तेलुगु चित्रपट ‘आरआरआर’मधलं गाणं ‘नाटू  नाटू’ला ‘बेस्ट ओरिजनल साँग’ अंतर्गत ऑस्कर मिळाला. माझ्यासकट संपूर्ण भारताला आनंद झाला. हा आनंद व्यक्त करताना मला तुमच्यासमोर तिकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडायचा आहे.

‘आर आर आर’ हा चित्रपट स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातल्या एका देदीप्यमान अध्यायाचं काल्पनिक चित्र मांडतो. अस्सल भारतीय मातीत मुरलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा मौली हे तर आता अखिल भारतीयच नाही तर जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक बनले आहेत. मी हे मांडत असताना एकीकडे तुम्हाला ‘बाहुबली’ आठवत असणार, याबद्दल मला खात्री आहे. ‘बाहुबली’नंसुद्धा त्यावेळची अनेक रेकॉर्ड्स् मोडली. चित्रपट, कला म्हणून उत्तम, उत्तम मॅजिक रियालिझम मांडलेला असणं, दिग्दर्शन, अभिनय यांसोबतच हा चित्रपट ‘भारतपणा’ मांडतो. राजा मौली जे चित्रपट देतात त्यात हे दिसून येतं.

आणखी एका गोष्टीचा आनंद वाटायला हवा. ती म्हणजे, परवापरवापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी(बॉलिवूड) जणू भारतीय चित्रपट जगताचा मुख्य प्रवाह मानला जात होता. इतर चित्रपटसृष्टी प्रादेशिक मानल्या गेल्या. खरं म्हणजे तेव्हादेखील यात तथ्य नव्हतं. हिंदीमधून जितके चित्रपट वर्षाला निघतात त्यापेक्षा जास्त चित्रपट तेलुगुमधून कायमच निघत आले आहेत.

एके काळी जागतिक प्रतिभेचे, सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे महान दिग्दर्शक सत्यजित रे यांचे चित्रपट आता काहीशा जुन्या तंत्रज्ञानावर आधारित, ब्लॅक अँड व्हाईट असायचे. पण या चित्रपटांना सत्यजित रे यांची दृष्टी होती. ‘अपू ट्रायलॉजी’ हे एक उत्तम उदाहरण. पथेर पांचाली हा विभूतीभूषण बंडोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट सत्यजित रे यांनी तयार केला. सगळ्या जगानं त्यावेळी त्याची दखल घेतली.

दक्षिण भारताकडं पाहिलं तर असं दिसून येईल की प्रत्येक राज्याची समृद्ध अशी चित्रपटसृष्टी, साहित्य, कलासंस्कृती आहे. यांची पाळंमुळं भारतीय मातीत सखोल रुजली आहेत. कन्नड भाषेत तयार झालेला ‘कांतारा’ हा चित्रपट सर्वांनी पाहिला असेल. आदिवासी समाज, त्याच्या जगण्या-वागण्या-बोलण्याच्या सांस्कृतिक-धार्मिक संकल्पना भारतपणापासून दूर नाहीत. या संकल्पनांभोवती फुलवलेला हा चित्रपट विलक्षण चरमसीमेला जातो. कांताराचं संगीतदेखील गाजलं. मल्याळम चित्रपटांनीदेखील भारत आणि जागतिक पातळीला भारतीय संस्कृती मांडली आहे. अशी संस्कृती जी विविधतेनं नटलेली आहे आणि जिला त्या विविधतेतली एकता कळलेली आहे. अदूर गोपालकृष्णन यांच्यासारखे गाजलेले दिग्दर्शक मल्याळम चित्रपटसृष्टीने दिले. अलीकडे निघालेला ‘जय भीम’ हा तमिळ चित्रपट आपण पाहिला. तो पाहून झाल्यानंतर भारावलेपणाची भावना असेल. तामिळनाडूमधला एक आदिवासी घटक, त्यांचं जगणं-वागणं, त्यांच्या जीवनाचा संघर्ष, होणाऱ्या अत्याचाराचा सामना, कोणत्याही भारतीय मनाला आनंद वाटेल असं ‘जय भीम’ हे शीर्षक!

