राम! राम!!

सर्व वयाच्या सर्व मित्र-मैत्रिणींनो – राम! राम!! मला ओळखणारे तुम्ही सगळे क्षणभर विचारात पडले असाल; असे विचारात पडे-पडेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल, की एरव्ही माझ्या बोलण्याची सुरुवात – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! पासून होते. पण आजची सुरुवात ‘राम राम’नं होते आहे.

सर्वत्र ‘राम’संपूर्ण भारतभर, सर्व भाषांमध्ये, हजारो वर्षांपासून दोन भारतीय सहज एकमेकांना भेटले तर ते ‘राम राम’ म्हणतात. वगनाट्य, टीव्हीवरचे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग यांची सुरुवात ‘राम राम’नं होते. राम सर्वत्र आहे. भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांमध्ये ‘राम’ भरून आणि उरून राहिला आहे. आज या विषयावर लिहिण्याचं निमित्त म्हणजे, रामजन्मभूमीत उभ्या राहणार्‍या मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे. एकीकडं कळलं आहे, की राम फक्त अयोध्येत नाही, तो सगळीकडं आहे. राम बाहेरच नाही तर तो आपल्या आतही आहे. भारताच्या आदर्श राज्यव्यवस्थेचं नाव ‘रामराज्य’ असा आहे. हाच शब्द उचलून गांधीजींनीसुद्धा आपल्या संकल्पना मांडल्या. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात ‘रामराज्य’ हवं, अशी गांधीजींची इच्छा होती. राम भारताच्या जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी, उठता-बसता-कार्य-करता, समाजाचे सर्व घटक, जाती, धर्म, पंथ, वर्ण, भाषा, लिंग – सर्वत्र राम आहे.

प्राणप्रतिष्ठा

शतकानुशतकांपासून सुरू असलेला लढा, अंतिमतः यशस्वी होऊन रामजन्मभूमीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. छोट्या रामाचं ‘ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया’ हे भजन प्रथम डी. व्ही. पलुसकर यांनी सादर केलं आणि पुढं लताबाईंनी ते अजरामर आणि शाश्वत करून ठेवलं. बालक असलेल्या रामाच्या चालण्याचं आणि त्याच्या लीलांचं हे वर्णन आहे. तोच हा राम लल्ला. त्याची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरात होत आहे.

प्राणप्रतिष्ठा ही खास भारतीय संस्कृतीतली संकल्पना. या शब्दाला इंग्रजीसहित पाश्चिमात्य भाषांमध्ये प्रतिशब्दच नाही. बातम्यांमध्ये consecration हा शब्द वापरला जातो. इलाज नसल्यानं तो वापरावा लागतो. मात्र असे अनेक भारतीय शब्द इंग्रजीत भाषांतरित करताच येत नाहीत. कारण त्या शब्दांमागच्या संकल्पनाच परकीय भाषेत, संस्कृतीत नाहीत. किंवा त्या त्या संस्कृतीचे शब्द आणि संज्ञा ज्यातून निर्माण होतात, त्या मुळाशी ही शक्ती असायला हवी, की मूळ संकल्पना नसली तरी ती स्वीकारताना आमच्या भाषेतला, संस्कृतीतला शब्द काढू शकू. ही अमर्याद शक्ती भारतीय संस्कृतीत आहे. शब्द कसे निर्माण होतात याचा संस्कृतमध्ये सखोल अभ्यास आहे. विज्ञानाची प्रगती होत असताना त्यात येणार्‍या नवनव्या संकल्पनांना भारतीय भाषांमध्ये प्रतिशब्द तयार करण्याची क्षमता आहे, यावर माझा विश्वास आहे. ही शक्ती संस्कृत भाषेतून येते. कोणता ध्वनी काय अर्थ मांडतो, याचा संस्कृतमध्ये सखोल अभ्यास झाला आहे. एखादा शब्द संकल्पनेत नसेल तर तो समजून घेत, त्याचा प्रतिशब्द आणताना त्याचं व्युत्पत्तीशास्त्र (etymology) मूळ संस्कृतमध्ये आहे.

राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होण्याचा आनंद सर्व भारतीयांना असावा. भारत देश आणि त्याची संस्कृती सहिष्णू आहे. ती सर्व समावेशक आहे. म्हणून रामाची प्राणप्रतिष्ठा होणं हा सर्वांच्याच आनंदाचा क्षण आहे, यावर माझी श्रद्धा आहे. आधुनिक काळात अंतिमतः सर्वकाही घटनात्मक मार्गानं होत आहे. वेळोवेळी अनिष्ट, दुःखद घडलं; मात्र न्यायव्यवस्थेनं आधुनिक भारताच्या राज्यघटनेच्या चौकटीत राहून देशात सुरू असलेल्या भांडणाला योग्य रस्ता काढून दिला. एव्हाना सर्व कागदोपत्री पुराव्यानिशी आणि उत्खननानंतर हे निःसंशयपणे सिद्ध झालं आहे, की जिथं बाबरी मशीद होती तिथं आधी शतकानुशतकांपासून रामजन्मभूमी होती.

इतिहासाची मोडतोड

आक्रमक, अत्याचारी, धर्मांध बाबराचं अनेक इतिहासकार गौरवीकरण करतात. हे अजिबात खरं नाही. बाबर भारताचा द्वेषच करत होता. तो अत्याचारी, धर्मांध होता, हे मी म्हणत नाही तर हे तो स्वतःच म्हणतो. समकालीन दस्तावेजांमध्ये तशी नोंद आहे. त्याचं आत्मचरित्र ‘बाबरनामा’मध्ये अशी नोंद आहे. आपले गुरुनानक देव बाबराला समकालीन आहे. आक्रमण करून बाबरानं पंजाबमध्ये किती अत्याचार केले, याची नोंद गुरुनानकदेवांनी आपल्या कवणांमध्ये करून ठेवली आहे. वैचारिकदृष्ट्या डाव्या इतिहासकारांनी – रोमिला थापर, डी. एन. झा, आर. एस. शर्मा, इरफान हबीब…आणि कंपनी यांनी बाबराचं उदात्तीकरण केलं आहे. युद्ध संपल्यानंतर मुघलांनी निरपराध्यांच्या कोणतंही कारण नसताना केलेल्या कत्तलीचं हे इतिहासकार समर्थन करतात. सक्तीची धर्मांतरं, तोडलेली मंदिरं, अनेक ठिकाणी त्यांचं मशिदीत केलेलं रूपांतर याचे लेखी दस्तावेज आहेत. आम्ही काफीरांची कशी कत्तल केली, काफीरांच्या आया-बहिणींची अब्रू लुटली, काफीरांच्या मूर्ती तोडल्या, त्या गटाराच्या तोंडाशी बसवल्या, मंदिरांचं मशिदीत रूपांतर केलं, याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. मात्र सर्व प्रकारच्या ऐतिहासिक सत्यांची मोडतोड करून विकृत, चुकीचा आणि खोटा इतिहास हे इतिहासकार मांडतात. कुणी खरा इतिहास मांडायला गेलं तर हे हिंदुत्ववादी, उजव्या विचारांचे खोटी कहाणी निर्माण करत असल्याचं म्हटलं जातं. राम मंदिराचा खटला न्यायालयात गेल्यानंतर मुस्लिम पक्षकारांना याच इतिहासकारांनी सांगितलं की या जागेवर मशिदच होती याचे पुरावे आम्ही देतो. या जागेवर आधी बौद्धविहार होता, हिंदूंनी तो ताब्यात घेऊन तिथं मंदिर उभारलं, असा विकृत इतिहास या इतिहासकारांनी उभा केला. वस्तुनिष्ठपणे हे धादांत खोटं आहे.

