मी केरला स्टोरी पाहिला.
मी ‘केरला स्टोरी’ पाहिली.
गेल्या अनेक वर्षांपासून अस्वस्थ, दुःखी आणि संतप्त अंत:करणानं मी ‘केरला स्टोरी’ पाहत आहे. समाजमाध्यमांत या चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर आला, तेव्हाच वाटलं होतं की आपल्याकडून हा चित्रपट बघवलादेखील जाणार नाही. पडद्यावर मांडल्या जाणाऱ्या वास्तवाचा आपल्याला त्रास होणार आहे. पाश्चात्त्य सांस्कृतिक परंपरेत एलियट आणि ओडिसी ही दोन महाकाव्यं आहेत. प्राचीन ग्रीक कवी होमर यानं लिहिलेली. वेळोवेळी त्यावर लिहिली गेलेली पुस्तकंदेखील मी वाचली आहेत. काही वर्षांपूर्वी त्यावर ‘ट्रॉय’ नावाचा चित्रपट येऊन गेला. एक असामान्य कलाकृती म्हणून तो चित्रपट नंतर टीव्हीवरदेखील वेळोवेळी पाहिला. मात्र प्रत्येक वेळी ट्रॉय पाहताना मला त्रास झाला आहे. ती अगदी वैयक्तिक पातळीवरची वेदना आहे. कारण ट्रॉय ही एका संस्कृतीच्या संपूर्ण विध्वंसाची कहाणी आहे. चुकलेले काही मानवी निर्णय, तर्हातर्हांचे डावपेच, व्यक्ती, त्यांची स्खलनशीलता, समाज आणि शासन संस्था चालवणाऱ्या सर्व व्यवस्था, त्यांची वर्तणूक या सगळ्यांच्या व्यामिश्रतेतून घेतले गेलेले निर्णय की ज्यांनी संस्कृतीवर संपूर्ण विनाश ओढवून घेतला. ट्रॉय एका संस्कृतीच्या विनाशाची कहाणी आहे. पृथ्वीच्या पाठीवरून एक आख्खी संस्कृती नामशेष होते याची ही भीषण आणि हिंसक कहाणी आहे. संपूर्ण शासनव्यवस्था, समाजव्यवस्था मिळून एक संपूर्ण संस्कृती स्वतःच्याच वागण्यामुळं कशी आत्मविनाशाकडं जाते याची ती कहाणी आहे. म्हणून ‘ट्रॉय’ पाहताना आयुष्यभर मला त्रास होत आला आहे. तीच भावना या ‘केरला स्टोरी’मागे आहे.
एक कार्यकर्ता म्हणून ‘केरला स्टोरी’ घडताना, उलगडताना आधीपासून पाहतो आहे. एक प्रकारच्या अटळ आत्मविनाशाकडं जाणारी ही कहाणी ‘केरला स्टोरी’ या नावानं प्रदर्शित झाली. बघता बघता ती कधी ‘इंडिया स्टोरी’ बनून जाईल हे सांगता येत नाही. अशा एका अटळ आणि अप्रतिहतपणे जणू एखादी भव्य संस्कृती, ती धारण करणारा दीर्घकाळचा जीवनानुभव असलेला समाज, आपल्याच निर्णयामुळं, वागण्यामुळं कसा आत्मविशाकडे जातो आहे याची दर्दभरी, संतापजनक अशी कहाणी म्हणजे ‘केरला स्टोरी’.
माझ्याप्रमाणेच अनेकांसाठी ही नवी गोष्ट नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरं घडवून आणली जात आहेत. मुख्यतः इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या नावाखाली अशी धर्मांतरं घडत आहेत. त्याचा मुख्य रोख, हल्ला हिंदू समाजावर आहे. संपूर्ण भारतभर हे सतत घडत आलेलं आहे. अजूनही घडतंय. अशा शक्तींना जागतिक पातळीवरच्या इतर शक्तींचा पाठिंबा आहे. त्या पैसा, बळ पुरवतात. आता मीडिया, फिल्म इंडस्ट्री यांच्यामार्फत अनेक गोष्टी अत्यंत पद्धतशीरपणे केल्या जाताना दिसतात. हे मी वर्षानुवर्षांपासून उघड्या डोळ्यानं पाहतो आहे आणि भारतमातेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या छोट्या आवाजात, आवाक्यात जमेल तेवढं काम करतोही आहे. मात्र ‘केरला स्टोरी’ नावानं सांगितली जाणारी कहाणी फक्त केरळच नाही, तर भारत, केवळ भारत नाही तर युरोप-अमेरिकेसहित जगभर उलगडते आहे, हे एक वस्तुनिष्ठ सत्य आहे.