तमिळ चित्रपटसृष्टीला तर दीर्घकाळचा सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा वारसा आहे. तत्कालीन मद्रास प्रांतात उभ्या राहिलेल्या समाज सुधारणा चळवळीचं आधीचं नाव जस्टिस पार्टी. पुढं संघटनेला द्रविड कळघम हे नाव आलं. तिचे मूळ विचारवंत पेरियार रामास्वामी नायकर. त्यांचा उजवा हात आणि शिष्य म्हणावेत असे अण्णा दुराई. या गुरु-शिष्यात काही ताणतणाव उद्भवले आणि अण्णा दुराई यांनी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ ही द्रविड अस्मितेची संघटना स्थापन केली. तिनं निवडणूक लढवणं सुरू केलं. माहित नसेल तर आश्चर्य वाटेल की १९६४ पर्यंत ‘आम्ही भारतीय नाही’ अशी या द्रविड मुन्नेत्र कळघमची भूमिका होती. भारतीय म्हणजे बाहेरून आलेले आर्य. हा असत्य, चुकीचा इतिहास ब्रिटिश इतिहासकारांनी भारतात घुसवला. आर्यांनी द्रविडांचा पराभव करून त्यांना दक्षिणेकडे ढकललं असा ब्रिटिशांनी मांडलेला सिद्धांत स्वातंत्र्यानंतर मुख्यतः डाव्या विचारवंतांनी पुढं सुरू ठेवला. (हा लेख लिहिला जात असताना पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ डोकं वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. वारिस्ते पंजाब असं नाव घेऊन तिचा नेता अमृत पाल सिंग स्वतःला जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा वारस म्हणवतो. खलिस्तान चळवळीला पाकिस्तानचा सक्रिय पाठिंबा आहे, हे वेगळं सांगायला नको. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातला डावा घटक खलिस्तानच्या मागणीला पाठिंबा देतो. भारतातल्या डाव्या इतिहासकारांनी भारतीय इतिहासाचा मांडलेला चुकीचा अन्वयार्थ – त्याला लागत असलेली ही फुटीरतावादाची विषारी फळं आहेत.) १९६४ मध्ये फुटीरतावादाची भूमिका सोडून देत, आम्ही भारतीय आहोत, तमिळ लोक आणि संस्कृतीच्या संरक्षण-संवर्धनासाठी भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेच्या चौकटीत राहून आम्ही काम करू, असं अण्णा दुराई यांनी जाहीर केलं. द्रविड मुन्नेत्र कळघमचा नाटक, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात समृद्ध इतिहास आहे. स्वतः अण्णा दुराई कथा-पटकथा आणि संवाद लेखक होते. अण्णा दुराई यांच्या कारकिर्दीत आपला सामाजिक मुद्दा लोकप्रिय करण्यासाठी या संघटनेनं शिवाजी महाराजांवर तमिळ भाषेत नाटकं लिहिली आहेत आणि स्टेजवर आणली आहेत. सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता शिवाजी गणेशन. त्याचं  मूळ नाव शिवाजी नव्हतंच. पण शिवाजी महाराजांवरील नाटकांत अस्सल भूमिका केल्यानं आयुष्यभरासाठी त्याला हे नाव मिळालं.

मी हे मांडत असताना तुमच्या मनात रजनीकांतदेखील आहे, याबद्दल मला खात्री आहे. तो मूळचा मराठी आहे. सासवडचा. नाव शिवाजी गायकवाड. नोकरी करण्यासाठी चेन्नईमधल्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होता. काम करत असताना विनोदबुद्धीतून त्याचे चाळे चालायचे. ते चाळे एका तमिळ दिग्दर्शकानं पाहिले. त्याच्यातला गुणी कलाकार हेरला. आज रजनीकांत म्हणजे तामिळ अमिताभ बच्चन आहे! सार्वकालिक श्रेष्ठ असा तामिळ दिग्दर्शक मणिरत्नमचा काश्मीरच्या पार्श्वभूमीवरचा ‘रोजा’ हा चित्रपट, मुंबईत झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवरचा ‘बॉम्बे’ चित्रपट. त्यातलं ए आर रहमानचं संगीत. काही वर्षांपूर्वी ए आर रहमानला ‘बेस्ट ओरिजनल म्युझिक’ ‘जय हो’साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा लेख वाचून झाला की ‘जय हो’ हे गाणं पुन्हा एकदा ऐका. त्याचवेळी मूळ भारतीय कादंबरीवर आधारित चित्रपटाला ऑस्करमध्ये अनेक पुरस्कार मिळाले होते. मूळ कादंबरी ‘क्यू अँड ए (क्वेश्चन अँड आन्सर)’. मला आनंद आहे की या कादंबरीचा लेखक माझा बॅचमेट असलेला आयएफएस अधिकारी आहे. विकास स्वरूप त्यांचं नाव. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणून बराच काळ ते होते. हॉलीवूडचा दिग्दर्शक डॅनी बॉईल यानं या कादंबरीवर आधारित ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट तयार केला. म्हणून हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषांत कला, साहित्य, चित्रपट यांची समृद्ध परंपरा आहे.