रामजन्मभूमीचा ऐतिहासिक वाद

रामजन्मभूमीचा वाद शतकानुशतकांपासून सुरू आहे. पानिपतच्या पहिल्या लढाईत हा बाबर इब्राहिम लोधीशी लढला. त्या लढाईला बाबर ‘जिहाद’ म्हणत नाही. या लढाईत बाबरानं इब्राहिम लोधीला हरवलं. मात्र त्याची खरी लढाई रजपुतांशी होती. राणा संग्राम सिंह किंवा राणा संगा हा महापराक्रमी राजा. १५२६-२७ मध्ये राणा संगाची बाबराशी लढाई झाली. राजपुतांच्या पराक्रमाची ख्याती इतकी होता की बाबराचं सैन्य आपण परत जाऊ असं म्हणत होतं. त्यावेळी हे काफिरांविरुद्धचं ‘जिहाद’ आहे, असं बाबरानं जाहीर केलं. ही लढाई केवळ संपत्तीसाठी नाही, तर आपल्याला मूर्तिपूजकांचा पराभव करायचा आहे, असं तो म्हणाला. म्हणून बाबरापासून औरंगजेबापर्यंतचे सगळे मुघल धर्मांध आहेत. (त्यात अकबराचा अपवाद मानायला जागा आहे; परंतु आत्ता त्यात जायला नको.) मुघल हे पंधराव्या-सोळाव्या शतकातील तालिबान, अल कायदा आणि आयसिस आहेत. बाबरानं आपला सेनापती मीर बाकीला सांगितलं, की हिंदूंची श्रद्धा असलेलं हे मंदिर पाड आणि तिथं मशीद बांध! वर्ष होतं १५२८.

मधल्या सर्व शतकांत भारत, भारतीय संस्कृती, राम हे श्रद्धास्थान मानणारे सर्व जाती-धर्म-पंथ हे कधीही विसरले नव्हते की ही रामजन्मभूमी आहे. शिखांनीसुद्धा रामजन्मभूमीसाठी लढा दिला आहे. अलीकडं काही शक्ती शिखांचा फुटीरतावाद जोपासत आहेत. दुर्दैवानं त्यातले काही वेगळ्या खालिस्तानची मागणी करत आहेत. मात्र सांस्कृतिकदृष्ट्या आपण कोण, हे गुरुनानकदेवांपासून दसवे पादशहा गुरुगोविंद सिंग यांच्यापर्यंत सर्वांना माहीत आहे. पुढं महाराजा रणजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली शिखांचं साम्राज्य उभं राहिलं. त्यांचा सेनापती हरीसिंग नलवा यानं अफगाण्यांचा पराभव केला आणि अकराव्या शतकाच्या सुरुवातीला गझनीच्या मोहम्मदानं सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटून त्या मंदिराचे दरवाजे गझनीत लावले होते; महाराजा रणजीत सिंग आणि त्यांचा सेनापती हरी सिंग नलवा यांनी हे दरवाजे परत देण्याची मागणी केली. भारतीय संस्कृतीचं हे भान आहे. राम मंदिराचा मुद्दा भारतानं, भारतीय संस्कृतीनं कधीही सोडला नव्हता. त्याचे इंग्रज काळातलेसुद्धा सर्व पुरावे उपलब्ध आहेत. सांगायला आनंद वाटतो की आधुनिक भारतात हा मार्ग राज्यघटनेच्या चौकटीत राहून निघाला.

न्यायालयीन लढा

६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडण्यात आली, हे सर्वांना माहीत आहे. कायद्यानं पुढं त्याचं जे व्हायचं ते होऊ द्यात. या मंदिर उर्फ मशिदीच्या वादावर ३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानं निकाल दिला. तीन न्यायाधीशांचं ते खंडपीठ होतं. रामायण ऐतिहासिक आहे किंवा नाही किंवा राम नावाचा व्यक्ती इतिहासात खरंचच होऊन गेला का या प्रश्नात आम्ही जाणार नाही, असं न्यायालय म्हणालं. रामायण-महाभारत या प्राचीन भारतात खरोखर घडलेल्या घटना आहेत, अशी माझी अभ्यासांती तयार झालेली श्रद्धा आहे. काळाच्या ओघात त्यातल्या राम आणि कृष्णाला देवत्व प्राप्त झालं आणि अनेक चमत्कार त्यात मिळत गेले. परंतु राम ही कायदेशीर व्यक्ती आहे, अशी भूमिका न्यायालयानं घेतली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीनही न्यायाधीशांनी हे मान्य केलं की बाबरी मशिदीचा ढाचा जिथं आहे तिथं राम मंदिर होतं. मंदिरावरच ही मशीद उभी करण्यात आली आहे, असा निकाल न्यायालयानं एकमतानं दिला. मंदिर पाडून मशीन उभी करण्यात आली आहे, असं तिनातले दोन न्यायाधीश म्हणाले. तिसरे न्यायाधीश म्हणाले, मंदिर पाडलं किंवा शतकानुशतकांपासून पडक्या, दुर्लक्षित मंदिरावर मशीद उभी केली असावी. मात्र मूळ मंदिराच्या जागेवर मशीद उभी करण्यात आली, असं तीनही न्यायाधीशांनी मान्य केलं. त्यानंतर न्यायालयानं ‘जगा आणि जगू द्या’ असा खास भारतीय रस्ता काढून दिला. विवादित जमीन तीन दावेदारांना प्रत्येकी एक तृतीयांश याप्रमाणे विभागून देण्याचा निर्णय न्यायालयानं घेतला. राम या दैवताला एक तृतीयांश, रामजन्मभूमी न्यासाला एक तृतीयांश आणि इतक्या वर्षांपासून तिथं मशिद होती म्हणून उर्वरित एक तृतीयांश जागा मशिदीसाठी. या निकालावरदेखील चर्चा होऊ शकते. अशा प्रकारच्या विचारांमुळेच भारत देश तुटला. इंग्रजांनी, मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगनं भारत तोडला. १९४७ मध्ये झालेल्या देशाच्या फाळणीला शतकानुशतकांपासून झालेली आक्रमणं जबाबदार आहेत. या आक्रमणामुळं भारतात इस्लामिक सत्ता होत्या हे सत्य आहे; त्यामुळं देश तोडून देण्याची वेळ आली. म्हणून १५२८ मध्ये मंदिर पाडून तिथं मशीद उभी केली जात असेल तर एक तृतीयांश जागा मशिदीला कशासाठी? राज्यघटनेच्या चौकटीत राहून ही भूमिका घेतली म्हणून हे ठीक.