आपल्या देशातले काही गट, काही संघटना, काही विचारधारा म्हणतात की हे असं काही घडतच नाहीये. त्यांच्या मते, हा राजकीयदृष्ठ्या उजव्या विचारधारेचा, विशेषतः हिंदुत्व किंवा हिंदू राष्ट्रविचार मांडणारे हे सगळं खोटं-खोटं उभं करतायेत. रूढार्थानं असं म्हणणाऱ्यांना ‘लेफ्टिस्ट’ – डावे अशी संज्ञा वापरली जाते. काहीजण त्यांना ‘लेफ्ट लिबरल’ म्हणतात. मात्र मी त्यांना ‘लिबरल’ म्हणत नाही. कारण ‘लिबरल’ म्हणजे उदारमतवादी. समोरच्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे असले तरी त्याला ते विचार मांडण्याचा अधिकार आहे, मी त्या विचारांचा गांभीर्यानं विचार करीन, त्याच्या विचारांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करीन, या दृष्टिकोनाला उदारमतवादी हा शब्द आहे. भारतातले डावे अजिबात ‘लिबरल’ नाहीत. उलट अशा डाव्यांची इस्लामिक दहशतवाद्यांशी मिलीभगत आहे. याचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणजे नक्षलवाद आणि भारताअंतर्गत असलेला पाकपुरस्कृत इस्लामिक दहशतवाद यांची मिलीभगत. भारतीय गुप्तचर संघटनांकडं तसे अहवाल आहेत. या संघटनांना, विचारांना आधार देणारे लोक मीडियात आहेत. लेखक, कवी, विचारवंत, प्राध्यापक म्हणवणारे वैचारिक जगतात आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीचा एक भाग यात सामील आहे. मला न आवडणारा ‘बॉलीवूड’ हा शब्द मी यांच्याचसाठी वापरतो. काळा पैसा, हवाला, ज्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा हात आहे, यातून भारतविरोधी, हिंदूविरोधी विचार पसरवला जातो. आपली माध्यमं तो विचार ’कला’ म्हणून उचलून धरतात. काही माध्यमं आणि चित्रपटसृष्टीच्या एका भागाला तर सरळसरळ हिंदू विरोधाचा रोग आहे.
आपल्या देशात हिंदुद्वेष वेगवेगळ्या विचारांचा बुरखा घालून येतो. प्रागतिकता, पुरोगामीत्व, सेक्युलर समाजवाद ही आजकालची गोष्ट नाही. याच केरळमध्ये १९२०-२१ मध्ये मोपल्यांचं बंड नावाचा भयानक प्रकार घडला. पहिल्या महायुद्धानंतर आपला स्वातंत्र्यलढा उभा करताना गांधीजींनी भूमिका घेतली की हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आपण मुस्लिम समाजाचे जिव्हाळ्याचे मुद्दे उचलून धरले पाहिजेत; तर मुस्लिम समाज आपल्या, राष्ट्रीय विषयात सामील होईल. त्यावेळी पहिल्या महायुद्धात इस्लामिक जगाचा सर्वोच्च प्रमुख ‘खलिफा’ – तुर्कीचा सुलतान जर्मनीकडून लढला होता. पहिल्या महायुद्धात त्याचा पराभव झाला असं मानलं गेलं. दोस्त राष्ट्रांचा (अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स) विजय झाला. त्यांनी ‘खलिफा’ हे पदच रद्द करून टाकलं. त्या विरोधात जगभरातल्या मुस्लिमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. प्रतिक्रियेचं भारतातलं चित्र म्हणजे खिलाफत चळवळ. या खिलाफत चळवळीचं भयानक हिंसक रूप केरळच्या मलबार भागात १९२०-२१ मध्ये दिसून आलं. त्यात मुस्लिम गुंडांनी हिंदू घरांवर हल्ले करून पुरुषांच्या कत्तली केल्या, स्त्रियांवर बलात्कार केले, सक्तीची धर्मांतरं घडवून आणली. याचे मूळ लेखी दस्तावेज आणि पुरावे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या दोन पक्षांची सरकारं आलटून पालटून आहेत. त्यांनी त्या मोपल्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरवलं. म्हणे ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. या कत्तली झाल्या कारण जमीनदार हिंदू होते आणि त्या जमिनीवर काम करणारे मुस्लिम भूमिहीन मजूर होते. हे हिंदू जमीनदार मुस्लिम शेतमजुरांचं शोषण करत होते. मोपल्यांचं बंड हे त्यातून उमटलेली संतप्त प्रतिक्रिया आहे, अशी मांडणी, असं आकलन डावा विचार मांडतो.