मुळात मराठी माणसाला याची याचा अभिमान वाटावा की संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचीच पायाभरणी दादासाहेब फाळके या असामान्य प्रतिभावंत मराठी माणसानं केली. त्यांना १९२० च्या सुमारास हॉलिवूडचं निमंत्रण होतं. ते नाकारून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली. मुंबईत बॉलीवूड (मला हे नाव आवडत नाही)ची पायाभरणी दादासाहेब फाळके यांनी केली त्यामुळं इथं फिल्म उद्योग उभा राहिला. राजा हरिश्चंद्र हे त्यांच्या पहिल्या चित्रपटाचं नाव. अलीकडच्या वर्षांमध्ये दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित एक चांगला चित्रपट निघाला त्याचं नाव ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’. मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा कात टाकून नवं, प्रतिभाशाली रूप धारण करते आहे, याबद्दल मला खात्री आहे. दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीच्या तुलनेत निर्मितीमूल्य मराठीत कदाचित कमी दिसेल. मात्र सामाजिक जाणिवेचं अंग असलेली प्रतिभा मराठी चित्रपटातून आजही व्यक्त होताना दिसते.

म्हणून भारताच्या प्रतिभेचा अनेक अंगानी होत असलेला अविष्कार आनंददायक आहे. मात्र पाश्चात्यांच्या मापाने स्वतःला मोजणं आपण बंद केलं पाहिजे, असं मला वाटतं. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाला ही आनंदाचीच गोष्ट आहे. मात्र ऑस्कर मिळाल्यानं हे गाणं मोठं ठरतं असं नाही. उलट हा चित्रपट असामान्य आहे हे ऑस्करलादेखील कळलं! पाश्चात्यांनी उभ्या केलेल्या मानदंडाला आपण पुरलो तर आपण आपली पाठ थोपटून घेणं बंद व्हायला हवं. एक प्रकारे ही बौद्धिक गुलामी आहे. आमच्या देशाच्या संस्कृती कला, नृत्य, संगीत, साहित्य अशा सर्व अंगांनी फुलणारी आहे याचं आत्मभान हवं.

या गाण्यात दोघं अभिनेते मस्त नाचले आहेत. भारतीय नृत्याचीदेखील वैविध्यपूर्ण मात्र मुळाशी एकात्म असलेली परंपरा आहे. ती थेट वेदांपर्यंत पोचते. भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, मोहिनीअट्टम (या नृत्यप्रकाराला आयुष्य अर्पण करणाऱ्या कनक रेळे काही दिवसांपूर्वी आपल्यातून गेल्या), कथकली, छाऊ, ओडिसी, मणिपुरी असे शास्त्रीय किंवा लोकनृत्याचे विविध प्रकार ही भारताची समृद्ध परंपरा आहे. म्हणून मूळ भारतीय कलाकृतीला ऑस्कर मिळालं तरच ते मोठं ठरेल असं आपण म्हणू लागलो तर ती गुलामी ठरेल. म्हणूनच मला बॉलीवूड हे नाव आवडत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर लॉस एंजलिस या शहरात असलेलं उपनगर ‘हॉलिवूड’ इथं अमेरिकेची चित्रपटसृष्टी आहे. ते त्यांच्या चित्रपटसृष्टीला ‘हॉलिवूड’ म्हणत असतील तर आम्ही आमच्या चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ म्हणू. शिवाय थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचं झालं तर रूढार्थानं ज्याला बॉलीवूड म्हणतात तिच्या एका मोठ्या भागावर अंडरवर्ल्डचं प्रभुत्व आहे. पाकिस्तानी आयएसआयसकट अनेक संघटना त्यामागं आहेत. स्त्री शोषण ही त्यातली एक दुःखद गोष्ट आहे. गुणी, प्रतिभावंत अभिनेता असूनही बॉलीवूडमधल्या एका टोळक्याला तो नको असला तर त्याचं करियर बरबाद केलं जातं, त्याला मुंबईतून पळवून लावल्याची उदाहरणं आहेत.