रामजन्मभूमी आणि मी

मशिदीचे मूळ व्यवस्थापक हाशिम अन्सारी यांना १९८६ मध्ये मला भेटता आलं होतं. त्यावर्षी मी आयएएस झालो. त्या आधीची अकरा वर्षं पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून देशात वावरत होतो, शिकवत होतो, युवकांची संघटना बांधत होतो, ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांमध्ये काम करत होतो, देशाच्या समस्यांचा त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करत होतो. आंदोलन-लेखन सुरू होतं. त्यातूनच आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली. आयएएस झाल्यानंतर असं मुक्तपणे फिरणं, लेखन करणं, आपली मत मांडण्यावर मर्यादा येतील, हे माहीत होतं. म्हणून तेव्हा विचार केला की देशाच्या दृष्टीनं पुढची चाळीस ते पन्नास वर्षे महत्त्वाचा असेल अशा कोणत्यातरी एका विषयाचा अभ्यास करू. त्यावर्षी सर्वोच्च न्यायालयानं शहाबानो प्रकरणात देशाला समान नागरी कायद्याकडं घेऊन जाणारा ऐतिहासिक निकाल दिला होता.

समान नागरी कायद्याच्या दिशेनं पावलं टाका, असे निर्देश न्यायालयानं राजीव गांधी सरकारला दिले होते. याउलट त्या सरकारनं घड्याळाचे काटे उलटे फिरवले आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवणारं मुस्लिम महिला विधेयक संमत केलं. त्याचवेळी रामजन्मभूमीचा मुद्दा पेटू लागला होता. राजकीय विषयपत्रिकांवर तो येऊ लागला होता.

बाबरी मशिदीच्या घुमटाखाली १९४९ मध्ये एका रात्री रामलल्ला ‘प्रकट’ झाले होते. तिथं कोणीतरी रामलल्लाच्या मूर्ती आणून ठेवल्या होत्या. हा मुद्दा न्यायव्यवस्थेकडं गेल्यानंतर या मूर्ती हलवता येणार नाहीत, असा निर्णय देण्यात आला होता. या मूर्ती काढून टाका आणि मूळ मशिदीची पुनर्स्थापना करा असे आदेश पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले होते. मात्र मधल्या वर्षांमध्ये ते झालं नाही. शहाबानो प्रकरणानंतर तत्कालीन काँग्रेस मुस्लिमधार्जिणं आहे, मुस्लिम समाजातल्या बुरसटलेल्या, प्रतिगामी शक्तींसमोर त्यानं नांगी टाकली, असं चित्र तयार झालं. याचा राजकीय फायदा हिंदुत्ववादी पक्ष भाजपला होईल का काय, याच्या चर्चा सुरू झाल्या. १९४९ पासून राम लल्ला जिथं प्रकट झाले तिथं न्यायालयाच्या आदेशावरून कुलूप घालण्यात आलं होतं. १९८६ मध्ये ते कुलूप उघडून तिथं हिंदूंना दर्शन घेण्याचे आदेश निघाले. तेव्हा हा मुद्दा पेटू लागला होता. म्हणून इस्लाम आणि इस्लामिक कायदा या दोन विषयांचा सखोल अभ्यास इस्लामच्या तज्ञांकडून करू असं मी ठरवलं. तो करताना शहाबानो प्रकरण, भारतातले मुस्लिम, त्यांच्या समस्या, इस्लाम, शरिया आणि हादीस आपण समजून घेऊ असं ठरवलं.