मात्र या गुंडांना इस्लामिक राज्य (शरिया स्टेट) स्थापन करायचं होतं. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते. काही काळासाठी त्यांनी तसं केलंसुद्धा. मलबारचा ‘खलिफा’ म्हणून एकाला जाहीरदेखील करण्यात आलं होतं. पुढं त्याच्यावर कारवाई झाली. इंग्रज सरकारनं त्याला पकडला. खटला होऊन फासावर लटकवला. मात्र स्वातंत्र्योत्तर सरकारांनी या गुंडांना ‘स्वातंत्र्य सैनिक’ ठरवलं.
हे सखोल फाळणीवेळी झालेली दंगल, कत्तली, बलात्कार इथपर्यंत जातं. हेच सखोल आठव्या शतकापासून भारतावर झालेल्या इस्लामिक आक्रमणांपर्यंत जातं. भारत नावाचं राष्ट्र कधी नव्हतंच, ते एका भौगोलिक प्रदेशाचं नाव आहे हे आकलन भारतातला डावा विचार मांडतो. हा डावा विचार उलट इस्लामिक आक्रमकांना समर्थन देतो. त्यांच्या मते या इस्लामिक आक्रमकांचा मंदिरं लुटण्यामागचा हेतू धार्मिक नसून आर्थिक होता. लुटमार करणारे, कत्तली-बलात्कार करणारे, बाजारात स्त्रियांना गुलाम म्हणून विकण्यासाठी उभे करणारे छात्या पेटून सांगतात की हे आम्ही इस्लामच्या नावे करतो आहे याचे लेखी दस्तावेज आहेत. तिकडं दुर्लक्ष करत आता डावे ‘विचारवंत’ म्हणतात मंदिरं लुटली गेली कारण त्यांच्याकडं संपत्ती होती. डाव्या विचारवंतांनी खऱ्याचं खोटं, इतिहासाचं विकृतीकरण केलं आहे. ते लिहितात गझनीच्या मोहम्मदानं सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलंच नाही; अलीकडच्या उजवे, हिंदू म्हणवणाऱ्यांनी इस्लाम विरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी उभं केलेलं हे खोटं चित्र आहे. बऱ्याच प्रमाणात हा विचार पाठ्यपुस्तकांमार्फत शिकवला जातो. याबाबतीत साक्षी पुराव्यानिशी जरा काही सत्य मांडण्याचा प्रयत्न झाला तर ते शिक्षणाचं, इतिहासाचं ‘भगवाकरण’ (सॅफ्रोनायझेशन) सुरू आहे असा गोंधळ उभा केला जातो. ‘केरला स्टोरी’वरची प्रतिक्रियासुद्धा अशीच आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक मुलगी सांगते आहे – माझा ब्रेनवॉश केला गेला. त्यातून मी इस्लामचा स्वीकार केला. इथून मला घेऊन गेले, मला विकण्यात आलं, माझ्यावर अनेक प्रकारचे अत्याचार झाले. आयसिस या संघटनेनं साधारण २०१० ते २०१८-१९ या काळात इराक-सीरियात भयानक थैमान मांडलं होतं. त्याला बळी पडलेली ही एक भारतीय स्त्री. असं म्हटलं गेलं की केरळमधल्या अशा स्त्रियांची संख्या ३२ हजार आहे. यावर डाव्यांनी हा दावा खोटा आहे असं म्हणत पुराव्यांची मागणी केली. पुढं