नमस्ते!
…आणि अर्थातच, जे तुम्हा सर्वांना माहीतच आहे, ज्यावर तुमचा विश्वास आहे, ते म्हणजे – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!
जगताना एक दिवस असा येतो, की त्या दिवसाच्या आवृत्तीत जीवन नावाच्या ब्रम्हांडाचं दर्शन घडून जातं. जीवन जगण्यातली सुखं आणि दुःखं, यशापयश, आशा-निराशा, चढउतार या सर्व द्वंद्वाचं दर्शन एका दिवसात घडून जातं. तरीही त्या द्वंद्वाचा सामना करताना एका शांत, अलिप्त, प्रसन्न चित्तानं ‘द्वंद्वातीत’ कसं व्हायचं, या द्वंद्वांच्या पलीकडं कसं जायचं, याचं दर्शनसुद्धा त्या एका दिवसाच्या समग्र अनुभवांमध्ये जाणवून जातं. तसं रविवार, ११ जूनला झालं.
११ जूनचे दोन प्रहर
सकाळच्या प्रहरात यंदा यूपीएससी निकालात ज्यांना यश मिळालं, अशा चाणक्य मंडल परिवारमधल्या ‘कार्यकर्ता अधिकाऱ्यां’च्या अभिनंदनाचा कार्यक्रम होता. पुढची ३०-३५ वर्षं स्वच्छ आणि कार्यक्षम राहून भारतमातेची सेवा करणारे हे अधिकारी. भारताच्या यशाचे, भावी सुवर्णयुगाचे, २०४७ ची पायाभरणी, त्यासाठीचं योगदान देणारे हे अधिकारी. विलक्षण प्रसन्नतेनं भरलेला दुपारपूर्वीचा हा प्रहर.
तो करून एका विलक्षण आनंदात घरी आलो. सतत भान असलेल्या मनाच्या एका भागानं आठवण करून दिली, की इंग्लंडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी टेस्ट क्रिकेटची जागतिक चॅम्पियनशिपची टेस्ट मॅच आहे. आजचा दिवस त्यासाठी निर्णायक आहे.
खेळाच्या पाचव्या दिवशी, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी २८० धावांची गरज होती. हाताशी सात विकेट्स शिल्लक होत्या. क्रिकेटमधलं जे थोडंफार कळतं, त्यावरून जाणीव होती की मॅचच्या पाचव्या दिवशी मैदान खराब व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळं चेंडूची उसळी वेडीवाकडी येऊ शकते. पाचव्या दिवशी नांगर टाकून त्या खेळपट्टीवर नुसतं टिकून राहणं हाच एका अजब बॅटिंगचा नमुना आहे. साधारण ९० ओव्हर्समध्ये २८० रन्स करायच्या असतील तर त्याचा ‘आस्किंग रेट’ तीन पॉईंट काहीतरी निघतो. टेस्ट क्रिकेटमध्ये, खेळाच्या पाचव्या दिवशी हा दर मोठा आहे.
तरीही माझ्या लक्षात होतं की चौथ्या इनिंगमध्ये ४०० पेक्षा जास्त रन्स करून मॅच जिंकली असं क्रिकेटच्या इतिहासात बहुतेकवेळा भारतानंच करून दाखवलं आहे. टीव्ही नसतानाचा तो काळ. भारताची वेस्ट इंडीजमध्ये मॅच होती. रेडिओवर ऐकावं लागायची. प्राण कंठाशी आणून ऐकलेली ती मॅच भारतानं वेस्ट इंडीजच्या नाकावर टिच्चून जिंकली. गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ या सगळ्यांची त्यात भूमिका होती.
पाचव्या दिवशी कोहली आणि अजिंक्य रहाणे अजून खेळत होते. त्यामुळं आपण ही मॅच जिंकू अशी आशा होती. चाणक्य मंडलचा सकाळच्या प्रहरात झालेला यूपीएससीतील यशस्वीतांच्या अभिनंदन आणि अनुभवकथनाचा कार्यक्रम संपवून घरी पोहोचलो. सहज स्कोर बघावा म्हणून टीव्ही सुरू केला तर तोंड बारीक करून प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असलेला रोहित शर्मा दिसला. त्याचं तोंड पाहूनच लक्षात आलं की आपण हरलो आहोत!
आहे हे जीवन असं आहे
आहे हे जीवन असं आहे! एकच दिवस. सकाळचा प्रहर. आनंदाचा. भारताच्या भवितव्याविषयी सकारात्मक, विवेकनिष्ठ आणि आशावादी असण्यासाठी आपल्याकडून होणाऱ्या कामाची पायाभरणी, त्यातला आनंद आणि दुपारी घरी आल्यानंतर जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून झालेला आपला पराभव… सुखं आणि दुःखं, यशापयश, चढ-उतार…आहे हे जीवन असं आहे! कायम एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू. मात्र दोन्हीही पचवणं आपलं काम आहे. दोन्ही स्वीकारून तुझं काम तू करत रहा…बुद्धापासून संत तुकोबांपर्यंत ज्यांना जीवन कळलं त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे – जीवन दुःखमय आहे. बुद्ध या दुःखातून मुक्ततेचा मार्ग सांगतो. तुकोबा म्हणतात – सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वता एवढे॥ त्यातून तुकोबांनी सांगितलेला, आपल्याला कळलेला मार्ग म्हणजे, उठणं आणि आनंदी, प्रसन्न चित्तानं आपलं कर्तव्य करत राहणं…आहे हे जीवन असं आहे!
स्पर्धापरीक्षांचे निकाल
२३ मे ला यूपीएससीचे निकाल लागले. आधी घेतलेले कष्ट, पायाभरणी, होणारा प्रत्येक तास, विविध चाचण्या, कोर्सची रचना, यांमार्फत प्रत्येक युवकानं स्वतःला घडवत जाणं, स्वतःवर काम करणं यावरून ही खात्री होती की यावर्षीचे निकाल उत्तम लागणार आहेत. १३ लाख ६७ हजार जण या परीक्षेचा फॉर्म भरतात. त्यातून ९३१ जणांची निवड होते. त्या ९३१ पैकी २९१ जणांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यामुळं – ‘या, आमच्या यशस्वितांचे हे फोटो पहा आणि कोर्सचे पैसे भरा’ असं म्हणणारं चाणक्य मंडल परिवार नाही. ‘परिवार’ हा शब्द, त्यामागचा विचार, ठरवलेली ध्येयवाक्यं, शैक्षणिक वर्षाची रचना, प्रत्येक तासाची सुरुवात उपासनेनं आणि शेवट प्रार्थनेनं, वर्षाच्या सुरुवातीला सर्वांसाठी सहा भागांची अधिष्ठान मालिका, अधिष्ठान दिवस, आपलं व्यक्तिमत्व आणि करिअरद्वारा भारतमातेची सेवा करण्याचा संकल्प, कोर्समधली गुणवत्ता शिकत, स्वतःवर काम करत यशाच्या शिखरावर जायचं. तिथं पोहोचल्यानंतर मिळालेलं यश डोक्यात जाऊ न देणं ही चाणक्य मंडलची शिकवण आहे. यूपीएससीनंतर एमपीएससीचादेखील निकाल लागला. तिथं ४३४ जणांची निवड झाली. त्यांपैकी जवळपास २३४ जणांनी विविध पातळ्यांवर चाणक्य मंडल परिवारमध्ये मार्गदर्शन घेतलं आहे.
चाणक्य मंडल परिवारमध्ये स्पर्धापरीक्षेत यशस्वी झाल्यानंतर आपण सत्कार नाही; तर त्यांचं अभिनंदन करतो. कार्यक्रमाचं नावदेखील ‘अभिनंदन आणि शुभेच्छा’ असं आहे. हा नुसता शब्दांचा खेळ नाही. स्पर्धापरीक्षा पास होणं म्हणजे आता कुठं तुझ्या कामाला सुरुवात झाली, ही यशस्वितांना करून दिलेली जाणीव यात आहे. लोकसेवा हीच देशसेवा आहे. मिळणारी नोकरी ही सत्ता, पैसा, गाडी, बंगला, यांसाठी नाही; या गोष्टी आपोआप मिळणारच आहेत, पण ही ‘लोकसेवा’ आहे. विवेकानंदांनी आपल्याला शिकवलं – लोक हेच राष्ट्र आहे! राष्ट्र म्हणजे डोंगर-दऱ्या, नदी-नाले नाहीत. ती राष्ट्राची भूमी आहे. म्हणून लोकांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, असं संतांनी, विवेकानंदांनी आपल्याला शिकवलं. तसं ते जगले. आपणही आपल्या परीनं जे काम करतो त्याला यश मिळत राहतं.
हे यश मिळताना भान ठेवायचं असतं की हे माझं नाही – इदं न मम! भारतमातेच्या नव्या, सुवर्णमयी मंदिराच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या यज्ञात माझ्याकडून असलेली अल्पशी आहुती. असा हा कार्यक्रम, पुण्यातलं सर्वात मोठं सभागृह गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. रविवारचा तो प्रसन्न प्रहर. आलेल्या हजारो पालक, मुलं-मुली यांचा जिव्हाळा, त्याची स्पंदनं संपूर्ण सभागृहातून माझ्यापर्यंत पोहोचताना मला जाणवत असतात. एकाच वेळी विलक्षण शिस्त आणि तुफान उत्साह या दोन्हींचा मेळ म्हणजे हा कार्यक्रम असतो. अभिनंदन स्वीकारून, स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासनाचा संकल्प सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात यशवंत आले होते.
विद्यार्थ्यांनी सोडायचा संकल्प
चाणक्य मंडल परिवारच्या अभिनंदन कार्यक्रमाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक ‘संकल्प’ असतो. चाणक्य मंडल परिवारमध्ये अभ्यासाला सुरुवात करताना ‘संकल्प’ सोडायचा असतो – मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास का करतो/करते आहे? सत्ता, पद, पैसा, अहंकार यांसाठी मी स्पर्धापरीक्षांची तयारी करत नसून प्रशासन हे देशसेवेचं माध्यम आहे. प्रशासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यांना चालना मिळावी, यासाठी मी प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करणार आहे, असं म्हणत अभ्यासाला लागायचं असतं. चाणक्य मंडल परिवारचं शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना आतून येणारा, अत्यंत पवित्र असा तो संस्कार आहे. त्याला आपण आधुनिक काळातल्या एका कार्यक्रमाचं रूप दिलं आहे. अभ्यास करून औपचारिकदृष्ट्या ज्यांना या स्पर्धापरीक्षेच्या चौकटीतलं यश मिळतं, त्यांनी प्रशासनात प्रवेश करण्यापूर्वी हजारो लोकांच्या उपस्थितीत, पारदर्शकपणे समाजाला शब्द द्यायचा असतो – मला स्पर्धापरीक्षेत यश मिळालं. तुम्हा सर्वांना, म्हणजे देशाला मी शब्द देतो/देते आहे की मी स्वच्छ आणि कार्यक्षम राहीन आणि स्वतः भोवतालच्या यंत्रणेलासुद्धा कार्यक्षम ठेवीन. कारण प्रशासनच स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पाहिजे.