१९८६ मध्ये आयएएस झाल्यानंतर ते मसुरीला जाण्यापूर्वी मी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेलो, तिथं राहिलो. इस्लामचे तज्ज्ञ प्राध्यापक हबीब रसूल आणि इतरांकडून इस्लाम शिकलो. त्या विद्यापीठात इतिहासकार इरफान हबीबदेखील होते. तिथं झालेल्या चर्चा ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ या माझ्या पुस्तकात आहेत. तेव्हा हबीब रसूल आणि इरफान हबीब यांनी असा अभिप्राय व्यक्त केला होता की भारतातले हिंदू-मुस्लिम संबंध एका नव्या बंधुभावाच्या संबंधावर उभी करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा आदर करत मुस्लिमांनी आनंदानं ती जमीन देऊन टाकावी, असा अभिप्राय प्राध्यापक हबीब रसूल आणि इरफान हबीब यांनी दिला होता.

त्याच काळात मी अयोध्येलादेखील जाऊन राहिलो. तत्कालीन अयोध्या जवळून पाहिली. मशिदीचे व्यवस्थापक हाशिम अन्सारी यांची भेट घेतली. त्यांची मुलाखत माझ्या पुस्तकात आहे. १९८६ आणि नंतर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हाशिम अन्सारी म्हणाले होते, की ही जमीन हिंदूंना देण्यास त्यांची कसलीही हरकत नाही. न्यायालयानं देऊ केलेली एक तृतीयांश जमीनदेखील मला नको, असं ते म्हणाले होते. मात्र ऑल इंडिया बाबरी मशीद अ‍ॅक्शन कमिटी आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड या दोन मुस्लिम संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला. या निकालाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांच्या दाव्यांना या इतिहासकारांचं पाठबळ होतं – रोमिला थापर, आर. एस. शर्मा, डी. एन. झा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः इरफान हबीब! हे चौघही मार्क्सवादी विचाराचे आहेत. भारतातील हिंदू-मुस्लिम संबंध एका नव्या बंधुभावपूर्ण पायावर उभे करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे, असं १९८६ मध्ये मला म्हणणारे हेच ते इरफान हबीब.

इस्लाममध्ये स्थलमाहात्म्य ही संकल्पना नाही. तू आहेस त्या ठिकाणी दिवसातल्या पाच वेळा काबाच्या दिशेनं प्रार्थना कर, ती अल्लापर्यंत पोहोचेल, असं इस्लाम सांगतो. स्थलमाहात्म्याची संकल्पना हिंदू धर्मात आहे. मशीद दुसर्‍या जागी उभी करता येईल असं १९८६ मध्ये इरफान हबीबदेखील म्हणत होते. विवादास्पद जागी केलेला नमाज ईश्वरापर्यंत पोहोचत नाही, असं हबीब रसूल म्हणाले होते. कोणाशी भांडून प्रार्थना करू नका, दुसर्‍या धर्माचा आदर करा असं इस्लाम सांगतो, हे हबीब रसूल मला समजावून सांगत होते.

मशिदीच्या जागी मंदिर नव्हतं, याचे पुरावे देतो असं हे चार इतिहासकार म्हणत असताना त्या जागी भारतीय पुरातत्व खात्याकडून उत्खनन झालं. ते उत्खनन सुरू असताना के. के. मोहम्मद हे मुख्य अधिकारी होते. धर्माच्या नावाखाली त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. मी एक भारतीय असल्याचं के. के. मोहम्मद त्यांच्या अतिशय वाचनीय आत्मचरित्रात सांगतात. ‘भारतीय’ या नात्यानं उत्खननातील साक्षी-पुरावे देत त्यांनी तिथं मंदिर असल्याचं सादर केलं. डाव्या शक्ती आणि इतिहासकारांनी या विषयावर दिशाभूल करण्याचे कोणकोणते प्रयत्न केले, हे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे.