ट्रेलरमधली ती ओळ गाळली गेली. ‘केरला स्टोरी’ ही तीन स्त्रियांची कहाणी आहे. एक हिंदू. त्यातली एक कम्युनिस्ट विचारधारेच्या घरात वाढलेली. एक ख्रिश्चन. या तिघींना भरकटवून इस्लामिक दहशतवादाच्या जाळ्यात ओढवून घेणारी मुस्लिम स्त्री असिफा. या कहाण्यांना सत्याचे मूळ आधार आहेत. हा राज्यघटना, कायदे आणि स्त्रीच्या सन्मानाचासुद्धा प्रश्न आहे. मात्र याला नाकारत हे प्रचारकी, ‘राईट विंग’ आहे असं म्हणणाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं करावं लागेल. अशांना ‘माणूस’ तरी म्हणावं का, असा प्रश्न केला तरीही ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशा कहाण्या फक्त केरळच नाही, तर महाराष्ट्रासहित भारतभर आणि भारतच नाही तर जगभर घडत आहेत. आयसिसचं साहित्य जगभर उपलब्ध आहे. अत्यंत भयानक हिंसक आक्रमकतेनं ते भरलेलं आहे. आम्हाला सर्व जगाला मुस्लिम करायचं आहे; जे होणार नाहीत अशा ‘काफीरां’ची ‘वाजीब ए कत्ल’ म्हणजे कत्तलच. अशा आयसिस जाळ्यात फक्त भारतच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेतल्या मुलीदेखील फसल्या आहेत. प्रथम इस्लाम हा धर्म त्यांना मनापासून पटला म्हणून त्यांनी आपला धर्म सोडून इस्लाम स्वीकारला. कुणीतरी मुस्लिम पुरुषाशी त्यांचं लग्न झालं. काहीजणी आयसिसच्या बाजूनं स्वेच्छेनं लढण्यासाठी, सेवा करण्यासाठी इराक-सीरियात गेल्या. त्यातल्या काही समोर दिसलेल्या भयानक सत्यानंतर बदलल्या; पण काही बदलल्या नाहीत. काहीजणी तितक्याच कठोर आणि इस्लामिक नकारात्मक विध्वंसाच्या आहेत. हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे; फक्त केरळ किंवा भारत नाही.
तिकडं ब्रिटनचा पंतप्रधान ऋषी सुनाक म्हणाला की तो ‘ग्रूमिंग गँग’ विरोधात कारवाई करणार आहे. मुख्यतः पाकिस्तानी असलेले मुस्लिम पुरुषांचे गट व्हाईट आणि मुख्यतः ख्रिश्चन मुलींना फसवतात, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात किंवा प्रेमाचं नाटक करून त्यांच्याशी संबंध ठेवतात. सगळ्याचा मुख्य हेतू – त्यांना मुसलमान करणं. अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या ब्रिटिश मुलींच्या बाजूनं खटले नोंदवण्यासाठी ब्रिटिश पोलिसांसमोरदेखील अडचण होती. यात ‘रेशल प्रोफाईलींग’ – कुणा एका समाजाला, विचाराला टार्गेट करणं या आरोपाचा धोका होता. त्यासाठी पोलिसांना कारवाया करता आल्या नाहीत. हे आकडे मोठे आहेत आणि या कहाण्यादेखील भयंकर आहेत.
