नमस्ते!
आणि अर्थातच, नेहमीप्रमाणे, कायमसाठी, सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
खूप आधीपासून मी माझ्या डायरीत एका भेटीच्या वेळेची काळजीपूर्वक नोंद करून ठेवली होती. शुक्रवार, १४ जुलै,
दुपारी दोन वाजून ३५ मिनिटं. ती ठरलेली अपॉइंटमेंट होती – टीव्हीसमोर बसणं. कारण चांद्रयान ३ चं प्रक्षेपण त्यावेळी ठरलं होतं. ते प्रक्षेपण डोळे भरून पाहणं ही माझी ठरलेली अपॉइंटमेंट!
‘चांद्रयान २’चं अपयश
त्यानुसार शुक्रवार, १४ जुलै ०२:३५ पूर्वी टीव्हीसमोर बसलो. कॉमेंटरी चालू होती. आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्याजवळचं छोटंसं श्रीहरीकोटा बेट. तिथल्या सतीश धवन केंद्रातून अवकाशयान सोडलं जातं. त्यावेळची दृश्यं पाहताना एकाच वेळी मनात काळजी, तरी आत्मविश्वास आणि त्यातून निर्माण होणारा आनंद होता. चांद्रयान २ फसलं होतं. ती दृश्यंदेखील मी ‘लाईव्ह’ पाहिली होती. तेव्हाचा सप्टेंबर २०१९ मधला क्षण जगाच्या अवकाश क्षेत्रातला ऐतिहासिक क्षण होता. अत्यंत कमीत कमी खर्चात भारतानं चांद्रयान २ अवकाशात रवाना केलं. अलीकडच्या त्याच्या सगळ्या गतिविधी यशस्वी झाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात ऑर्बिटर आणि लँडर एकमेकांपासून सुटे होऊन, ऑर्बिटर नावाचा भाग चंद्राभोवती फिरत राहणार होता, तर लँडर नावाचा भाग चंद्रावर उतरणार होता. आधुनिक भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान प्रगतीची पायाभरणी करणारे महान शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्मरण व्हावं, म्हणून त्या लॅन्डरला ‘विक्रम’ हे नाव देण्यात आलं होतं. चार वर्षांपूर्वी मी तो क्षण डोळे भरून पाहत होतो. अभ्यासाच्या आधारावर सगळी वैज्ञानिक परिभाषा मला कळत होती. सगळं काही यशस्वीरीत्या पार पडल्यास भारत जगातला चौथा यशस्वी देश ठरणार होता. मात्र ‘विक्रम’ लँडर चंद्रापासून २०० मीटरवर असताना त्यात काही बिघाड झाला आणि तो चंद्राच्या पृष्ठभागाला धडकला. त्याला ‘हार्ड लँडिंग’ म्हटलं जातं. चार पायांवर उतरण्याऐवजी तो कलला. त्या प्रक्रियेत त्याच्याशी असलेला संपर्क तुटला. चंद्राला धडकलेल्या ‘विक्रम’ लँडरमधून येणाऱ्या सिग्नलद्वारे त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी पुढचे सहा किंवा सात दिवस होते. ते सर्व दिवस आवंढा गिळून मी ती प्रक्रिया पाहिली होती. आपले शास्त्रज्ञ ही असामान्य कामगिरीसुद्धा करून दाखवतील याबद्दल आशा होती. मात्र दुर्दैवानं तसं घडलं नाही. नंतरच्या दिवसांमध्ये तो चंद्राच्या कोणत्या भागावर मोडून पडला आहे हे नासानं आपल्याला कळवलं. चांद्रयान २ फसलं होतं. म्हणून चांद्रयान ३ कडं पाहताना मनात काळजी होती आणि तरीही आत्मविश्वासदेखील होता. यावेळेस भारतीय शास्त्रज्ञ ही कामगिरी यशस्वी करून दाखवतीलच.
‘भारतीय’ असण्यातला अभिमान
स्वातंत्र्यानंतरचा भारताच्या विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचा आलेख, आपल्याला ‘भारतीय’ असण्याचा सार्थ अभिमान वाटावा, असा विलक्षण देदीप्यमान आहे. अशा या भारताच्या विविध सोनेरी पानांचा गोष्टीरूप आढावा मी माझ्या ‘७५ सोनेरी पाने’ या पुस्तकात घेतला आहे. देशाची मान ताठ व्हावी, भारतीयाला भारतीय असण्याचा अभिमान वाटावा, भारतीय असण्यात आत्मविश्वास यावा, अशी कामगिरी या शास्त्रज्ञांनी करून दाखवली आहे. आपल्या आण्विक प्रगतीची पायाभरणी करणारे
डॉ. होमी भाभा, अवकाश क्षेत्रातल्या प्रगतीची पायाभरणी करणारे डॉ. विक्रम साराभाई आणि पुढं मेघनाद साहा, शांतीस्वरूप भटनागर, होमी सेठना, डॉ. राजा रामण्णा, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. चिदंबरम, डॉ. रघुनाथ माशेलकर सर, डॉ. विजय भटकर – आपल्या सर्वांना आनंद वाटावा अशी ही शास्त्रज्ञांची यादी आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी, त्या त्या वेळी अशक्य वाटलेली किंवा अशक्य समजलेली अनेक कामं यशस्वीरित्या करून दाखवली आहेत. त्या भरवशावर माझा विश्वास होता, की आता चांद्रयान ३ चं प्रक्षेपण, त्याचं चंद्रावर उतरणं आपले शास्त्रज्ञ करून दाखवतील.