उपस्थित दिग्गज
अशा त्या विलक्षण सात्विक आणि पवित्र कार्यक्रमात, जिव्हाळ्याच्या स्पंदनांनी भरून आणि भारून जावं, असा मुलं-मुली आणि त्यांच्या पालकांचा प्रतिसाद होता. व्यासपीठावर बसलेले सगळेच्या सगळेच मान्यवर एकापेक्षा एक दिग्गज होते. स्वातंत्र्यानंतर भारतमातेच्या सेवेतले सार्वकालिक श्रेष्ठ म्हणावेत असे लष्करी सेनापती लेफ्टनंट जनरल शेकटकर सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्यांची ‘शेकटकर समिती’ आहे. एप्रिल १९८३ मध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली सियाचीनवर भारताची पहिली तुकडी पोहोचली आणि तिनं तिथं तिरंगा रोवला, असे लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, प्रशासनात सर्वोच्च पदांवर असलेले किंवा ती जबाबदारी पार पाडून नुकतेच निवृत्ती झालेले आयएएस सेवेतले माझे बॅचमेट्स उपस्थित होते. ते आता चाणक्य मंडल परिवारच्या कार्यात सहभागी असतात. अभिनंदन त्यांच्या हस्ते करण्याचा आग्रह आपण केला.
माझे एक बॅचमेट डॉ. डी. के. भल्ला यांना नागालँड केडर मिळालं. हे केडर मिळाल्यानंतर अनेकजण सेवेतून पळून जातात किंवा लांड्या-लबाड्या करून आपलं केडर बदलून घेतात; धागेदोरे खेचून, आपले कॉन्टॅक्ट वापरून पोस्टिंग दिल्लीतच होईल याची सोय करतात. ईशान्य भारतात ते काम करत नाहीत. मला मात्र हे सांगायला आनंद वाटतो की चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः ईशान्य भारत भरून गेला आहे. औपचारिकदृष्ट्या डॉ. डी. के. भल्ला सेवानिवृत्त असले तरी ते नागालँड सरकारचे अधिकृत सल्लागार आहेत. असेच डॉ. राकेश वत्स. पश्चिम बंगाल केडर. निवृत्त होताना संपूर्ण भारताच्या मेडिकल कौन्सिलचे ते प्रमुख होते. शिक्षणानंदेखील ते डॉक्टर आहेत. इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसमधले माझे सहकारी जगजीत सिंग आर्या, भारताच्या संरक्षण प्रश्नांवर ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत असे चंद्रशेखर, असे अनेक दिग्गज मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अभिनंदन स्वीकारून चाणक्य मंडलचे हे ‘कार्यकर्ता अधिकारी’ सेवेत रुजू होणार. केवढा आनंद!
११ जूनचा दुसरा प्रहर
तो आनंद, ती मैफल, तिचेच सूर डोक्यात फिरत होते. एखादी असामान्य कविता वाचल्यानंतर अंगावर जसा काटा येतो, जीवनाचा अर्थ कळतो, जगण्याचं बळ मिळतं, अशा मनःस्थितीत घरी पोहोचून टेस्ट क्रिकेटमधल्या चॅम्पियनशिपचं काय झालं, हे पहावं म्हणून टीव्ही सुरू केला तर आपण हरलो होतो! मला ओळखणाऱ्या सर्वांना हे माहित आहे, की माझं जीवन जगण्याचं एक सोपं सूत्र आहे – भारत जिंकला तर मी जिंकलो, आम्ही जिंकलो, आपण जिंकलो. भारत हरला तर मी हरलो, आपण हरलो. भारताच्या विजयात आपला विजय आहे. भारताच्या यशात आपलं यश आहे. भारताच्या सुवर्णयुगात आपलं सुवर्णयुग आहे. हे शब्द नुसते भावनिक नाहीत. हा थेट वैयक्तिक पातळीवरचा, रोजच्या जगण्यातला अनुभव आहे. क्रिकेटपासून जीवनापर्यंत भारताचा विजय झाला तर मन आणि अस्तित्व भरून येणं, आनंदाच्या शिखरावर असणं आणि भारताचा पराभव झाला तर वैयक्तिक पातळीला अविनाश धर्माधिकारीसुद्धा दुःखी होणं, तसं या टेस्ट क्रिकेटबद्दल झालं.