पाश्चिमात्य मानदंड भारतातलं काय उचलून धरतात, इकडेही लक्ष द्यायला हवं. ‘स्लमडॉग मिलेनियर’बद्दल आनंद असला तरी त्यात दाखवलेला भारत हा दरिद्री, मागासवर्गीय, अंधश्रद्धांनी भरलेला आहे. ते चित्र पाश्चिमात्त्यांकडून उचलून धरलं जातं. आजकाल पाश्चिमात्त्य युनिटनं भारतातली एखादी गोष्ट उचलून धरली, त्याला पारितोषिक दिलं तर त्यावरून मी माझं मत बनवतच नाही. याउलट त्यात काही भारतविरोधी गणित आहे का, कोणते धागेदोरे जुळलेत का हे तर मी तपासूनच पाहतो.

अशा पुरस्कारांमध्ये राजकारणदेखील असतं. स्ट्रॅटेजिक धोरणंसुद्धा असतात. भारताची मोठी बाजारपेठ काबीज करायची असेल तर अचानक अनेक भारतीय स्त्रिया ओळीनं मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स व्हायला लागतात. म्हणजे जणू पाश्चिमात्त्य मानदंडानं सुंदर म्हणेपर्यंत भारतीय स्त्रिया सुंदर नव्हत्या. इथं प्रश्न सौंदर्याचा नाही. मात्र ही गोष्ट त्यांच्या ‘गेम प्लॅन’चा एक भाग असते; ती आपल्याला खायला घातली जाते. एका सावधपणानं आपण तिकडं पाहिलं पाहिजे.

डोळ्यासमोर नोबेल पुरस्कार आणा. आता तर हे उघडपणे सिद्ध झालं आहे की अनेक वेळी नोबेल पुरस्कारांमध्ये अनेक प्रकारचं राजकारण असतं. एके वेळी मलाला युसुफझाई आणि कैलाश सत्यार्थी यांना एकत्रित नोबेल पारितोषिक देण्यात आलं. कोणता विचार होता यामागे? मलाला युसुफझाई ही पाकिस्तानातली एक शाळकरी मुलगी. मुलींनी शिक्षण घेऊ नये या तालिबानी वृत्तीच्या विरोधात ती शाळेत जात होती. म्हणून तालिबान्यांनी तिला गोळी घातली.

त्यातून ती वाचली, पुढं शिकत राहिली. त्या मलालाला नोबेल पारितोषिक आहे. मग तिच्याबरोबर जोडले गेले कैलाश सत्यार्थी. गांधीजींच्या विचारांच्या प्रभावातून कैलाश सत्यार्थी यांनी आपलं आयुष्य लहान मुलांच्या कल्याणाकरता वाहिलं. ‘बचपन बचाओ’ हे त्यांचं आंदोलन भारतभर पसरलं आहे. या कार्यासाठी आयुष्य अर्पण केलेल्या कैलाश सत्यार्थींना मलाला युसुफझाईसोबत जोडलं गेलं. ‘एक हिंदू आणि एक मुस्लिम यांना नोबेल पारितोषिक’ हे त्यावर्षीच्या नोबेल पुरस्काराच्या शब्दरचनेतसुद्धा आहे! पाश्चिमात्त्य देशांचा भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन ‘भारत-पाकिस्तान’ असा ‘हायफनेटेड’ आहे. बदलत्या राजकारणामुळे आता हा दृष्टिकोन बदलता बदलतो आहे. आता ‘अफ-पाक’ (अफगाणिस्तान-पाकिस्तान) हे ओबामांनी केलेलं वर्णन वापरलं जातं. भारताच्या स्वतंत्र आणि सार्वभौम स्थानाला आता जागतिक मान्यता मिळते आहे. मात्र ‘एक हिंदू आणि एक मुस्लिम’ असं नोबेल पुरस्कार द्यायचं ही त्या समितीची बुद्धी! या नोबेलनं कधी गांधीजींना शांततेचा पुरस्कार दिला नाही. चार वेळा गांधीजींचं नाव नोबेल पारितोषकासाठी आलं होतं. काहीतरी कारणांमुळं ते गळलं. म्हणजे गांधीजी दुर्लक्षित होते असं नाही; मात्र बऱ्याच वर्षांनंतर नोबेलच्या संयोजकांनी हे मान्य केलं की ही त्यांची चूक होती. म्हणून ऑस्कर, नोबेल, मॅगसेसे, साहित्यातला बुकर हे पुरस्कार आनंदाचे आहेत. ज्यांना मिळतील त्यांचं आपण अभिनंदन करूया. मात्र पाश्चात्त्य मापानं स्वतःला मोजणं, एखादी गोष्ट पाश्चात्त्यांनी उचलून धरली तर ती ‘ग्रेट’ आहे असा दृष्टिकोन असता कामा नये.

