सर्व वयाच्या मित्र-मैत्रिणींनो, नमस्ते!
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
मुळात सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच. पण इंग्रजी वर्षाचं, २०२२ असं नाव असलेलं वर्ष संपलं आणि २०२३ असं नाव असलेलं वर्ष सुरू होतंय म्हणून सर्वांना ‘हॅप्पी न्यू इयर’देखील. खरं तर कालगणना हे आपण केलेलं प्रतीक आहे. पृथ्वी स्वतःभोवती एकदा फिरते त्याला एक दिवस म्हणायचं. स्वतःभोवती फिरणारी पृथ्वी चंद्राला घेऊन सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, त्याला म्हणायचं एक वर्ष. तेव्हा रोजच एक वर्ष पूर्ण होतं आणि नवं वर्ष चालू होतं. पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणून होणाऱ्या दिवसाचं समर्थ रामदासांनी फार छान वर्णन केलं आहे – नित्य नवा दिस जागृतीचा! जीवनातला येणारा प्रत्येक दिवस एक नवी जागृती आणणारा आहे. तर ज्याच्यासाठी ‘नित्य नवा दिस जागृतीचा’ आहे त्याला रोजचा दिवस नवा आहे. रोजच काहीतरी संपलं आहे, त्यातून काही शिकायचं-धडे घ्यायचे, स्वतःमध्ये बदल करायचे आणि आपली अशी अखंड उत्क्रांती पूर्णत्वाच्या दिशेनं चालू ठेवायची. तेव्हा ३१ डिसेंबर किंवा १ जानेवारी ही आपण दिलेली नावं, संकेत आहेत.
सर्वांना शुभेच्छा द्यायला मला तर निमित्त लागतच नाही. त्या शुभेच्छा नुसत्या द्यायच्या नाहीयेत; मुळात असायच्या आहेत. त्या शुभेच्छांचं असणं शाश्वत आणि बिनशर्त असलं पाहिजे. म्हणून फक्त योग्य वेळ काळ पाहून त्या व्यक्त करायच्या असतात. त्या व्यक्त करणाऱ्याला ती संधी असते. तशा या नव्या इंग्रजी आणि सध्या जगानं स्वीकारलेल्या कालगणनेनिमित्त पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा.
अर्थात हा नुसता शुभेच्छांचा उल्लेख नाही. त्या निमित्तानं मला काही निरूपण बोलायचं आहे. आपण त्या मुद्द्यापाशी येणारच आहोत; पण एक छोटी गोष्ट सांगून त्या मुद्द्याच्या सुरावर मी उतरणार आहे. नुकतेच यूपीएससी-एमपीएससीच्या मुख्य परीक्षांचे निकाल लागले. मुख्य परीक्षांच्या निकालानंतरचा पुढचा टप्पा मुलाखतीचा असतो. त्याला यूपीएससी-एमपीएससीने वापरलेला शब्द ‘पर्सनॅलिटी टेस्ट’ (व्यक्तिमत्त्वाची चाचणी) असा आहे. निवड करणाऱ्या आयोगाला म्हणायचं आहे की वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असलेली पूर्वपरीक्षा ही तुझ्या माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा होती. ती तू पार केलीस म्हणून तुला मुख्य परीक्षेला बोलावलं. त्यानंतरची मुख्य परीक्षा ही तुझी ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा होती; ती सुद्धा तू एका चांगल्या रीतीनं पार झालास. म्हणून आता तुला समोर बोलवतो आहोत. मुलाखत म्हणजे ना तुझ्या माहितीवरील प्रभुत्वाची परीक्षा, ना ज्ञानावरील प्रभुत्वाची परीक्षा; मुलाखत म्हणजे तुझीच परीक्षा! तुझ्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा! तेव्हा सरासरी २५ ते ३५ मिनिटांच्या कालावधीत (एमपीएससी असेल तर तीन सदस्य आणि यूपीएससी असेल तर पाच सदस्य पॅनेलवर असतात) तू येतोस कसा, बोलतोस कसा, बसतोस कसा, कशा आवाजात बोलतोस हे पाहिलं जातं. या मुलाखतीला ठराविक अभ्यासक्रम नाही. जगाच्या पाठीवरचं काही विचारलं जाईल. कारण त्या सगळ्याला तू कसा/कशी सामोरं जातोस/जातेस हे पाहिलं जातं. ‘ऑफिसर मटेरियल’ कशाला म्हणायचं? तर प्रत्यक्ष प्रशासनात तुला ज्या आव्हानांना रोज सामोरं जायचं आहे त्याच्या तुलनेत ही मुलाखत म्हणजे काहीच नाही. स्पर्धापरीक्षा यशस्वी झाल्यानंतर होणारे हार-फुलं-गुच्छ-सत्कार दोन दिवसांची गोष्ट आहे. एकदा खुर्चीत बसला की कळतं त्या खुर्चीखाली बॉम्ब आहे. त्या बॉम्बची वात सतत पेटलेली आहे. प्रशासन सांभाळताना तुला रोज शंभर प्रकारच्या लोकांना भेटायचं आहे. त्यांच्या १०१ प्रकारच्या समस्या असणार आहेत. त्यांच्या जीवनात अडकलेले बोळे काढायचे आहेत. ते करताना रोज शंभर फायलींवर निर्णय द्यायचे आहेत. ते होताना रोज शंभर फोन येत असणार आहेत ज्यांना तुला उत्तरं द्यायची आहेत. कधी वरिष्ठांना भेटायचं आहे. लोकप्रतिनिधींशी संपर्क ही तर सततचीच गोष्ट आहे. या सगळ्या गुंतागुंतीतून बरोबर लोकांचं कल्याण साधायचं आहे. केव्हा कुठली अडचणीची परिस्थिती चाल करून येईल काही सांगता येत नाही, अशात चित्त शांत ठेवून बरोबर योग्य निर्णय घ्यायचे आहेत. ‘योग्य’ची व्याख्या आहे लोकांचं कल्याण. जरी एक अश्रू पुसायास आला! त्या आव्हानांच्या तुलनेत मुलाखत म्हणजे किस झाड की पत्ती!