आधुनिक ऋषी
माझ्या मते, भारतीय शास्त्रज्ञ हे भारताच्या इतिहास परंपरेतले ‘आधुनिक ऋषी’ आहेत. हे खरंच लक्षात घ्यायला हवं की जगात काय काय घडत असतं. या १४ जुलैला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये होते. भारत-फ्रान्स मैत्रीचं नवं पर्व तिथं सुरू होत होतं. त्याचवेळी उत्तर भारतातली दिल्ली यमुनेच्या महापुरानं संकटात आहे. महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात ‘अल निनो’मुळं पावसाला विलंब होऊन अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मणिपूरमधल्या भयानक कृत्यानं आपण सगळे हादरून गेलो आहोत. अशा या सर्व परिस्थितीत, सार्वजनिक जीवनाच्या गर्दी आणि कोलाहलापासून दूर, कदाचित अत्यंत निसर्गरम्य ठिकाणात, आपापल्या क्षेत्रात, आपापल्या प्रयोगशाळेत हे शास्त्रज्ञ आपापल्या प्रयोगात समाधी, ध्यानमग्न अवस्थेत असतात. त्यांच्या शास्त्रीय संशोधनातून बाहेर पडणारे एकेक निष्कर्ष भारतासहित मानवतेचं कल्याण करतात. म्हणून शास्त्रज्ञ हे ‘आधुनिक ऋषी’ आहेत. या शास्त्रज्ञांनी भारताची शान वाढवली आहे. अवकाश क्षेत्रातील आपली प्रगती अनेक अपयशांनी भरलेली असताना दरवेळी आपल्या शास्त्रज्ञांनी त्या अपयशावर मात केली आहे.
‘मॅजेस्टिक’ टेकऑफ
भारताचा अवकाश कार्यक्रम पेन्सिलच्या आकाराच्या एका रॉकेटपासून सुरू झाला. सुरुवातीला अशी रॉकेट्स सायकल किंवा बैलगाडीतून वाहून नेली गेली. केरळमधल्या तिरुअनंतपुरमजवळ थुम्बा या ठिकाणी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे. आज तिथं २० हजारांपेक्षा जास्त शास्त्रज्ञ काम करत असतात. मी भाग्यवान आहे, कारण १९८५ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे शास्त्र-तंत्रज्ञान विषयक सल्लागार डॉ. वसंत गोवारीकर यांचा सहवास, मार्गदर्शन, शुभेच्छा-आशीर्वाद मला लाभले. मी तर त्यांना ‘बाबा’च म्हणायचो. थुम्बा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते प्रमुख होते. तारीख १० मार्च १९८५. ही तारीख लक्षात राहण्याचं कारण म्हणजे १९८३ ते १९८५ हा कालखंड भारतीय क्रिकेट क्षेत्राचं ‘सुवर्णयुग’ म्हणावा लागेल. १९८३ मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला. ते ‘जगज्जेते’पण आपण दोन वर्षं टिकवून ठेवलं. १९८५ मध्ये झालेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’मध्ये आपली फायनल पाकिस्तानविरोधात झाली. अत्यंत प्रोफेशनल, शास्त्रशुद्ध पद्धतीनं खेळून अर्थातच भारतानं पाकिस्तानवर मात केली. ही तारीख १० मार्च १९८५ आहे. ती मॅच मी डॉ. वसंत गोवारीकर यांच्या थुम्बा येथील घरात बसून ‘बॉल टू बॉल’ पाहिली. त्यावेळी डॉ. वसंत गोवारीकर यांनी आम्हाला विक्रम साराभाई स्पेस सेंटर दाखवलं. आधुनिक काळातला भारत देश हे करण्याच्या क्षमतेचा आहे, हे पाहून भरून येत होतं. हा राष्ट्रीय आत्मविश्वास आम्हाला विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीनं दिला आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी तो आम्हाला दिला आहे. अगदी वैयक्तिक आणि आनंदानं मी तुम्हाला सांगतो आहे, की त्या शुक्रवार १४ जुलैच्या ०२:३५ मिनिटाला विलक्षण दिमाखदार, ‘मॅजेस्टिक’ टेकऑफ पाहताना मला भरून आलेलं. डोळ्यात पाणी होतं. देशाच्या विजयाचे क्षण तुमच्या-माझ्या आयुष्यातीलदेखील विजयाचे क्षण आहेत.