बऱ्याच वर्षांपूर्वी अरुंधती रॉय यांच्या ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला. वर्षानुवर्षांपासून मी ‘साहित्याचा नोबेल पुरस्कार’ याचा मागवा घेत राहिलो आहे. अगदी कॉलेजपासून हा माझ्या आचारसंहितेचा भाग आहे की इंग्रजीसकट जगातल्या उत्तम साहित्यिक कलाकृती आपण वाचल्या पाहिजेत. एका भारतीय लेखिकेला बुकर पुरस्कार मिळाला याचा मलाही आनंद वाटला. त्यांचं अरुंधती रॉय हे नाव कलात्मक आणि लयबद्ध वाटतं. त्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हतं. मात्र स्वयंशिस्त आणि स्वतःला लावलेली आचारसंहिता यांचा भाग म्हणून ती कादंबरी वाचायला घेतली. पानामागून पानं उलटतोय तर एकामागून एक धक्के बसत गेले. त्या पुस्तकात अरुंधती रॉय जो भारत मांडत आहेत तो खरा भारत नाही, असं मनातून ओरडत होतो. त्या लेखिकेबद्दल काहीही माहित नसताना त्यांचं पुस्तक वाचून माझं हे मत झालं की त्यांना भारत कळत नाही. मात्र त्यांचं इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आहे, भाषेला कमालीचा ओघ आहे. मात्र भारत आणि भारतीय संस्कृतीचं मांडलेलं आकलन हे माझ्या मते विकृतीच्या उंबरठ्यावरचं आहे. तेव्हापासून या पुरस्कारांबाबतचा माझ्या मनातला सन्मानदेखील काहीसा खालीच गेला. येणाऱ्या वर्षांमध्ये अरुंधती रॉय यांच्याबद्दल माहिती येत गेली. त्या सरळसरळ भारतविरोधी आहेत. त्यांचा डावा विचार अनेक भारतीयांच्या डाव्या विचाराप्रमाणे बघताबघता देशद्रोहात रूपांतरित झाला आहे. अरुंधती रॉय नक्षलवाद्यांची बाजू घेतात. भारतापासून फुटून निघण्याची भाषा करणाऱ्या इस्लामिक दहशतवाद्यांची बाजू घेतात. भारत नावाचं असं काहीच नव्हतं, ते एका भूभागाचं नाव आहे हे त्यांचं आकलन. भारत जर भारतच नसेल तर काश्मीर भारताचा अविभाज्य भाग कसा? त्यांच्या मते भारतीय लष्कर काश्मीरमध्ये अन्याय-अत्याचार करतं. ह्या अन्याय तोंडानं बोलू नये असा आहे असं त्या म्हणतात. २००१ मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूची बाजू त्या घेतात. त्याची केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात शेवटी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला जाणं, हे कसं चुकीचं होतं यावर त्यांचं पुस्तक आहे. म्हणून एका भारतीय लेखिकेला बुकर पुरस्कार मिळतो म्हणून आनंदानं ते पुस्तक हातात घ्यावं, तर त्यात सगळं भारतविरोधी लिखाण.

म्हणून ‘नाटू नाटू’बद्दल आनंद बाळगत आधुनिक काळात भारताची प्रतिमा सर्व अंगांनी बहरून आली पाहिजे अशी प्रार्थना करतानाच आपण स्वतःला केवळ पाश्चात्त्य मानदंडांनी मोजणं बंद केलं पाहिजे. आपल्याला आपल्या स्वत्वाचे, कलेचे मानदंड कळले पाहिजेत. नवनवे मानदंड प्रस्थापित केले पाहिजेत. जीवनाच्या सर्व अंगानी अशी प्रतिभा फुलून येवो, अशी प्रार्थना करतो.

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts