आज तुमच्याशी गप्पा मारण्याच्या विषयाची सुरुवात दुःखद कारणामुळं होत आहे. हा दुःखद विषय तुमच्या-माझ्या जीवनाच्या मूलभूत मुद्द्यापर्यंत जातो. ३ एप्रिलच्या पहाटे या भारतवर्षाचे, महाराष्ट्राचे, सार्वकालिक उत्तम म्हणावेत, असे असामान्य आयएएस अधिकारी शरद काळे सर हे विश्व सोडून अनंताच्या प्रवासाला निघाले. जायचं आपल्या सर्वांनाच आहे. माणसाचं आयुर्मान कसं वाढवता येईल, यावर आधुनिक काळात संशोधन सुरू आहे. आता ते दीडशे वर्षापर्यंत वाढवता येईल, ‘मृत्यूच नाही’ असं जगता येईल, असं कुणी म्हणतं. आपला एक ‘जीन’ प्रयोगशाळेत निव्वळ शून्य (अबसोल्यूट झिरो) तापमानाला ठेवता येईल आणि त्या ‘जीन’मधून आपण जसे आहोत तसे पुन्हा निर्माण होऊ शकतो, असं कुणी म्हणतं. या संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपटदेखील निघत आहेत. तरीही जन्माला आलेल्या प्रत्येकाला शेवट आहे, माणूस मर्त्य आहे, हे शाश्वत सत्य आहे. तसे शरद काळे सर ३ एप्रिलला हे जग सोडून गेले.
माझी अशी भावना आहे, की व्यक्ती म्हणून त्यांचे-माझे आणि पुढं आयएएस सोडून चाणक्य मंडल परिवारचं कार्य सुरू केल्यानंतर, संघटनेशी त्यांचे खूप जवळचे ऋणानुबंध आहेत. शरद काळे सर आम्हाला वरिष्ठ. १९८६ ची माझी आयएएसची बॅच. शरद काळे सरांची १९६३ ची. अतिशय शांत स्वभावाची व्यक्ती. कामाला अत्यंत पक्के. चाणक्य मंडल परिवारच्या स्वच्छ आणि कार्यक्षम अशा ‘कार्यकर्ता अधिकाऱ्या’चं एक आदर्श उदाहरण. ते मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. हे पद नेहमीच एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला मिळतं. या पदाची समकक्षता महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांशी आहे. मुंबईसारख्या गुंतागुंतीच्या, जगड्व्याळ शहराचा कारभार शरद काळे सर त्यांच्या विलक्षण शांत, सौम्य, सात्विक बोलण्यातून सांभाळायचे. मात्र त्यांचा कारभार ठाम असायचा. प्रभावी आयएएस अधिकारी होण्यासाठी तुम्ही ‘डायनॅमिक’ असलं पाहिजे, असं कुणाला वाटलं; आणि असं ‘डायनॅमिक’ असणं म्हणजे बाह्यतः, विशेष आकर्षक शारीरिक व्यक्तिमत्व, उंच, देखणा, अमिताभ बच्चन सारखा आवाज, तर हे सगळे गैरसमज आहेत. प्रत्येक माणसाचा स्वभाव जसा वेगळा असतो, तसा तो प्रत्येक अधिकाऱ्याचादेखील वेगळा असतो. मुद्दे हाताळण्याची प्रत्येक अधिकाऱ्याची आपापली अशी वेगळी शैली असते. प्रशासनात अशा सर्व स्वभाव आणि शैलींना स्थान आहे. चाणक्य मंडल परिवारमध्ये आपण ‘स्व’ची ओळख शिकवतो. अग किंवा अरे तू स्वतःला ओळख आणि तू जो आहेस तोच रहा. काही जणांचा गैरसमज होऊ शकतो, की स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणजे तडफदार, चालण्यात वेग, आक्रमक व्यक्तिमत्व – हे ‘स्टिरिओटाईप’ आहेत. या सगळ्याची खरंच आवश्यकता नाही.
