षे सुरू आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या १९८० च्या दशकात उभी राहिलेली खालिस्तानी चळवळ यशस्वीरित्या संपली, ती संपवण्यात आली. मात्र त्यानंतर पंजाबमध्ये ड्रग्जचं व्यसन वाढत गेलं. त्यामागे पाकिस्तान, अफगाणिस्तान, आयएसआय, तालिबान यांचे पद्धतशीर प्लॅन आहेत. पंजाब हा मादक द्रव्यांच्या शगोल्डन क्रिसेंट’ मार्गावर येतो. पंजाबमध्ये तरुणांना मुद्दाम बिघडवण्याकरता व्यसन ‘पुश (push)’ करण्यात आलं. काळजी वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात पंजाबमधली तरुण पिढी या व्यसनांना बळी पडली. ती इतकी की हसणारा, खेळणारा, नाचणारा पंजाबऐवजी ड्रग्जच्या व्यसनांनी बाधित ‘उडता पंजाब’ अशी प्रतिमा तयार झाली.
समाजव्यवस्थेला एकत्र धरून ठेवणारा एक विचार असतो, विविध संस्था असतात. त्या समाजाला एक दिशा असते. पंजाबच काय, भारतालाही एकत्र ठेवणाऱ्या विचारात शीख संप्रदायाचं स्थान फार मोठं आहे. परंतु त्याला एका फुटीरतावादी, रानटी वाघावर बसवलं गेलं; आता तो रानटी वाघ आपलाच बळी घ्यायला निघाला असताना त्यावरून उतरायचं कसं, हे कोणाला माहित नाही. त्या नादात समाजव्यवस्थेची वाटचाल भीषण आणि दुःखद दिशेनं झाली.
आता त्या खालिस्तान चळवळीनं कॅनडात आपले पाय रोवले आहेत. कॅनडाच्या राजकारणात तर खालिस्तानवादी शिखांचा प्रभाव असलेला पक्ष आहे. भारतीय राजदूतांची हत्या करणारे हवे आहेत, अशा पाट्या गुरुद्वारावर लावल्या जातात. मुद्दामहून डोकं फिरवण्यात आलेले ‘खालिस्तानवादी’ (मी त्यांना ’शीख’ म्हणत नाही. ते शीख नाहीत.) लंडन, मेलबर्नसकट सॅन फ्रान्सिस्को अशा ठीकठिकाणी पद्धतशीरपणे हिंदू मंदिरांवर हल्ले करत आहेत. खालिस्तानच्या मागणीला आंतरराष्ट्रीय पाठिंबादेखील मिळतो आहे. आजच्या तारखेला भारतात आणि सध्याच्या पंजाबमध्ये मात्र खालिस्तानच्या मागणीला पाठिंबा नाही. पण सध्याच्या पंजाबची सामाजिक-सांस्कृतिक स्थिती काळजीची आहे. तिथं वेगवेगळ्या गँग्ज आहेत. खुनाच्या सुपाऱ्या दिल्या जातात. अशा गँग्जना कॅनडात आश्रय मिळतो. तरुण पिढी व्यसनाकडं वळलेली आहे.
म्हणून, एका संपूर्ण समाजव्यवस्थेला चुकीच्या मुद्द्यावर चुकीच्या दिशेनं, चुकीच्या मार्गावर नेलं तर काय घडतं, याचं दुःखद उदाहरण म्हणजे सध्याचा पंजाब!