रॉकेट सायन्स
१४ जुलैच्या
२ वाजून ३५ मिनिटांनी होणाऱ्या टेकऑफचं काउंटडाऊन २५ तास आधी सुरू होतं. हे सगळं घडत असताना तिथं शून्य टक्क्यांचा ‘टॉलरन्स’ असावा लागतो; म्हणूनच त्याला ‘रॉकेट सायन्स’ म्हणतात. उदाहरणार्थ, यूपीएससी परीक्षेत दीडशे शब्दांत उत्तर लिहायचं असेल तर दहा टक्के शब्द इकडं-तिकडं चालतात. ‘रॉकेट सायन्स’मध्ये तसं काहीही चालत नाही. भूतकाळात असं काउंटडाऊन सुरू असताना काही तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रक्षेपण रद्द केल्याचे क्षणदेखील आहेत. एकदा तर शेवटच्या दहा सेकंदात रॉकेटची फायर सिस्टिम काम करत नसल्यानं ते प्रक्षेपण थांबवण्यात आलं होतं. म्हणूनच १४ जुलैच्या ०२:३५ ला मी हे दृश्य डोळे भरून पाहत होतो. काळजी, आत्मविश्वास आणि आनंद घेऊन. टेन…नाईन…एट… सेव्हन… असं काउंटडाऊन होत येतं आणि बरोबर शेवटच्या सेकंदाला फायर सिस्टिम सुरू होऊन ते रॉकेट आकाशात झेपावतं. तो क्षण विश्वरूप दर्शनाचा क्षण आहे. ‘मॅजेस्टिक’! माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी होतं.
प्रक्षेपण झाल्यानंतरची पहिली काही मिनिटं महत्त्वाची असतात. दुर्दैवानं भूतकाळात अशी प्रक्षेपित केलेली यानं बंगालच्या उपसागरात कोसळली आहेत आणि दरवेळी आपल्या शास्त्रज्ञांनी त्यावर मात करून पुढच्या वेळी यशस्वी प्रक्षेपण घडवलं आहे. प्रक्षेपणावेळी आधी ‘सॉलिड फ्युएल’ काम सुरू करतं. त्यातून मिळालेली शक्ती घेत त्यानंतर ‘लिक्विड फ्युएल’ काम करणं सुरू होतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीतून बाहेर पडण्याला ‘एस्केप व्हेलॉसिटी’ हे शास्त्रीय नाव आहे. त्यासाठी सेकंदाला ११.४ किलोमीटरचा वेग गाठावा लागतो. तो वेग गाठला गेला नाही, तर ते यान गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं पुन्हा पृथ्वीकडंच येईल. त्यासाठी त्या यानाचा विशिष्ट कोनदेखील असावा लागतो. गुरुत्वाकर्षण शक्तीची ही कक्षा पार करताना त्या कक्षेच्या अलीकडे आणि पलीकडे काही काळासाठी त्या यानाशी असलेला संपर्क तुटतो. ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून ते सगळं होईपर्यंत मी पाहत होतो. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा एकदा पार केल्यानंतर प्रथम ते यान पृथ्वीभोवती फिरत राहतं. असं फिरत असताना ते आपली गती वाढवतं आणि गलोलीतून जसा खडा भिरकावला जातो तसं ते यान एकावेळी चंद्राकडं झेपावतं.
चंद्राची भेट
आताच्या योजनेनुसार २३ ऑगस्टच्या संध्याकाळी
५ वाजून ४७ व्या मिनिटाला हे यान चंद्रावर उतरायला हवं. यावेळेस तंत्रज्ञान शंभर टक्के भारतीय आहे. चांद्रयान २ च्या वेळी ते नव्हतं. उतरणाऱ्या लँडरला आता जास्त शक्ती देण्यात आली आहे आणि त्याचं ‘सॉफ्ट लँडिंग’ यशस्वी होईल, याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्याच्या आधारावर माझ्या मनात विश्वास आहे, की आता २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी भारताचं चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आणि आजपर्यंत जिथं कोणतंही मानवी यान पोहोचलेलं नाही, तिथं उतरणार. भारत त्यावेळी अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या क्लबमध्ये दाखल होईल. विज्ञानाच्या क्षेत्रातली प्रगती करत नव्या सुवर्णयुगाच्या दिशेनं भारत निघेल. शास्त्रज्ञांचा मी जेव्हा ‘आधुनिक काळातले ऋषी’ म्हणून उल्लेख करतो, तेव्हा माझ्या मनात येत राहतं की त्यांच्या क्षेत्रातली तपश्चर्या जशी ते करत राहतात; तशीच माणूस म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, आपल्या प्रत्येकाचं हे काम आहे की आपल्या क्षेत्रातली तपश्चर्या आपण करत राहिलं पाहिजे. १४ जुलै, दुपारी ०२:३५ ची वेळ जशी मी माझ्या डायरीत नोंदवून ठेवली होती, तशीच २३ ऑगस्ट ०५:४७ ची वेळ ही ‘चंद्राची भेट’ म्हणून मी माझ्या डायरीत नोंदवून ठेवली आहे. तुम्हीदेखील नोंदवून ठेवा. त्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्याहीवेळी आपण पुन्हा भेटू.
त्या वेळपर्यंत, आणि कायमच,
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!