शांत, सौम्य असलेले शरद काळे सर साध्या कपड्यात असायचे. मुळात महाराष्ट्राच्याच प्रशासनाचं हे विलोभनीय वैशिष्ट्य आहे. साधारणपणे महाराष्ट्र प्रशासनात वावरणारे वरिष्ठ अधिकारी पोषाखी, कायम सुटाबुटात, लोकांपासून लांब नाहीत. शरद काळे सर त्याचं एक आदर्श उदाहरण. मात्र प्रशासन, कायदे, नियम, फायली, त्यांची कार्यपद्धती या सगळ्यांवर सरांची जबरदस्त पकड होती. काम करताना एक प्रकारच्या धीमेपणानं मात्र योग्यरीत्याच करणार.
आत्ताची पिढी विसरली असेल – त्यावेळी मुंबईचे उपायुक्त (ते आयएएस नसतात. सेवेतल्या पदोन्नतीतून ते त्या पदापर्यंत पोहोचलेले असतात.) असे गोविंद राघो खैरनार
(गो. रा. खैरनार) यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचार आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबद्दलचे अत्यंत गंभीर आरोप केले होते. ते उपायुक्त असताना शरद काळे सर आयुक्त होते. पदावरचा उपायुक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करू शकतो का याबद्दलचे वर्तणूक नियम (conduct rules) आहेत. त्यांनी केलेले आरोप नियमांना धरून आहे का, त्यामुळे खैरनार यांच्यावर कारवाई करा, असा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला तेव्हा कायदे आणि नियमांच्या आधारेच, मात्र अतिशय ठामपणे आणि शांतपणे शरद काळे सर खैरनार यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या या भूमिकेनंतरही व्यक्ती म्हणून ते शरद पवारांशी ‘वाकड्यात गेले’ असं कधी झालं नाही. आदरपूर्वक सांगायचं तर काही असामान्य अधिकारी शरद पवार यांच्या खास विश्वासातले होते. ते त्यांच्या जवळचे होते. त्यासाठी ते शरद पवार यांच्या पुढंपुढं करायचे किंवा त्यांची हांजी हांजी करायचे, असं नाही. याउलट चार गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या झाल्यास ते बिचकायचे नाहीत. नि:पक्षपातीपणाला बाधा येऊन देता आपल्या प्रशासकीय कुवतीमुळं जे शरद पवार यांच्या जवळचे होते अशांपैकी एक शरद काळे सर होते. ते राज्याचे नियोजन सचिव असताना मी राज्याच्या मुख्य सचिवांकडे विशेष कार्य अधिकारी या पदावर होतो. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव
डी. एम. सुकथनकर सर होते.
शरद काळे सरांप्रमाणेच सुकथनकर सरदेखील प्रशासनातले ‘रोल मॉडेल’. आधी म्हटल्याप्रमाणं प्रत्येक अधिकाऱ्याची प्रशासन चालवण्याची शैली वेगळी असायची. सुकथनकर सरसुद्धा एके काळी मुंबई महापालिका आयुक्त होते. सुदैवानं सर अजूनही आपल्यात आहेत. त्यांना शतायुषीहून अधिक आरोग्यदायी आणि आनंदी जीवन लाभो यासाठी मी प्रार्थना करतो. मी फलटणला असिस्टंट कलेक्टर होतो. तिथं दोन वर्षं काम केल्यानंतर पहिलं प्रमोशन मिळणार होतं. महाराष्ट्र केडरमध्ये पहिल्या प्रमोशनमध्ये आयएएस अधिकारी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर) बनतो. मला याबद्दल आनंद आहे की तेव्हा राज्याचे मुख्य सचिव डी एम सुकथनकर सर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांचं कार्यालय सांभाळण्यासाठी व्यक्तिशः मला उचलून घेतलं. सरकारी भाषेत या पदाचं नाव डेप्युटी सेक्रेटरी टू चीफ सेक्रेटरी असं आहे. या पदासाठी आवश्यक असलेली वरिष्ठता माझ्याकडं नव्हती. तरीही सुकथनकर सरांनी ‘डीएस टू सीएस’ हे पदाचं नाव बदलून ‘ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी)’ टू चीफ सेक्रेटरी या पदावर मला घेतलं.
फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनात आमूलाग्र बदल करून ते स्वच्छ, कार्यक्षम, लोकाभिमुख, वेळच्या वेळी कामं करणारं, लोकांना हेलपाटे मारायला न लावणारं, कालबद्ध पद्धतीनं निर्गती (disposal) करणारं प्रशासन निर्माण केलं होतं. त्यासाठी हाताखालच्या स्टाफचं ट्रेनिंग घेतलं होतं. राज्याचे मुख्य सचिव या नात्यानं हे सगळं सुकथनकर सरांनी पाहिलं होतं. म्हणून जेव्हा पदोन्नतीची वेळ आली तेव्हा त्यांनी मला उचलून थेट मंत्रालयाचा पाचवा मजला – राज्याच्या मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी या पदावर घेतलं. हा मोठा सन्मान होता. पाय जमिनीवर असले तर कळतं की हा एक सन्मान आणि त्याच्या दसपट मोठी जबाबदारी आहे. महाराष्ट्राचं अख्ख प्रशासन पाहायला मिळणं, महाराष्ट्राचा जिथं देशाशी संबंध येतो ते पाहायला मिळणं, हाताळायला मिळणं, त्यातून आपला आवाका तयार होणं, त्यानिमित्तानं अनुभवांचं प्रचंड भांडार जमा होणं, हे सगळं मला तिथं मिळालं. मनात मी सुकथनकर सरांचा नितांत ऋणी असतोच.
सुकथनकर सरांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ होतं. सर्वसाधारणपणे हसतमुख आणि ‘जॉली’ स्वभावाचे सुकथनकर सरसुद्धा एके वेळी मुंबईचे आयुक्त होते. आयुक्त या नात्यानं मुंबईच्या सर्व नगरसेवकांशी ते इतक्या मैत्रीपूर्ण नात्यानं वागायचे की त्यांची जेव्हा आयुक्त पदावरून बदलीची वेळ आली, तेव्हा सगळे पक्षभेद बाजूला ठेवून मुंबईच्या सर्व नगरसेवकांनी एकमतानं ठराव केला की त्यांची बदली करू नका, आम्हाला तेच आयुक्त म्हणून हवे आहेत! म्हणून सुकथनकर सर काही राजकीय वशिलेबाजी करत होते, राजकारण्यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये राहण्यासाठी झुकत होते असं अजिबात नाही. मात्र वागण्याची त्यांची शैली अत्यंत मैत्रीपूर्ण होती. मुंबईच्या नगरसेवकांबद्दल ‘दीज आर माय जॉनीज (बडीज किंवा फ्रेंड्स)’ असा उल्लेख ते करायचे. मात्र प्रशासन चालवताना कामाला चोख आणि पक्के. म्हणून शरद काळे सर हे एक व्यक्तिमत्व, शैली आणि त्यातून प्रशासन हाताळण्याची एक पद्धत; तर सुकथनकर सर हेसुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व, वागण्याबोलण्याची त्यांची शैली आणि त्यातून प्रशासन हाताळण्याची त्यांची पद्धत. आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण अत्यंत प्रभावी.
ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असताना मला गुंतागुंतीची एक फाईल बघायला मिळाली. मंत्रालयातल्या अनेक विभागांच्या फायली शेवटी सचिवालयाकडे यायच्या. त्या फायली वाचायच्या, त्यांचा अभ्यास करायचा आणि त्या मुख्य सचिवांच्या नजरेस आणायच्या इ. हे माझं काम होतं. बारामती नगरपालिकेत भूमिगत गटार तयार करण्याविषयीची ती फाईल होती. सरकारी नियमानुसार त्यावेळी बारामती नगरपालिका ब वर्ग गटात येत होती. सरकारी धोरणानुसार ‘ब’ वर्ग गटातील नगरपालिकांना भूमिगत गटार योजनेसाठी सरकारकडून निधीची व्यवस्था नव्हती. त्यासाठी आधी ‘अ’ वर्ग गटातील महानगरपालिकांना प्राधान्य दिलं जात होतं. बारामती म्हणजे स्वतः शरद पवारांची नगरपालिका. ही फाईल आली तेव्हा स्वतः शरद पवार मुख्यमंत्री होते. बारामती नगरपालिका क्षेत्रात भूमिगत गटारं पाहिजेत यासाठी नगरपालिकेनं एके वेळी अर्ज केला होता. सरकारी धोरणानुसार ‘ब’ वर्ग गटातील नगरपालिकांना भूमिगत गटारांसाठी सरकारी अनुदान मिळण्याची व्यवस्था नाही, असं औपचारिक उत्तर त्यावेळी देण्यात आलं होतं. तर बारामती नगरपालिका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या नगरसेवकांचं प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मांडलं होतं, की बारामती नगरपालिका क्षेत्रात भूमिगत गटारं बांधण्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून निधी उभा केला आहे; आम्ही उभ्या केलेल्या निधीइतकेच समान राज्य सरकारनं द्यावेत (सरकारी भाषेत याला ‘मॅचिंग ग्रांट’ म्हणतात).
मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यांच्या शैलीत त्या निवेदनावर लाल पेनानं त्यावर ‘एस पी’ अशी सही केली होती. काही सूचना, आदेश नाही. फक्त ‘एस पी’. ती फाईल त्यानंतर नगरविकास मंत्रालयाकडं जाते. नगरविकास मंत्रालयानं भूमिका घेतली की बारामती नगरपालिकेनं स्वयंप्रेरणेनं लोकसहभागातून निधी उभा केला आहे, ही आनंदाची बाब आहे आणि त्यासाठी सरकारनं ‘मॅचिंग ग्रांट’ द्यावी आणि भूमिगत गटारांची योजना करावी. नियमानुसार ही फाईल पुढं वित्त विभागाकडं गेली. वित्त विभागानंसुद्धा अशी ‘मॅचिंग ग्रांट’ द्यावी असं म्हटलं. शेवटी मुख्य सचिवांद्वारा ती फाईल कॅबिनेटसमोर जाण्याआधी नियोजन विभागाकडं येते. नियोजन विभागाचे त्यावेळचे वरिष्ठ सचिव होते शरद काळे सर. ही फाईल मुख्य सचिवांकडे येण्याआधी त्या फाईलवर सर्वात शेवटची कमेंट शरद काळे सरांची होती. त्यांनी लिहिलं होतं, ‘ब’ वर्ग नगरपालिकेला भूमिगत गटारांसाठी शासकीय निधी देण्याचं धोरण नाही. यापूर्वी बारामती नगरपालिकेनं अर्ज केला होता त्याचवेळी त्यांना उत्तर देण्यात आलं होतं. त्यावर बारामती नगरपालिकेनं लोकवर्गणीतून निधी गोळा केला असेल तर ती गोष्ट अभिनंदनास पात्र आहे. बारामती नगरपालिकेला सांगण्यात यावं की अशाच प्रकारे लोकवर्गणीतून संपूर्ण निधी उभारण्यात यावा आणि भूमिगत गटारांचं काम पूर्ण करावं. मात्र सरकारी धोरण बाजूला सारून एकट्या बारामती नगरपालिकेचा अपवाद करणं योग्य ठरणार नाही. ‘ब’ वर्ग गटातील नगरपालिकांना सरकारी निधीची व्यवस्था नाही. अत्यंत शांत, ठाम आणि योग्य शब्दांमध्ये अशा प्रकारचं भाष्य शरद काळे सरांनी तिथं मांडलं होतं. ती फाईल वाचताना त्यांच्या स्वभावातील शांतपणा, सात्विकता तरीही विषयाच्या मुळाशी जात मुद्द्याला पक्के राहण्याचा त्यांचा स्वभाव दिसत होता. बाकी कुणाहीबद्दल अनादर न बाळगता सांगतो की बाकीचे विभाग किंवा संबंधित अधिकारी ‘बारामती नगरपालिकेची फाईल आहे त्यावर स्वतः शरद पवारांची सही आहे’ म्हणून ‘मोअर लॉयल दॅन द किंग – राजापेक्षा राजनिष्ठ’ म्हणून त्यांनी मूळ धोरण बाजूला ठेवून बारामती नगरपालिकेचा अपवाद करत निधी दिला जावा, अशी बाजू मांडली. मात्र शरद काळे सरांनी राज्याला लागू असलेलं सर्वांसाठीचं समान धोरण मांडून त्याला एकट्या बारामतीचा अपवाद करणं योग्य ठरणार नाही, असं मांडलं. विशेष म्हणजे या मताशी स्वतः शरद पवार यांनी सहमती दर्शवली. ही सहमती दर्शवण्याची त्यांची शैली असते. शरद काळे सरांच्या कॉमेंटसमोर त्यांनी लाल पेनानं कंस केला आणि तिथं ‘A’ असं लिहिलं. खाली आदेशामध्ये वाक्य होतं ‘A’ प्रमाणे मान्य. म्हणून मी तरुण मुला-मुलींना सांगतो की तुम्ही काम नीट करा; घटना, कायदे, नियम आणि मानवी नीतिमत्ता सांभाळून शेवटी राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा असे अधिकारी हवे आहेत. राजकीय नेत्यांनीदेखील ही प्रगल्भता दाखवली पाहिजे.
मी सुकथनकर सरांकडे ‘ओएसडी’ असताना मला जे शिकायला मिळालं त्यातला एक किस्सा सांगत होतो. महाराष्ट्रात तेव्हा ‘वसई-विरार भूखंड’ नावाचं प्रकरण खूप गाजलं. वसई-विरारची मोठी आरक्षित जमिनीवरचं आरक्षण काही कारणांमुळं उठवण्यात आलं. यामागे वसई-विरारमधलं अंडरवर्ल्ड, त्यावेळी डॉमिनेशन असलेला अंडरवर्ल्ड डॉन भाई ठाकूर, त्यावेळी भाई ठाकुरचं नातं दाऊद गँगशी होतं. या प्रकरणात मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर प्रचंड मोठे आरोप झाले. ‘भूखंडाचा श्रीखंड’ हा शब्दप्रयोग तेव्हा गाजला. ही १९९१-९२ च्या दरम्यानची गोष्ट आहे. हा सगळा प्रश्न विधानसभेत चर्चेला आला. विधानसभा सभापतींनी विषय स्थगित करून सरकारला आदेश दिला की याविषयीची भूमिका सर्व कागदपत्रांसहित पारदर्शकपणे विधिमंडळासमोर मांडा. ही कागदपत्र मांडणं आणि राज्य सरकारला शिफारस करणं ही जबाबदारी मुख्य सचिव या नात्यानं सुकथनकर सरांवर येऊन पडली. वसई-विरार भूखंडाच्या फाईलवर स्वतः सुकथनकर सरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सहा पानी नोट लिहिली होती. मी स्वतः ती वाचली आहे. अभ्यास काय चीज असते, नेमक्या आणि अचूक शब्दात drafting करणं काय असतं, हे सगळं करत असताना कायदा आणि नियमांवर बोट ठेवत सरकारला योग्य सल्ला देणं हे सरकारी अधिकाऱ्यांचं काम नक्की कसं असतं, याचं खरोखर आदर्श उदाहरण म्हणजे ‘वसई-विरार भूखंडाच्या’ प्रकरणावर सुकथनकर सरांनी लिहिलेली सहा पानांची नोट आहे. सविस्तर अभ्यास करून सुकथनकर सरांनी सरकारला शिफारस केली होती की भूखंडावरचं आरक्षण उठवणं हा निर्णय अयोग्य आहे. तो बदलून मूळ आरक्षण पुन्हा स्थापित करावं. मुद्द्याचं गांभीर्य लक्षात यायला हवं. हे आरक्षण उठवल्याचे गंभीर आरोप तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर होत होते. अशावेळी मुख्य सचिव या नात्यानं, नीट अभ्यास करून राज्य सरकारला शिफारस करायची आहे तेव्हा सुकथनकर सर बिचकले नाहीत!
असे सर्वार्थानं सार्वकालिक महान म्हणावेत असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सदाशिवराव तिनईकर सर. प्रशासन हाताळण्याचं तिनईकर सर म्हणजे आणखी एक ‘रोल मॉडेल’. कठोर स्वभावाचे, त्यांची जीभ म्हणजे तलवार होती. अत्यंत पारदर्शक – जे मनात तेच बोलणार – He means what he says, he says what he means! बोलण्यात तडफदार, प्रसंगी आक्रमक. काहीसे ‘शॉर्ट टेम्पर्ड’. (पुढं कधीतरी तुम्हाला टी. एन. शेषन सरांच्या गोष्टी सांगेन!) म्हणून तिनईकर सर व्यक्तिमत्व स्वभाव म्हणून ही आणखी एक शैली. १९८१ च्या सुमारास ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तिनईकर सर उच्च पदावर होते. अंतुले यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. मी करत असलेल्या कारभाराविषयी तुम्हाला काही म्हणायचं असेल तर सांगा, असं ते आयएएस अधिकाऱ्यांना म्हणाले. राजकीय पुढाऱ्याला न आवडणारं, त्याला न रुचणारं शक्यतो काही बोलू नका, हे आयएएस अधिकाऱ्यांच्या ध्यानी असतं. तिनईकर सर त्या स्वभावाचे नव्हते. मुख्यमंत्री म्हणून अंतुले यांचं सवय किंवा पद्धत होती की ते बाहेर कुठंतरी अनेक योजनांची घोषणा करायचे आणि नंतर मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्याला बोलवून ती अमलात आणण्याची सूचना करायचे. खरं म्हणजे प्रशासन चालवण्याची ही योग्य पद्धत नाही. राजकीय पुढाऱ्याला बाहेर कसली घोषणा करायची असेल तर त्यावर प्रशासन आधी अभ्यास करतं. त्याच्या फाइल्स तयार होतात. लोकशाही प्रक्रियेनुसार त्यावर निर्णय तयार होतो आणि शेवटी तो निर्णय राजकीय नेता समाजाला सांगतो. अंतुले यांचं या उलटं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जेव्हा अंतुले विचारत आहेत, माझ्या कारभाराविषयी काही सूचना असेल तर सांगा; तर ‘व्यावहारिक शहाणपणा’नुसार माणसानं गप्प बसावं मात्र गप्प बसतील तर ते तिनईकर सर कसले? मीटिंगमध्येच तिनईकर सर अंतुलेंना म्हणाले – तुमचे निर्णय आधी आम्हाला फाईलवर पाहायला मिळाले पाहिजेत. मात्र आता आम्हाला ते वृत्तपत्रात वाचायला मिळतात आणि नंतर फाईलवर एवढं मी तुमच्या लक्षात आणून देतो! मुख्यमंत्री अंतुले मीटिंगमध्ये त्यावर हसले.
मात्र तिनईकर सर त्या दिवशी जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांना फोन आला की तुमची ट्रान्सफर करण्यात आली आहे! ते ठिकाण, ते पद मुंबई बाहेरचं होतं (मला सगळा तपशील माहिती आहे.) मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की उद्या सकाळी तिथून मुख्यमंत्र्यांना फोन करा. तिनईकर सर दुसऱ्या दिवशी नव्या जागेवर रुजू झाले आणि तिथून त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला – आदेशानुसार नव्या पदावर रुजू झालो आहे! चांगल्या अधिकाऱ्यानं बदलीला बिचकायचं नसतं.