आयसिसला बळी पडलेल्या स्त्रियांचं पुढं काय झालं हे ऐकवत किंवा बघवत नाही. इराकच्या उत्तरेतल्या डोंगराळ भागात याझिदी नावाची फार पूर्वीपासूनची जमात आहे. हे भाषेनं किंवा वंशानं अरब नाहीत. ते स्वतःला मुस्लिम मानतात. या व्यतिरिक्त त्यांचा मोरावर बसलेला एक देव आहे. या देवाची मंदिरं आहेत. भारतीय शैलेशी या मंदिरांचं साधर्म्य आहे. धर्मांध आयसिसनं यझिदींच्या गावांवर हल्ले केले. पुरुषांना पकडून रांगेत उभं केलं, त्यांच्यासमोर त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार केले आणि मग त्या स्त्रियांसमोर त्या पुरुषांना मारून टाकण्यात आलं आणि त्या स्त्रियांना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून ठेऊन घेतलं. संशोधन करून या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. त्यातल्या एका पुस्तकाचं नाव ‘आयसिस ब्राईड्स’ आहे. माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक हे नदिया मुराद या याझिदी स्त्रीनं लिहिलेलं ‘द लास्ट गर्ल’. हे आत्मकथन आहे. तरुण याझिदी मुलगी. आयसिसनं तिच्या गावावर छापे घातले. पुरुषांची कत्तल केली, तिच्यासहित स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. पैशांसाठी बाजारात विकलं. या नरकातून सुटका करून घेण्यासाठी नदिया मुरादनं दोन-तीन वेळा प्रयत्न केले त्यात ती पकडली गेली. शिक्षा म्हणून ज्यानं तिला ‘विकत’ घेतली होती त्या तिच्या ‘मालका’नं तिच्यावर सामूहिक बलात्काराचे आदेश दिले. या कहाण्या भीषण आहेत.
आपल्या देशात मात्र या कहाण्या सांगायच्या नाहीत, असं वैचारिक वातावरण आहे. सांगितल्या तर त्या खोट्या ठरवल्या जातात. आकडा ३२००० नाही तर तीन आहे असं म्हटलं जातं. क्षणभर हा आकडा तीन मानला तरी हे गंभीर नाही? त्यात अन्याय-अत्याचार नाही? या ‘केरला स्टोरी’चा दिग्दर्शक, कथा-पटकथा-संवाद लिहिणाऱ्यानंसुद्धा नीट अभ्यास करून केलेलं काम आहे. एकेका वाक्यामागं सत्य आणि संशोधन आहे. गेल्या काही महिन्यांत केरळमध्ये मुख्यालय असलेली इस्लामिक, टोकाची धर्मांध आणि हिंसक संघटना पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया)वर कारवाई झाली. आता त्यावर बंदी आली आहे. या संघटनेचे लेखी दस्तावेज आहेत की २०४७ पर्यंत संपूर्ण भारत ‘इस्लामिक स्टेट’ बनवणं हा हे आमचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्व भारतीयांना भल्याबुऱ्या मार्गानं मुसलमान करायचं आहे. भारताची राज्यघटना, कायदे, त्या कायद्यासमोर सर्व समान, त्या कायद्याचं सर्वांना समान संरक्षण या मुद्द्यांना हे आव्हान नाही? पण एका खोट्या दांभिक वैचारिकतेपायी या सगळ्याचा विरोध केला जातो. असा विरोध ‘काश्मीर फाईल्स’ लाही झाला. काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांवर सांगता येणार नाहीत इतके भयानक अत्याचार झाले. पण ते झाले असं म्हणायचंदेखील नाही. मोपल्यांचं बंड – झालंच नाही. इस्लामिक आक्रमणं – झालीच नाहीत. गझनीच्या मोहम्मदानं मंदिरं उध्वस्त – केलीच नाहीत…कहाणी चालू राहते!
‘केरल स्टोरी’ नुसती केरळची नाही. भारताची आणि जगाची सुद्धा आहे. ती जर पुढं व्हायला नको असेल तर आपण सर्वांनी ‘केरल स्टोरी’ समजून घेतली पाहिजे आणि अर्थातच एका शांत डोक्यानं, राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत समर्थपणे आपलं काम केलं पाहिजे; तर २०४७ मधल्या विकसित, समृद्ध आणि जगालाही आरोग्य, शांतीचा मार्ग दाखवणारा भारत आकाराला येईल.