आधीचे चार दिवस वेळ होईल तसा हा सामना पाहतच होतो. अनेक कामांमुळं त्यावर मर्यादा होत्या. या सामन्यावर ऑस्ट्रेलियानं पकड घेतली आहे हे पहिल्या दिवसापासून जाणवत होतं. उरलेल्या दिवसांत जरासुद्धा वाटलं नाही की भारत झुंज देतो आहे, ऑस्ट्रेलियाची पकड ढिली करतो आहे किंवा आपली पकड प्रस्थापित करतो आहे. आनंददायक अपवाद म्हणायचा झाल्यास पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या विकेट्स धडधड पडून गेल्यानंतर ‘कमबॅक’ करणारा अजिंक्य रहाणे आणि त्याचा सहकारी शार्दुल ठाकूर यांनी चिकाटीनं ‘पीच’वर नांगर टाकला. दोघं जिद्दीनं खेळत राहिले. सातव्या विकेटकरता शतकाहून अधिक भागीदारी केली. तेवढ्याच एका वेळी वाटलं की निदान भारत झुंज देतो आहे.
तसं म्हणायला गेलं तर एका मर्यादेपलीकडं हार-जीतशी फार घेणं देणं नसावं. जीवन म्हटलं की हार-जीत चालायचीच. जिंकलो म्हणून फार चढून जायचं नसतं आणि हरलो म्हणून खचूनदेखील जायचं नसतं. आहे त्यातून शिकायचं, क्रिकेटपासून जीवनापर्यंतचा सामना जिंकण्यासाठी खेळायला पुन्हा सामर्थ्यानं उभं राहायचं, याचं मला भान आहे. मी तसं जगायचादेखील प्रयत्न करतो हे मी नम्रपणे सांगतो.
मात्र जगज्जेतेपणाच्या सामन्यात भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला याचा अर्थ, खरं म्हणजे तो जिंकायलाच हवा. खेळायचं तर जिंकण्यासाठीच, पण नाही जिंकलो. शिवाय जागतिक चॅम्पियनशिपमध्ये हरल्याचं दुःख कमी आहे; झुंज न देता हरलो, याचं दुःख जास्त आहे. चिकाटीनं झुंज देता आली नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांचा विजय सोपा करून द्यायला नको होता. पाचही दिवस तसं झालं नाही. पकड कायमच ऑस्ट्रेलियाची होती. एरव्ही दिसते ती जिद्द यावेळी दिसली नाही.
या व्यतिरिक्त त्या रविवारच्या दुपारी सर्वात जास्त दुःख कशाचं वाटलं ते आता सांगतो. माझ्या मनाच्या एका भागात कायम असतं की क्रिकेटपासून इतिहासापर्यंत नेमक्या निर्णायक लढायांमध्ये पराभूत होण्याची जणू ऐतिहासिक सवय आम्हाला लागली आहे. क्रिकेटपासून आम्ही जीवन, संस्कृती, इतिहासात आम्ही उत्तम आहोत. तिथं आम्ही जिंकू शकतो. असं जिंकत, प्रतिस्पर्धी शत्रूवर मात करत, आता जी अंतिम, निर्णायक लढाई होईल, जी जिंकली तर आपण ‘चॅम्पियन’ ठरू – नेमका तिथं आपला पराभव होतो. नाही म्हटलं तर असा न्यूझीलंडसोबतचा पराभव माझ्या लक्षात आहे.