राममंदिराचं होणं

अंतिमतः सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबर २०१९ ला अंतिम निकाल दिला. त्या निकालाअंतर्गत संपूर्ण जागा राममंदिरासाठी देण्यात आली. आदराचं, बंधुभावाचं प्रतीक म्हणून शरयू नदीच्या किनार्‍यावर मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. या वादावर निघालेला हा मार्ग घटनात्मक आहे. राम मंदिर होणं हे संकुचित अर्थानं धर्म-पंथाचा विषय नाही. मुळात भारतीय विचारात ‘धर्म’ या संकल्पनेला संकुचित अर्थच नाही. धर्म म्हणजे इंग्रजीतला ‘रिलिजन’ नाही. इंग्रजीत ‘धर्म’ला शब्दच नाही. ‘रिलिजन’ म्हणजे आपल्या भाषेतला पंथ किंवा सांप्रदाय. आपली ‘धर्म’ची संकल्पनाच पाश्चात्य संस्कृतीत नाही.

म्हणून राम मंदिर हा केवळ हिंदू धर्माचा विषय नाही. तो संपूर्ण भारतीय संस्कृतीचा विषय आहे. माझा धर्म कोणताही असेल, मी माझ्या ईश्वराला कोणत्याही नावे ओळखत असेल; मात्र ‘भारतीय’ म्हणून हजारो वर्षांचा भारताचा, भारतीय संस्कृतीचा इतिहास हा माझाच इतिहास आहे, हे जो मानतो त्याच्या दृष्टीनं राम मंदिर ही संकुचित, नकारात्मक, प्रतिगामी गोष्ट नाही. माझ्या माहितीतले इस्लामिक, ख्रिश्चन, धर्म मानणारे, न मानणारे आहेत, ज्यांना राम मंदिर हा सांस्कृतिक विषय वाटतो. मला याचा आनंद आहे. जुन्या पिढीचे थोर समाजवादी विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया (त्यांच्या नावातही ‘राम’ आहे!) यांनी फार अर्थपूर्ण विधान केलं आहे. ते म्हणतात, रामायण भारताला उत्तर-दक्षिण जोडतं आणि महाभारत भारताला पूर्व-पश्चिम जोडतं. त्यांच्या या कमालीच्या अर्थपूर्ण विधानानुसार रामायण आणि महाभारत यांच्यामार्फत संपूर्ण देश, त्याची संस्कृती एकमेकांत गुंफते. मात्र अलीकडं स्वतःला पुरोगामी, सोशॅलिस्ट, सेक्युलर म्हणवणार्‍या काहींनी रामाशी वैरच पत्करलं आहे. कृष्णाशी, रामायण-महाभारताशी, ज्याला ‘भारतीय संस्कृती’ म्हणावं अशा सगळ्यांशी त्यांनी वैर पत्करलं आहे.

रामायण-महाभारताची पकड भारतीय संस्कृतीवर रामायण-महाभारताची चमत्कारिक पकड आहे. गेल्या हजारो वर्षांत भारतीय संस्कृती जगभर पसरली. कुठं बौद्धविचार तर कुठं जैन, वैदिकविचार पसरला. या सर्व ठिकाणी भारतीय संस्कृती रामायण आणि महाभारत घेऊन पोहोचली. प्राचीन थायलंडच्या राजधानीचं नाव ‘अयोध्या’ आहे. आजही थायलंडच्या राजाला ‘राम’ म्हणतात. असं नातं कोरिया, तिबेट, म्यानमार, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मध्य आशियाशी आहे. हा प्रभाव युद्धानं, रक्त सांडून पसरला नाही. व्यापारी म्हणून येतो, तुमची अर्थव्यवस्था ताब्यात घेतो आणि दीडशे वर्षं तुमच्या उरावर नाचत तुमचा देश, संस्कृती कशी टाकाऊ आहे हे शिकवतो – असं भारतानं केलं नाही. भारतीय संस्कृती प्रेमानं, हृदय परिवर्तनाच्या मार्गानं पसरली. विचार बौद्ध, जैन, वैदिक असो, रामायण-महाभारत घेऊन पसरली. म्हणून रामायण-महाभारत हा वैश्विक वारसा आहे.