अशा मुलाखतीत विद्यार्थ्याची विचार करण्याची शक्ती पाहिली जाते. समोर आलेल्या मुद्द्यावर हा कसा विचार करू शकतो/ते? आपल्याकडे असे ‘मॉक इंटरव्ह्यू’ होतात. त्याला खूप छान प्रतिसाद असतो. तरतरीत, तेजस्वी मुलं-मुली मुख्य परीक्षा पार करून अभिरूप मुलाखतीसाठी समोर येतात. तर एमपीएससीच्या आपल्या अशा अभिरूप मुलाखती चालू होत्या. एक तरुण मुलगा आमच्या समोर येऊन बसला. आयोगाची त्याची मुलाखत तीन जानेवारीला होती. ते लक्षात घेऊन मी त्याला प्रश्न विचारणं चालू केलं की ३ जानेवारी या दिवसाला काही महत्त्व आहे का? स्पर्धापरीक्षेची तयारी केली असल्यानं त्याला ते माहित होतं. माझ्या मते फक्त मराठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाला हे माहित असायला हवं की ३ जानेवारी ही सावित्रीबाई फुले यांची जन्मतारीख आहे. वर्गात समोर बसणारी प्रत्येक मुलगी; आज समाजात स्वातंत्र्य, समता, सन्मान आणि सुरक्षा घेऊन वावरणारी प्रत्येक स्त्री; यांनी भान बाळगलं पाहिजे की सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांच्या रूपानं असं दांपत्य जगून गेलं की ज्यांनी सोसलेल्या कष्टामुळं आज आपण प्रगतीच्या इथल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. याचं भान ठेवून आपल्याला आपलं जीवन घडवायचं आणि जगायचं आहे.
त्यामुळं एमपीएससीच्या या तरुण मुलाची मुलाखत तीन जानेवारीला असल्यानं तिथं सावित्रीबाई फुले, मग महात्मा, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे विचार, मुख्य म्हणजे आजच्या काळाला त्याचा असलेला अर्थ हे मुलाखतीमध्ये येणार. तिकडं नुसतं पाठांतर म्हणून पाहायचं नाही. तो केवळ पुस्तकी अभ्यास नाही. तर समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी उद्याचा अधिकारी असणार आहे. पुढची ३० ते ३५ वर्षे तो प्रशासनात असेल. सतत वरच्या पदांवर जात राहणार आहे. म्हणून समोर आलेल्या मुद्द्याचा याला कितपत विचार करता येतो, याची चाचणी व्हायला हवी. म्हणून मी त्याला प्रश्न विचारला, सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी भयंकर कष्ट, अपमान, तुच्छता, उपेक्षा सहन केली-झेलली-सोसली. मुलींनी शिकलं पाहिजे या तळमळीतून भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. मात्र कोरोना कमी झाल्यानंतर जेव्हा दुकानं उघडली तेव्हा पेपरमध्ये फोटो आले की दारूच्या दुकानांसमोर मुलींची भली मोठी रांग! हे पाहून महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांना काय वाटत असेल? याचसाठी केला होता अट्टाहास? ही स्वातंत्र्याची कल्पना आहे का? या प्रश्नातून तो विद्यार्थी कसा विचार करतो, हे मला पाहायचं होतं. त्यानं उत्तर दिलं, पुरुष दारू पीत असताना महिलांनी ती पिऊ नये हा त्यांच्यावर अन्याय, विषमता आहे. करायची ती आम्ही पुढं चर्चा केली.
मुलाखतीतला हा प्रश्न ते समाजाचं आजचं चित्र या सर्व पातळींवर व्यसनांचा स्वैर प्रसार दिसून येतो. विशेषतः तरुण पिढीत अशी व्यसनं अनिर्बंधपणे वाढत आहेत. दहावी झाल्यानंतर अकरावीत दारू ढोसलीच पाहिजे असं जणू शाळेच्या अभ्यासक्रमात आहे. या मुद्द्याला धरून, पुरुष पीत असतील तर स्त्रिया का नाही ही बाजू माझ्या कानावर येत असते. दारू पिणं हे मुलींमध्येदेखील मोठ्या प्रमाणात पसरत चाललं आहे. याला विकास, शिक्षण म्हणायचं? समतेची ही कल्पना? आधीच्या पिढीत घरातली बायको घरात नवऱ्याला दारूचा ग्लास भरून देत असे आणि स्वतः सॉफ्ट ड्रिंक पीत असे. आता ‘लय’ प्रगती झाली आणि पुरुष पीत असताना महिलेनं पिऊ नये असं म्हणणं ढोंग आहे हा विचार पुढं आला. हे ढोंगच आहे. मात्र समतेच्या कोणत्या वाटेवर आपण गेलो? मी पीत असेल तर तूदेखील पी ही समता? मला कळणाऱ्या महात्मा आणि सावित्रीबाई फुले, गांधीजी, विवेकानंद आणि समाजातले आजचे विवेकी-विचारी, यांची पुरुषांनी देखील दारू पिऊ नये अशी समतेची भूमिका आहे. मात्र जे शेण पुरुष खाणार ते आम्हीदेखील खाऊ इकडंच समतेची वाटचाल झाली. सिगरेट ओढून पुरुषाला मर्दानी वाटत असेल तर आम्हीदेखील ओढू, हा स्त्रियांचा विद्रोह! पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध स्त्रीमुक्तीचा आमचा विद्रोह म्हणजे आम्हीदेखील सिगरेट पिऊ! पुरुषांनीदेखील व्यसनं सोडली पाहिजेत या दिशेनं समतेची वाटचाल व्हायला हवी होती.
पुरुष-स्त्री दोघांच्याही दारू पिण्याचे परिणाम पुढच्या पिढीवर होत असतात. हा विचार करणारी विवेक शक्ती हरवलीच का? बाळाला स्त्री जन्म देते ही निसर्गाची व्यवस्था आहे. गर्भवती स्त्री आनंदी असली पाहिजे; म्हणून तिच्याभोवती आनंदी वातावरण निर्माण केलं जातं. कारण तिच्या फक्त शरीराचे नाही तर मन:स्थितीचे परिणाम सुद्धा बाळावर होत असतात. भारतीय संस्कृतीला कळलेलं हे विचारांचं हे धन आता विज्ञानसुद्धा सिद्ध करतं. मात्र स्त्रिया दारू पीत असल्यानं ब्लड अल्कोहोलचं प्रमाण वाढणं, वागण्यावरचे, मेंदूवरचे, शरीरावरचे परिणाम पुढच्या पिढीत आले तर त्याला जबाबदार कोण? पुढच्या पिढीचं भवितव्य आधीच खड्ड्यात घालण्याचा अधिकार आपल्याला आहे का? मी हे फक्त स्त्रीपुरतं बोलत नाही तर आपल्या सर्वांच्याच माणूस म्हणून असलेल्या जबाबदारी विषयी बोलतो आहे. पुरुषाच्यादेखील दारू पिण्याचे परिणाम पुढच्या पिढीवर होत असतात. तो दारू पीत असेल तर जन्माला येणारं बाळदेखील ‘अल्कोहोलिक’ म्हणून जन्माला येतं. माझा आयएएस झालेला बॅचमेट पूर्वीपासूनचा बेवडा. आता त्याचा मुलगादेखील लहानपणापासून दारू पितो. यात त्या मुलाचा दोष आहे का? मुलगा ‘अल्कोहोलिक’ असणं हे आई-वडिलांकडून येतं हे तर विज्ञानानंदेखील सिद्ध केलं आहे.
माझ्या कॉलेजच्या जीवनात आंतर-महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं घरापासून दूर गेल्यानंतर ‘आईवडिलांच्या दबावातून बाहेर आलेल्या’ पोरांचा अड्डा जमायचा आणि बॅगेतून दारूच्या बाटल्या बाहेर यायच्या. पण तेव्हा कळत-नकळत दबाव होता. कॉलेजमधल्या माझ्या दोन मैत्रिणींनी मोकळेपणानं गप्पा करताना मला सांगितलं होतं की त्यांनी एका उद्यानात एका झाडामागं लपून सिगरेटचे दोन झुरके ओढून पाहिले होते. आता प्रगती (!) झाली आणि सगळं खुलेआम साजरं व्हायला सुरू झालं. मी हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत बोलत नाही असं निदान पन्नास वेळा तरी म्हणेन!
शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करणं ही दुधाची नासाडी आहे यावरून टीव्हीवर कार्यक्रम होतात. अक्कल शिकवणारे हे लोक हिंदू धर्म, प्रथा आणि पद्धतींवर वेचून, नेम धरून टीका करत असतात. गणपती नदीत विसर्जित केल्यानं कसं नदी प्रदूषण होतं! तरीही हिंदू मन बदलत्या काळानुसार विचार करून बदलण्यास तयार आहे. दिवाळीत फटाके न उडवता तो पैसा गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देऊ, गणेश विसर्जन नदीत न करता त्यासाठी तयार केलेल्या हौदात करू. शांत चित्तानं विचार केल्यास शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण न करता ते गरिबांना दिलं जावं हे मीदेखील मान्य करेल. पुराणात, उपनिषदांमध्ये असंच करायला सांगणाऱ्या कथादेखील आहेत. मात्र शंकराच्या पिंडीवर दूध अर्पण करताना अक्कल शिकवणारे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा कोट्यावधी लिटर दारूची गटारं वहात असतात तेव्हा कुठं जातात? पुण्या-मुंबईसारख्या शहरात फाईव्ह स्टार हॉटेल्सना ३१ डिसेंबरच्या रात्रीची एंट्री फी लाखोंच्या भाषेत असते; तरीही ती पार्टी हाउसफुल होते. अर्धनग्न स्त्रिया नाचत असताना दारूचे पेले रिकामे होतात, तेव्हा लाज-लज्जा-शरम कुठं जाते? या सगळ्यातून घरं बरबाद होत आहेत, मुलांचं भविष्य बरबाद होत आहे. सार्वजनिक मीडिया कधी करतो का यावर चर्चा? समाजाची विवेक शक्तीच हरवून गेली आहे. घरात जरा सुबत्ता आली तर पहिल्यांदा दारूची बाटली आत येते. कलेचा नमुना म्हणून आज घराघरात बार तयार होत आहेत. चार पैसे जास्तीचे आले असतील तर त्यातून पुस्तक खरेदी करता येणार नाही?
सुदैवानं माझ्या लहानपणी एक श्लोक ऐकायला मिळाला आणि तो अस्तित्वावरच कोरला गेला. तो श्लोक आहे –
व्यसनानि सन्ति बहूनि
व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम् ।
विद्याभ्यसनं व्यसन
अथवा हरिपादसेवनं व्यसनम् ॥
हजारो वर्षांचं शहाणपण कळलेला ऋषी सांगतो – अनेक प्रकारची व्यसनं असतात. समाजाच्या बदलणाऱ्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं येत राहतात. मात्र दोनच व्यसनं खरी आहेत. विद्याभ्यास (परसूट ऑफ नॉलेज) – ज्ञानसाधना आणि ईश्वराच्या चरणाची सेवा! यातल्या ईश्वरसेवेची व्याख्या वेदांपासून स्वामी विवेकानंद आणि ज्ञानोबा-तुकोबांपासून गांधीजींपर्यंत सर्वांनी सोपी करून दिली – आपलं कर्तव्य नीट करणं हीच ईश्वराची सेवा आहे. ही ईश्वरसेवा गळा-माळा-टिळा यात नाही. हाती घेतलेलं कर्म शुद्ध आणि सात्विकपणे कर; तर तू जे करतो आहेस ती ईश्वर साधना आहे. ज्ञानेश्वरी सांगून झाल्यानंतर माऊलींनी अठराव्या अध्यायात अर्ध्या ओवीत सांगितलं – कर्मे ईशु भजावा. कर्म हेच ईश्वराचं उत्तम भजन आहे. लोक हाच ईश्वर आहे हे विवेकानंदांनी शिकवलं. गोरगरीब, शोषित, वंचित लोकांची सेवा करणं हीच ईश्वरसेवा आहे. हा ईश्वर समोर असताना तू कसल्या दगडधोंड्याची पूजा करतो, असं विवेकानंद खडसावून सांगतात.
ज्ञानसाधना हीच आनंद साधना आहे. आपलं कर्तव्य उत्तम करणं, आपल्या हातून समाजाची, म्हणजेच भारत मातेची सेवा उत्तम करणं ही व्यसनं सर्वांना लागोत. आरोग्य, मेंदू, विवेकशक्ती खराब करणारी व्यसनं दूर होऊन ज्ञानसाधना आणि समाजसेवा ही दोन व्यसनं लागण्यासाठी प्रार्थना करतो.