नवा भारत
मीच तुम्हाला सांगतो की गेल्या काही वर्षांपासून भारताबद्दलचं माझं आकलन बदललं आहे. आधीचा पराभूत मनाचा, न्यूनगंड घेऊन खेळणारा, गोऱ्या कातडीसमोर दबून खेळणारा भारत आता शिल्लक नाही. एके काळी गोऱ्या खेळाडूंना भारतीय खेळाडू ‘सर’ म्हणायचे. मात्र गोऱ्या कातडीचे त्यावेळचे टॉनी आणि ग्रेग भारतीय खेळाडूंना ‘अजित’, ‘सुनील’ असं नावानं उच्चारायचे. १९७० मधला आपला कॅप्टन अजित वाडेकरनं ही पद्धत बदलली. आपल्या टीमला त्यानं सूचना दिली होती की प्रतिस्पर्धी खेळाडूंना ‘सर’ म्हणायचं नाही. त्यांना त्यांच्या पहिल्या नावानं उच्चारायचं. त्या सिरीजमध्ये भारतानं इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवलं! कारण क्रिकेटपासून इतिहासापर्यंतचा खेळ नुसता कौशल्यावर आधारित नसतो; तर त्यामागचं मन तितकंच महत्त्वाचं असतं. ते मन आत्मविश्वासानं भरलेलं, जिंकण्यासाठी खेळणारं, जिंकण्याची जिद्द असलेलं हवं. ते मन जर पडेल मनोवृत्ती घेऊन मैदानात उतरत असेल, मनात कमीपणाची आत्मप्रतिमा असेल तर निम्मा सामना आपण तिथेच हरलेलो असतो. उरलेला खेळ फक्त हरण्यासाठीच उलगडत जाणारा.
मात्र भारत आता बदलतो आहे हे निश्चित आहे. क्रिकेटसहित इतर क्षेत्रांत भारत हा गप्प बसून ऐकणारा देश नाही. ‘गिव्ह इट बॅक’ – ‘अरे’ला ‘का रे’ करायला सुरुवात वाडेकरनं केली. सौरभ गांगुलीनं त्याची आणखी वरची उंची गाठली. भारत एक सामना हरल्यानंतर मुंबईच्या मैदानावर इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ यानं अंगातला शर्ट काढून गरागरा फिरवला होता. पुढं आपण ‘लॉर्ड्स’वर इंग्लंडला हरवलं तेव्हा त्या ‘लॉर्ड्स’च्या गॅलरीत येऊन सौरभ गांगुलीनं शर्ट काढून गरागरा फिरवला होता. मॅच सुरू असताना ऑस्ट्रेलियन्स ‘स्लेजिंग’ करायचे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना टाकून बोलायचं, तिरकस बोलायचं, ‘फोर लेटर वर्ड’ वापरायचा – यातून खेळाडूचं खच्चीकरण करायचं जेणेकरून त्याचा त्यांच्या खेळावर परिणाम होईल. भारतानं याला उलट उत्तर देणं सुरू केलं. फ्लिंटॉफनं आपल्या युवराजला शिव्या दिल्या, तसं त्याच फ्लिंटॉफच्या पुढच्या सलग दोन बॉलला दोन सिक्सर! ‘बॅट’नं सुनावणं हे तर सचिननं अगणित वेळा दाखवून दिलं आहे. आता विराट कोहली, रोहित शर्मा ते करतात, या सगळ्याचं मला भान आहे आणि म्हणूनच हा निर्णायक सामना आपण हरलो; तो सन्मानानं हरलो नाही, जिद्द चिकाटीनं खेळलो नाही, याचं दुःख जास्त आहे.