१९८७ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले एक दिग्दर्शक रामानंद सागर यांनी टीव्हीवर रामायणाचे एपिसोड सुरू केले. दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत हा एपिसोड यायचा. रविवारी त्या वेळेत अक्ख्या भारतातले रस्ते सुनसान पडायचे. लोकं टीव्हीला हळदी-कुंकू वाहून समोर बसायचे. रामायण बघताना पायात चपला घालायचे नाहीत. रामायणात काम करणार्‍या कलाकारांनी त्या काळात दारू पिणं सोडलं होतं. आयएएस होऊन मी मसुरीत प्रशिक्षणासाठी पोहोचलो होतो. मसुरीच्या ‘लॉन्ज’मध्ये आम्हीदेखील रामायण पाहायला बसायचो. आयएएससाठी निवडला गेलेला आमचा मित्र सुहेल अख्तर मूळचा मध्यप्रदेशचा. त्याला सिक्कीम केडर मिळालं होतं. सुहेलदेखील रामायण पाहायला बसायचा. मित्रमित्र एकत्र आल्यानंतर गमती चालायच्या. गंमत म्हणून मी सुहेलला म्हटलं, ‘तू ये क्या कर रहा है? रामायण देखने से तेरे मजहबवाले तुझपे नाराज हो जायेंगे!’. माझ्या या गंमतीतल्या वाक्यावर तो गंभीर झाला आणि म्हणाला, ‘अविनाश, ऐसे क्यूँ कह रहे हो? भारतीय होने के नाते क्या रामायण मेरी भी विरासत नहीं है?’. या विधानात फार मोठं शहाणपण लपलेलं आहे. अशा उदार आणि सहिष्णू दृष्टीमध्ये भविष्याचं फार मोठं आश्वासन लपलेलं आहे.

राममंदिर होताना

राममंदिर होताना आपल्या शिक्षण पद्धतीत रामायण-महाभारत येतंय याचा आनंद आहे. आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं ‘व्हाय भारत मॅटर्स’ या शीर्षकाचं नवं पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी भारताचं जगातलं स्थान, भारताला जगात बजावायची भूमिका आणि जगासाठी भारत का महत्त्वाचा आहे, हे मांडलं आहे. एका प्रकरणात परराष्ट्रनीती शिकवणारं साधन म्हणून रामायणाबद्दल त्यांनी वेळोवेळी लिहिलं आहे.

राममंदिर हा धार्मिक विषय मानणार्‍यांना हे कळत नाही की तीर्थयात्रांच्या संकल्पनेतून भारत जोडला जातो. भारत राजकीयपेक्षा संस्कृतीनं जोडलेला देश आहे. रामाचं दर्शन घ्यायला पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर, सगळ्या भारतातून लोक येतील. हे अयोध्येसहित सर्वच तीर्थक्षेत्रांना लागू होतं. म्हणून तीर्थक्षेत्रांचा विकास हा धार्मिक विषय नाही. त्यामागे अर्थशास्त्र, पर्यटन व्यवसायाला मिळणारी चालना, आत्मनिर्भर भारताची संकल्पना, जगातल्या आर्थिक परिस्थितीपासून भारतीय अर्थव्यवस्थेला तटबंदी उभी करण्याचं काम, १४० कोटी भारतीयांच्या अर्थव्यवस्थेची ताकद एकत्र आणण्याचा हा उद्योग आहे.

हजारो वर्षांपासून मंदिर हे भारतीय समाजजीवनाचं मध्यवर्ती केंद्र आहेच. हजारो वर्षांच्या इतिहासात मंदिर हे शिक्षणाचं केंद्र आहे. भारतभरची सगळी मंदिरं शिक्षणाची केंद्रं झाली पाहिजेत आणि भारतभरच्या शैक्षणिक संस्था मंदिरं झाल्या पाहिजेत. चाणक्य मंडल परिवारच्या माध्यमातून आपले यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे होताना देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. आधुनिक काळातला भारत आपला मूळ आत्मा जतन करून, स्वतःला आणि जगालाही बळकट करणार आहे. मला कळणारा हा प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा थोडक्यातला अर्थ. हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो कायम राहावा यासाठी प्रार्थना करतो.

राम! राम!!

Post a comment

Your email address will not be published.

Related Posts