म्हणून तिनईकर सरांचा त्यांचा एक वेगळा स्वभाव. तो स्पष्टवक्ता, तडफदार. तेसुद्धा मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. गो. रा. खैरनार यांना तिनईकर सरांनीसुद्धा संरक्षण दिलं होतं. मात्र तिनईकर सर आक्रमक स्वभावाचे होते. भ्रष्टाचाराच्या मागे लागायचं तर खोलात जाऊन ते प्रकरण तडीस न्यायचे. त्यातून अनेकदा नगरसेवकांशी त्यांच्या चकमकीदेखील झाल्या. मात्र कठोर, स्वच्छ प्रशासनाचा एक आदर्श असे तिनईकर सरसुद्धा होते. असे तीन वेगवेगळे स्वभाव असलेले, आपल्या कामात उत्तम असलेल्या अधिकाऱ्यांशी माझा जवळचा संबंध आला याबद्दल मी भाग्यवान आहे.
माझं पहिलं पुस्तक ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ १९८९ मध्ये प्रकाशित झालं. तेव्हा मी फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर होतो. Conduct rule नुसार प्रशासकीय अधिकाऱ्याचं काही ‘नॉन-फिक्शन’ लेखन प्रकाशित करायचं असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. हे पुस्तक काय आहे याचा नीट तपशील तयार करून मी माझ्या कलेक्टरकडं पाठवला. तेव्हा साताऱ्याचे कलेक्टर एस. एल. कुलकर्णी सर होते. तो तपशील मी त्यांच्याकडे पाठवला. त्यांनी तो पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे पाठवायचा. अरुण बोंगीरवार सर तेव्हाचे विभागीय आयुक्त. त्यांनी तो तपशील पाठवायचा राज्याच्या मुख्य सचिवांकडे. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त तेव्हा आणि आजही राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले राजकीय विषय होते. खलिस्तान चळवळ, काश्मीर प्रश्न, आसाममधली बांगलादेशी घुसखोरी असे ते विषय. ऑब्जेक्शन घ्यायचं असतं तर कुणी म्हणू शकलं असतं की सरकारी अधिकाऱ्यानं सरकारी यंत्रणेत असताना राजकीय विषयांवर भाष्य करणं योग्य नाही. तर ते पुस्तकच प्रकाशित झालं नसतं. माझं भाग्य की त्यावेळचे माझे कलेक्टर एस. एल. कुलकर्णी सर, माझे विभागीय आयुक्त अरुण बोंगिरवार सर आणि राज्याचे मुख्य सचिव या नात्यानं सुकथनकर सर या सर्वांनी पुस्तकाला अनुकूल भूमिका घेतली. सुकथनकर सरांसोबत काम करताना मला माझ्या अर्जाचा मूळ कागद पाहायला मिळाला. तो वाचून सुकथनकर सरांनी त्या पत्रावरच ‘हे पुस्तक प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात यावी’ असा आदेश दिला होता. तेव्हा जराही कुणी एका ओळीचंदेखील ऑब्जेक्शन घेतलं असतं तर हे पुस्तक प्रकाशित होऊ शकलं नसतं. माझ्या दृष्टीनं ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ला इतकं महत्त्व होतं की मी त्याच वेळी राजीनामा दिला असता. मात्र ती वेळ आली नाही.
आज मी तुमच्याशी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद भूषवलेले तीन असामान्य वरिष्ठ आयएएस अधिकारी – शरद काळे सर, सुकथनकर सर आणि तिनईकर सर यांच्याबद्दल बोललो. तिनईकर सर आपल्यातून जाऊन बरीच वर्षं झाली. वेगळे स्वभाव, वेगळी व्यक्तिमत्त्वं, प्रशासन हाताळण्याची प्रत्येकाची वेगळी शैली; मात्र प्रशासनात यातला प्रत्येकजण अत्यंत प्रभावी. असे ते ‘स्वच्छ आणि कार्यक्षम कार्यकर्ता अधिकारी’ होते. सर्वांप्रती मी आनंद आणि आदर व्यक्त करतो. तुम्ही आपापला स्वभाव ओळखून असे अधिकारी होण्याच्या कमला लागा आणि यशस्वी व्हा यासाठी प्रार्थना करतो.