निर्णायक लढायांमध्ये पराभव
त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरून देशाच्या इतिहासात होऊन गेलेली युद्ध सरकत होती. ती निर्णायक युद्ध, लढाया जिंकल्या गेल्या असत्या तर भारताच्या विजयाचं नवं पर्व सुरू झालं असतं. आमच्या दुर्दैवानं आम्ही ती हरलो. उदाहरणार्थ, आठव्या शतकात भारतावर जी आक्रमणं सुरू झाली त्यांचा कडवा प्रतिकार भारतानं केला. मात्र शतकानुशतकांपासून परकीय आक्रमकांचं पाऊल भारतात घुसत गेलं. दहाव्या शतकात गझनीचा मोहम्मद १७ वेळा लुटून गेला. बाराव्या शतकात मोहम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरी आला. पृथ्वीराज चौहाननं प्रथम त्याचा पराभवदेखील केला; मात्र आपल्याला वाटणाऱ्या उदार युद्धशास्त्र, परंपरेप्रमाणं त्याला सोडून दिलं. एक वर्षात तो परत आला, त्यात आपण हरलो, पृथ्वीराजचा त्यानं शिरच्छेद केला आणि पुढं शतकानुशतकांच्या भयान अत्याचार आणि पराभवांची मालिका सुरू झाली.
इथं उर्दू शेरमधली एक ओळ मला आठवत राहते – खता लम्हो ने की थी, सजा सदियों ने पायी है! काही क्षणांकरता एक चूक झाली मात्र त्याची शिक्षा पुढची अनेक शतके भोगावे लागली.
मात्र भारत सहज रीत्या हरलेला नाही. कडवा प्रतिकार सुरू होता. राजपुतांनी हा भारत देश आपला आहे; तो आक्रमक तुर्कांचा नाही, हा मुद्दा कधीही सोडला नव्हता. राजपूत राणा सांगा म्हणजे संग्रामसिंग याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजपुतांनी जवळजवळ दिल्ली जिंकत आणली. ११९२ मध्ये गेलेली दिल्ली पुन्हा जिंकून हिंदुस्थानचे सम्राट आम्ही ही ओळख त्याला पुन्हा प्रस्थापित करायची होती. विरोधात त्यावेळी बाबर आला. १५२७ मध्ये राणा सांगा आणि बाबर यांची निर्णायक लढाई आग्र्याजवळच्या कनवाल इथली. तोवर आधीच्या लढाया जिंकून राजपुतांनी आपलं स्थान पुन्हा मिळवलं होतं. ही लढाई जिंकली तर उत्तर हिंदुस्थानवर राजपुतांचं प्रभुत्व असणार होतं. मात्र ती निर्णायक लढाई आपण हरलो.
मध्ययुगातल्या भारतीयांच्या पराभवाचा नुसता प्रतिकार नाही तर जिंकणारा प्रतिहल्ला करणारे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पुढं मराठ्यांचा इतिहास आकाराला आला. ती निर्णायक लढाई आहे १४ जानेवारी १७६१. स्वतःला मराठे म्हणवणारी ही शक्ती भारताची सार्वभौम शक्ती आहे, म्हणून अब्दालीला आमंत्रण गेलं, की तू ये! नाहीतर इथं ‘काफिरां’चं राज्य स्थापन होतंय. ती निर्णायक लढाई होती. ती आपण जिंकली असती तर भारताचं भवितव्य बदललं असतं. हे नुसतं मी नाही तर १७६१ मधले समकालीन दस्तावेज म्हणतात. ईस्ट इंडिया कंपनीचं रेकॉर्ड म्हणतं. पुढच्या काळातले अनेक इतिहासकार हे म्हणतात. अलीकडच्या काळातला विचारवंत, राजकीय पुढारी शशी थरूर यांना अगदी अलीकडच्या कार्यक्रमात विचारलं गेलं की भारतावर इंग्रजांचं राज्य आलं नसतं तर काय झालं असतं? तर शशी थरूर यांनी त्यांच्या पारदर्शक, प्रामाणिक आणि बुद्धिमान पद्धतीनं उत्तर दिलं, की भारतावर मराठ्यांनी राज्य केलं असतं. इथं मराठे म्हणजे भारतीय. आपल्या देशाचं सार्वभौमत्व सांभाळणारे. मात्र नेमका त्या निर्णायक लढाईत आपला पराभव झाला.
मी खरोखर सांगतो, की वैयक्तिक जीवन जगतानासुद्धा ही मला अजूनही न भरून आलेली खासगी पातळीवरची जखम वाटते. अडीचशे वर्षांनंतरही माझ्या अंतःकरणाची ही जखम भरून आलेली नाही. एका ११ जूननं इतकं सगळं दाखवलं. तरीही भारत जिंकण्यासाठी काय करायचं असतं? आपण आनंदी, प्रसन्न चित्तानं आपलं कर्तव्य करायचं असतं.
भारत जिंकण्यासाठी काय करायचं असतं?
भारत जिंकण्यासाठीचा हा रस्ता आम्ही १९७३ सालीच शिकलो. देशाचा छोटासा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्या वर्षी हॉकीच्या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलला पोहोचला होता. रात्री नऊ वाजता देशाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांची बैठक असायची. तिकडं ऍमस्टरडॅममध्ये भारत विरुद्ध हॉलंड अशी फायनल रात्री नऊलाच सुरू होणार होती. त्यामुळं आमच्या जीवाची कालवाकालव होत होती. म्हणून आम्ही ठरवलं की, पाच-दहा मिनिटांची मीटिंग घेऊ आणि ट्रान्झिस्टर मध्यभागी ठेऊन गोलात बसून ती मॅच ऐकू. दहा मिनिटांत मीटिंग संपून आम्ही कॉमेंटरी सुरू केली तेव्हा भारत दोन शून्यनं आघाडीवर होता. दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पुढं दुर्दैवानं अपघातात गेलेला खेळाडू सुरजित सिंगनं तो घेतला आणि दोन शून्यनं आपण आघाडीवर गेलो. पुढं उलगडली ती भारताच्या भारतपणाची दुःखद कहाणी. पहिली हाफ संपता संपता आपल्यावर पहिला गोल लागला. आपला खेळ शिथिल पडला. कारण दोन शून्य! दोन एक! आपण जिंकणार! असं असताना दुसऱ्या हाफमध्ये अगदी काही सेकंदांमध्ये आपल्यावर दुसरा गोल लागला. दोन दोन. पुन्हा एक्स्ट्रा टाईम. त्यात कुणावर गोल नाही. मग असतो गोल्डन गोल. खेळायचं; जो पहिला गोल मारेल तो जिंकला. त्यावेळी भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. आपला पॅनल्टी स्ट्रोक तज्ज्ञ गोविंदा नावाचा खेळाडू होता. त्यानं तो पेनल्टी स्ट्रोक घेण्यात चूक केली आणि त्याचा स्ट्रोक गोल पोस्टवरून गेला. तेव्हाच्या सिस्टीमनुसार पाच पेनल्टी स्ट्रोक असायचे. त्यात शेवटी आपण हरलो.
दुःखानं भरलेल्या आमच्या मनानं घेतलं, की आज भारत हरला कारण आपण आपल्याकरता घेतलेलं कर्तव्य सोडून ही मॅच ऐकत बसलो म्हणून! ते कर्तव्य होतं – देशाच्या प्रश्नांचा अभ्यास आणि त्यावर आपल्या परीनं जमणारं काम. भारत जिंकण्यासाठी आपण प्रत्येकानं काय करायचं असतं, हे मला १९७३ सालीच सापडलं.
भारत जिंकण्यासाठी आपण प्रत्येकानं आपलं कर्तव्य करायचं असतं. ११ जूनचा तो दिवस सांगून जातो की यशापयश, सुखदुःखं, आशा निराशा, चढउतार कुणाला चुकले नाहीत. म्हणून त्या सर्वांमध्ये ‘द्वंद्वातीत’ कसं व्हायचं तर एका शांत, आनंदी आणि प्रसन्न चित्तानं आपलं कर्तव्य करत राहायचं. त्या कर्तव्यात आनंद उपभोगायचा. असं आपापलं कर्तव्य करत त्यात आनंद उपभोगणारे आपण होऊ असं सांगून पुन्हा एकदा आणि कायमसाठी,
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!